स्काल्प सोरायसीस ची समस्या | पुढारी

स्काल्प सोरायसीस ची समस्या

सोरायसीस हा त्वचेशी संबंधित आजार असून यामध्ये अधिक प्रमाणात पेशी तयार होतात. स्काल्प सोरायसीस हादेखील सोरायसीसचाच एक प्रकार असून तो सामान्य त्वचारोग आहे. यामध्ये रुग्णाच्या शरीरावर लाल खपलीयुक्त जखमेप्रमाणे पॅचेस तयार होतात. डोक्यावर एक किंवा एकापेक्षा अधिक असे पॅचेस होतात.

काही वेळा संपूर्ण डोक्यावर अशा खपल्या दिसून येतात. हा आजार वाढला तर डोक्यावरून कपाळावर, पाठ, मान यावर किंवा कानाच्या मागे देखील पसरत जाऊ शकतो. हा आजार संक्रमण करणारा नसला तरीही बराच त्रासदायक असतो. या आजारात रुग्णाची विशेष देखभाल करण्याची गरज असते.

सोरायसीसच्या अन्य प्रकाराप्रमाणेच डोक्यावर होणारा हा आजार एका व्यक्तीपासून दुसर्‍या व्यक्तीला होत नाही. हा आजार का होतो? याचे नेमके कारण शास्त्रज्ञ अजून शोधून काढू शकलेले नाहीत. मात्र असे मानले जाते की, इम्युन सिस्टीममध्ये (प्रतिकारशक्ती) काही गडबड झाल्यास त्वचेच्या पेशी वेगाने वाढू लागतात आणि त्यामुळे पॅचेस निर्माण होऊ लागतात. ज्या व्यक्तींना शरीराच्या इतर भागात सोरायसीस आहे, त्यांना स्काल्प सोरायसीस होण्याचा धोका अधिक प्रमाणात असोत. हा आजार गंभीर किंवा अल्प अशा दोन्ही स्वरूपात दिसून येतो. हा आजार झाल्यानंतर प्रचंड खाज सुटते. त्यामुळे दैनंदिन व्यवहारात अडचणी निर्माण होतात. तसेच झोपही पूर्ण होत नाही.

पेशींच्या पॅचेसमुळे आणि सतत खाज सुटत असल्यामुळे स्काल्प सोरायसीसच्या रुग्णांना लोकांमध्ये उठणे-बसणे लाजिरवाणे वाटू लागते.

लक्षणे : या आजारात सुरुवातीला लाल रंगाचे जाडसर त्वचेवर डाग तयार होतात. नंतर चांदीप्रमाणे पांढर्‍या रंगाची साल दिसू लागतात, ही साल कोंड्याप्रमाणे दिसतात. डोक्यात कोरडेपणा येतो, प्रचंड खाज सुटते, आग होते, केस गळू लागतात.

सोरायसीस या आजारामध्ये केस गळत असले तरी केस गळण्यामागे केवळ स्काल्प सोरायसीस हेच कारण नसते. सतत खाजवल्यामुळे डोक्यातील खपल्या जबरदस्ती काढल्यामुळे औषधे आणि आजाराशी निगडित तणावामुळेदेखील अनेकदा केस गळतात. सोरायसीसच्या जखमा बर्‍या होताच केसांचा विकास पुन्हा सामान्य गतीने होऊ लगातो.

देखभाल : स्काल्प सोरायसीस झाला म्हणून घाबरण्याचे कारण नाही. आपण यावरही योग्य प्रकारे देखभाल करून इलाज करू शकतो. एखाद्या व्यक्तीला जर स्काल्प सोरायसीसची समस्या असेल. तर त्याच्या डोक्याला उपचारांची गरज असते. केसांना नाही हे लक्षात घेतले पाहिजे. थोडक्यात, डोक्यावरच्या त्वचेवर इलाजाची गरज असते. अशा प्रकारचा सोरायसीस झाला असेल तर डोक्यात होणार्‍या जखमांवरच्या खपल्या जोरजोरात खरवडून काढू नये.

शाम्पूने डोके धुताना मिनरल ऑईल किंवा ऑलिव्ह ऑईल यांचा वापर करून खपल्या मुलायम बनवता येऊ शकतात. रात्री झोपण्यापूर्वी यापैकी कोणतेही तेल केसांना लावावे आणि शॉवर कॅपद्वारे डोके झाकून झोपावे. सकाळी उठून केस धुवावेत. केस धुताना शाम्पूची गरज असते. कारण शाम्पू खपल्या बनण्यापासून रोखण्याचे काम करतो, जेणेकरून औषधाचा परिणाम त्वचेवर सहजपणे होऊ शकेल. यासाठी सौम्य प्रकारच्या शाम्पूचा वापर करावा. शक्य असल्यास त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. बहुतेकवेळा सोरायसीस म्हटले म्हणजे लोक घाबरतात; मात्र न घबारता शांतपणे या आजारावर उपाय केले तर यापासून नक्कीच आराम मिळू शकतो.

डॉ. मनोज कुंभार

Back to top button