पिंजर्‍यातील सिंह | पुढारी | पुढारी

पिंजर्‍यातील सिंह | पुढारी

एकदा सम्राट अकबराच्या दरबारात पर्शियाच्या राजाने एक सिंहाची मूर्ती पाठवली. मूर्ती हलक्या धातूची  दिसत असली तरी डरकाळी फोडण्याच्या आवेशात असलेल्या सिंहासारखी हुबेहूब दिसत होती. मूर्तीला लोखंडाच्या एका मजबूत पिंजर्‍यात ठेवले होते. पिंजर्‍याला स्पर्श न करता सिंहाच्या मूर्तीला पिंजर्‍याबाहेर काढण्याचे आव्हान पर्शियाच्या राजदूताने दरबार्‍यांना केले. दरबारातील अनेक लोकांनी पिंजर्‍याचे निरीक्षण केले; पण पिंजरा एवढा मजबूत होता की तो तोडल्याशिवाय सिंहाच्या मूर्तीला बाहेर काढणे अशक्य होते.

शेवटी बिरबलाला दरबारात बोलविण्यात आले. बिरबलाने पिंजर्‍याजवळ जाऊन बराच वेळ मूर्तीचे निरीक्षण केले. नंतर तो हसून स्वत:शीच म्हणाला, ‘पर्शियाचे शाह कधीच एखादे आव्हान देणार नाहीत जे अशक्य असेल.’ बिरबलाने दरबारातील नोकरांना पिंजर्‍याभोवती मोठा जाळ करण्यास सांगितले. लवकरच प्रचंड आग पिंजर्‍याभोवती धगधगू लागली. पिंजर्‍यातील सिंह चक्‍क वितळू लागला. अकबरासहित दरबारातील सर्व उपस्थित चकित झाले. बिरबल हसून म्हणाला,

‘पर्शियाचे शाह हुशार आहेत.  मेणाच्या पुतळ्याला धातूचा रंग फासून धातूची मूर्ती असल्याचा आभास निर्माण केला. मेणाचा सिंह पूर्ण वितळेपर्यंत आग सुरूच ठेवा.’सम्राट अकबराने पर्शियाच्या राजदूताकडे पाहिले. त्याचा चेहरा शरमेने झुकलेला होता. अकबराने जोरजोरात टाळ्या वाजवण्यास सुरुवात केली. बिरबलाने पुन्हा एकदा अकबराच्या दरबाराची पत कायम राखलेली होती.

संबंधित बातम्या

Back to top button