कथा : चतुर गंगाधर | पुढारी | पुढारी

कथा : चतुर गंगाधर | पुढारी

हिमांशू हा अतिशय जुलमी राजा होता. प्रजेला तो नाहक त्रास देत असे. त्याच्या राज्यात गंगाधर नावाचा चतुर व्यापारी राहत असे. राजा नेहमी गंगाधरचा द्वेष करत असे. याचे कारण हिमांशूच्या जुलमाविरुद्ध उभे राहण्याची हिंमत गंगाधरमध्येच होती.

एके दिवशी गंगाधरने व्यापार्‍यांच्या सभेत विधान केले की ‘मनुष्य कोणत्याही परिस्थितीत असो, बुद्धीचा उपयोग करून तो उदरनिर्वाह चालवू शकतो.’ झाले! राजाला निमित्त मिळाले. त्याने गंगाधरला त्याचे विधान सिद्ध करण्याचे आव्हान दिले. एका महिन्यात एक हजार सोन्याची नाणी कमवून दाखवण्याचे आव्हान राजाने गंगाधरसमोर ठेवले. मात्र त्याने एक अट ठेवली की महिनाभर गंगाधरने कुटुंबासोबत राजाच्या अश्‍वशाळेत रहायचे व अश्‍वशाळेबाहेर पाऊलही टाकायचे नाही. आश्‍चर्य म्हणजे गंगाधरने राजाचे आव्हान स्वीकारले.

अश्‍वशाळेत आल्यावर गंगाधरने घोड्यांच्या खरार्‍याचे वजन करण्यास सुरुवात केली. त्याला आढळले की काही घोड्यांच्या खरार्‍याचे वजन कमी आहे. त्याने अश्‍वशाळा चालकांना फैलावर घेतल्यावर घोड्यांना देण्यात येणारा खरारा चोरून बाजारात विकत असल्याची कबुली त्यांनी दिली. राजाच्या कानावर ही चोरी जाऊ नये म्हणून गंगाधरला त्यांनी आपले सारे काळे धन देण्याचे कबूल केले.

संबंधित बातम्या

महिनाभरानंतर गंगाधर राजदरबारात एक थैली घेऊन हजर झाला व म्हणाला, ‘महाराज, आपल्या आव्हानानुसार मी कमवलेली ही हजार सोन्याची नाणी आपल्यासमोर शाही खजिन्यात जमा करण्यासाठी आणली आहेत. ही नाणी मी अश्‍वशाळेबाहेर पाऊल न टाकता सरळमार्गाने मिळवली आहेत.’

राजा हिमांशू चकित होऊन गंगाधरकडे पाहतच राहिला. त्याला खात्री पटली की मनुष्य कोणत्याही परिस्थितीत बुद्धिचातुर्याने जिवंत राहू शकतो हे गंगाधरचे विधान सत्य आहे.

Back to top button