अवयव दान : …अवयवरूपी उरावे! | पुढारी

अवयव दान : ...अवयवरूपी उरावे!

अवयव दान आणि अवयव प्रत्यारोपण या गोष्टी आता मोठ्या प्रमाणात चर्चिल्या जात आहेत. जगभरात हजारो लोक अवयवदान करतात आणि हजारो लोकांना त्याचा फायदा होतो. फायदा म्हणजे त्यांना जीवनदानच मिळते. आज यकृत, मूत्रपिंडे, फुप्फुसे, हृदय, स्वादुपिंड, आतडे अशा अनेक अवयवांचे रोपण यशस्वीपणे केले जात आहे. याशिवाय त्वचा, डोळ्यातील कॉर्निया, हाडे, शरीरातील अनेक ऊती यांचेही लाखो लोकांमध्ये यशस्वी रोपण केले जात आहे. अवयव रोपणामुळे एखाद्या व्यक्तीला निरोगी जीवन, द़ृष्टिदान एवढेच नव्हे, तर जीवनदानच मिळत आहे.

अवयव प्रत्यारोपण हे आजच्या जगातले वैद्यकीय वरदानच म्हणावे लागेल. जेव्हा एखाद्या व्यक्तीला एखाद्या अवयवांची गरज लागते तेव्हा त्या व्यक्तीची संपूर्ण चाचणी केली जाते. त्या व्यक्तीला कोणता आजार झालेला आहे आणि कोणत्या अवयवांची गरज आहे, याचा विचार केला जातो. आजार कोणत्या टप्प्यावर आहे? शरीराची एकंदर स्थिती काय आहे? अशा सर्व गोष्टींचा विचार करून अवयव प्रत्यारोपणाचे नियोजन केले जाते. त्या व्यक्तीचा रक्तगट कोणता आहे? त्या व्यक्तीचे वजन आणि उंची किती आहे? थोडक्यात, त्या व्यक्तीचे आकारमान कसे आहे? ती व्यक्ती किती आजारी आहे किंवा किती तातडीने तिला अवयवांची गरज आहे? जर अवयव दान करणारी व्यक्ती उपलब्ध असेल तर ती किती अंतरावर आहे? आणि अर्थातच, प्रतीक्षा यादीत किती क्रमांकावर त्या व्यक्तीचे नाव आहे?

आज अवयवांची गरज असताना अवयव न मिळाल्याने दररोज 20 व्यक्तींना आपला जीव गमवावा लागतो. म्हणजेच दरवर्षी सात हजार लोक अवयवाची प्रतीक्षा करत मृत्युमुखी पडतात. म्हणून अवयवदानाच्या बाबतीत जनजागृती करायला हवी. कल्पना करा… आपल्यापैकी प्रत्येकाने अवयवदान करण्याचे ठरवले तर, कोणत्याही व्यक्तीला अवयव न मिळाल्याने मृत्यूला सामोरे जावे लागणार नाही.

अवयव दान कोण करू शकतो?

जेव्हा एखाद्या धडधाकट व्यक्तीचा अपघात होतो किंवा मेंदूला मार लागतो किंवा मेंदूमध्ये रक्तस्राव होतो किंवा कोणत्याही कारणामुळे प्राणवायूची कमतरता निर्माण होऊन व्यक्तीचा मेंदू काम देण्याचे बंद करतो, त्या व्यक्तीला ब्रेन डेड असे समजले जाते. ब्रेन डेड म्हणजे मेंदूने काम थांबवल्याची स्थिती. अशा व्यक्तीचे इतर अवयव काम करत असतात, पण मेंदू काम करत नसतो. ही व्यक्ती जिवंत असून नसल्यासारखी असते. प्रत्यक्ष व्यवहारी जीवनात अशी व्यक्ती जिवंत वाटत असली तरी, वैद्यकीयद़ृष्ट्या ती मृत असते. तसेच कायदेशीरद़ृष्ट्यासुद्धा ती मृत असते. पण एखादी निरोगी व्यक्तीसुद्धा मूत्र पिंडासारखा अवयव दान करू शकते.

पूर्वीच्या मानाने अवयव प्रत्यारोपण हे मोठ्या प्रमाणावर यशस्वी होत आहे. मूत्रपिंड, यकृत, फुप्फुसे आणि हृदय यांच्या प्रत्यारोपणामुळे लोकांना पुन्हा नव्याने जीवन जगण्याची संधी निर्माण होत आहे. हे सर्व वैद्यकीय तंत्रज्ञानातील नेत्रदीपक प्रगतीमुळे शक्य झाले आहे.

एक माणूस एकूण आठ माणसांना अवयव दान करू शकतो. एक हृदय, दोन फुप्फुसे, एक मूत्रपिंड, एक यकृत, एक स्वादुपिंड आणि आतडे. एक यकृत दोन लोकांना उपयोगी पडू शकते.

याशिवाय नेत्रदान, त्वचादान, एवढेच नव्हे, तर शरीरातील रक्तवाहिन्या, हृदयाच्या झडपा, हाडे तसेच कूर्चा याचेही दान एखादी व्यक्ती करू शकते. असा संपूर्ण हिशोब केला तर एक व्यक्ती सर्व अवयव मिळून जवळपास पन्नास लोकांच्या उपयोगी पडू शकते.

ज्याला अवयव दान मिळते त्याच्या आयुष्यात लगेच प्रकाश निर्माण होतो. नवे आयुष्य प्राप्त होते. केवळ त्यालाच आनंद होतो असे नाही, पण त्याचे कुटुंबीय आणि त्याच्यावर प्रेम करणारे आप्त स्वकीय आणि मित्रमंडळी यांच्याही आनंदाला पारावार राहत नाही.

पण तिकडे मृत्यूनंतर अवयवदान केले असेल तर अवयव दान करणार्‍या मृत व्यक्तीच्या घरावर शोककळा पसरली असते. अशाही परिस्थितीत एक सकारात्मक गोष्ट घडलेली असते, ती म्हणजे आपली व्यक्ती आपल्याला सोडून गेली असली तरी, त्या व्यक्तीचे अवयव कोणाला तरी उपयोगी पडलेले आहेत आणि आपल्या माणसाचे अवयव कुणाच्या तरी रूपाने जिवंत आहेत.

अवयव दान केल्यानंतर ज्या व्यक्तीच्या आयुष्यात आनंद फुलतो, त्या व्यक्तीच्या चेहर्‍यावरील आनंद पाहून आपला माणूस गेल्याचे दुःख काही प्रमाणात हलके होऊ शकते. काही दिल्याचा आनंद! त्यातही अवयव दानासारखे अमूल्य दान केल्याचा आनंद मनाला सुखावून जातो. मृत पावलेली आपली व्यक्ती कोणाच्यातरी रूपाने जिवंत आहे याचे आत्मिक समाधान कुटुंबीयांना लाभू शकते.

डॉ. अनिल मडके

Back to top button