भारतदर्शन : कोलम रंगावली कला | पुढारी

भारतदर्शन : कोलम रंगावली कला

सुमारे साडे चार हजार वर्षांपूर्वी तांदळाच्या पिठापासून काढण्यात येणार्‍या रांगोळीसद‍ृश कोलम कलेची सुरुवात सिंधू संस्कृतीत झाली. रांगोळीच पण रांगोळी काढण्याच्या कलेहून थोडी कठीण व तेवढीच आकर्षक ही कला बंगाल व दक्षिण भारतात अजुनही अस्तित्व टिकवून आहे. 

बंगालमध्ये या कलेला अल्पोना म्हटले जाते. सरळ नागमोड्या गोलाकार रेषा व ठिपके याच्या संगमाने ही रंगावली कला साकार होते. सकाळी कोलम किंवा अल्पोना घरासमोर काढल्याने देवतांचा आशिर्वाद प्राप्‍त होतो अशी समजूत आहे. ही रंगावली तांदळाच्या पिठापासून काढली जात असल्याने पक्षी, किटक व मुंग्या यांना सकाळी अन्‍नही खायला मिळते.घरासमोरच्या प्रांगणात,सणासुदीला, देवालयांच्या गाभार्‍यासमोर व अगदी विवाह मंडपातही ही रंगावली आपल्याला पहायला मिळते. 

भूमितीचे कोणतेही ज्ञान नसताना अतिशय किचकट व विशाल अशी ही रंगावली काढण्याचे ज्ञान स्त्रियांना परंपरेने मिळते. ही रंगावली दक्षिण भारत व बंगालमधील ज्येष्ठ स्त्रियांद्वारे काढली जात असली तरी काही पुरुष कलाकारही ही रंगावली काढतात. या रंगावलीत लाल रंग सोडून इतर कोणताही रंग भरला जात नाही हे विशेष. लाल रंगाचा वापर मर्यादितरित्या चौकट आखण्यासाठी केला जातो.

 

संबंधित बातम्या

Back to top button