हायपोथर्मिया चा हिवाळ्यात धोका | पुढारी

हायपोथर्मिया चा हिवाळ्यात धोका

ज्याप्रमाणे रक्तामध्ये विविध घटक असतात, त्यांचे प्रमाण कमी जास्त झाल्यास किंवा शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी अधिक झाल्यास, विविध हार्मोन्सचा स्राव कमी जास्त झाल्यास शरीराची कार्यप्रणाली बिघडते. तसेच सर्वसामान्यपणे व्यक्तीच्या शरीराचे एक ठरावीक तापमान असते, त्यामुळे शरीराची कार्ये व्यवस्थित सुरळीत चालतात. आपला देश उष्णकटबंधिय आहे. आपल्या शरीराचे तापमान सर्वसाधारणपणे 98.6 अंश फॅरेनहाईट किंवा 37 अंश सेल्सिअस असते. शरीराच्या तापमानात यापेक्षा कमी जास्त होणे हे शरीराला हानिकारक असते.

हायपोथर्मिया ही शरीराच्या तापमानाशी निगडित एक अवस्था आहे. वैद्यकीय भाषेत सांगायचे तर ही एक आपत्कालीन परिस्थिती आहे. हायपोथर्मियामध्ये शरीराचे तापमान सामान्य तापमानापेक्षा कमी होते. शरीर जितकी उष्णता निर्माण करते तितक्याच वेगाने शरीर उष्णता गमावते. त्यामुळे शरीराचे तापमान हे सामान्य तापमानापेक्षा धोकादायक पातळीपर्यंत कमी होते. शरीराचे सामान्य तापमान 37 अंश सेल्सिअस असते. पण जेव्हा शरीराचे तापमान 35 अंशांपर्यंत खाली घसरते, तेव्हा या स्थितीला हायपोथर्मिया असे म्हटले जाते. कडाक्याची थंडी असेल त्या ठिकाणी हायपोथर्मियाचा धोका वाढतो. हायपोथर्मियाच्या परिस्थितीत हृदय, मज्जासंस्था आणि इतर अवयवांचेही कार्य सर्वसामान्यपणे सुरू राहू शकत नाही.

हायपोथर्मियावर योग्य वेळी उपचार न झाल्यास हार्ट फेल, श्वसनसंस्थेच्या कार्यात गडबड होणे यांसारख्या समस्या निर्माण होतात. परिस्थिती गंभीर झाल्यास मृत्यूही ओढवू शकतो. 90-95 अंश फॅरेनहाईटपर्यंत शरीराचे तापमान असेल तर त्याला हलका किंवा माईल्ड हायपोथर्मिया, 82-90 अंश फॅरेनहाईटपर्यंत शरीराचे तापमान असेल तर त्याला मॉडरेट हायपोथर्मिया आणि 82 अंश फॅरेनहाईटपेक्षा कमी शरीराचे तापमान झाल्यास त्याला गंभीर हायपोथर्मिया असे म्हणतात.

प्रमुख लक्षणे – हायपोथर्मियाची लक्षणे समजून घेतल्यास त्वरित उपचार साहाय्य घेण्यास मदत मिळेल. हायपोथर्मियामध्ये जसे जसे शरीराचे तापमान कमी होत जाते तशी व्यक्तीला थंडी वाजू लागते. कारण शरीराला गरम राखणारी ऑटोमॅटिक डिफेन्स सिस्टीमचा जोर कमी पडू लागतो. हायपोथर्मिची काही लक्षणे आणि संकेत दिसून येतात. जसे बोलताना अडखळणे, श्वास घेण्यास त्रास होणे, हृदयाच्या ठोक्यांमध्ये वेगाने चढउतार होणे, नस कमजोर पडणे, शरीराचे संतुलन बिघडणे, भ्रमिष्ट अवस्था किंवा स्मरणशक्ती कमजोर पडणे, गुंगी येणे किंवा शरीरातील ऊर्जा कमी झाल्यासारखे वाटणे तसेच बेशुद्ध पडणे.

कारणे काय? : ही स्थिती निर्माण होण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे अतिथंड वातावरणात राहणे. त्याव्यतिरिक्तही काही काऱणे आहेत.

हिवाळ्यात गरम उबदार कपडे वापरून शरीराला उष्ण न राखणे.
दीर्घ काळ अंगावर ओले कपडे तसेच ठेवणे.
सतत पाण्यात काम करणे.
नदी, तलाव किंवा कुंडात चुकीने पडणे.
पुरेशा प्रमाणात आहार किंवा पेयपदार्थांचे सेवन न करणे.

बचावासाठी :

* हायपोथर्मियाची स्थिती नक्कीच गंभीर होऊ शकते. त्यासाठी थंडीपासून बचाव करणे आवश्यक आहे. हिवाळ्यात गरम उबदार कपडे वापरले पाहिजेत. एकच जाड कपडा वापरण्यापेक्षा तीन वेगवेगळे कपडे घालावेत.

* हिवाळ्यात खूप अवघड व्यायाम करणे टाळावे.

* दमट आणि ओलसर जागी राहू नये.

* पाण्यात जास्त वेळ काम करू नये.

* हिवाळ्यात सकाळी तापमान खूप कमी असते. त्यावेळेत बाहेर जाणे टाळावे.

* थंड पाण्याने अंघोळ करू नये, पण अतिगरम पाणी न घेता कोमट पाण्याने अंघोळ करावी.

* फ्रीजमध्ये ठेवलेल्या पदार्थांचे थेट सेवन करू नये. फ्रीजमधील पदार्थ आधी बाहेर काढून ठेवावे आणि त्यांचे तापमान सामान्य झाल्यानंतरच त्याचे सेवन करावे.

* शक्यतो हिवाळ्यात ताजे गरम अन्नपदार्थ सेवन करावेत.

* हायपोथर्मियाचा धोका लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांना अधिक असतो. मुलांना सकाळच्या कोवळ्या उन्हात खेळू द्या. तसेच ज्येष्ठ नागरिकांनाही सकाळचे कोवळे ऊन अंगावर घेण्यास सांगावे. कोवळ्या उन्हामुळे शरीराला उष्णता मिळतेच परंतु रोगप्रतिकारक क्षमताही मजबूत होते. गरम उबदार कपडे घालायला सांगावे. रात्रीदेखील उबदार पांघरूण घालावे. अंग उघडे पडू नये. या सर्व गोष्टींची काळजी घेतल्यास हायपोथर्मियापासून बचाव होऊ शकतो.
डॉ. संतोष काळे

Back to top button