

जगाला दोन वेळचे खायला मिळावे म्हणून सारे जग साखर झोपेत असताना जागा होणारा आणि आपल्या ढवळ्या-पवळ्याबरोबर काळ्या आईची सेवा करणारा, दुपारी खायला भाकरी मिळाली, तर ती शेतातच खाणारा आणि संध्याकाळी नाही मिळाली, तर तांब्याभर पाणी पिऊन झोपी जाणारा शेतकरी पंढरीच्या वारीचा आत्मा आहे. वारकरी वारीच्या वाटेवर अतिशय दक्ष असण्याचे कारण त्याची शेतातील कामाची दक्षता आहे. शेतकरी व विठूरायाचा नामधारक वारकरी किती दक्ष असतो, याचे वर्णन करणारा तुकोबारायांचा एक अभंग मिळतो,
मढे झाकोनिया करीती पेरणी
कुणबीयाची धनी लवलाही ।
ओटीच्या परीस मुठीच्या ते वाढे
या परी कवाडे स्वहिताचे ।
काही सन्माननीय अपवाद वगळले, तर वारकरी संप्रदायातील बहुसंख्य संत हे गृहस्थी होते. त्यांनी प्रथम आपल्या कर्मकुसुमांची वीरा पांडुरंगाच्या चरणी समर्पित केली. श्रमयोगातून साधला जाणारा भक्तियोग भगवंताच्या चरणी अर्पण केला, तर त्यास अपार आनंद होतो, या तत्त्वावर वारकरी संतांची केवळ श्रद्धाच नव्हती, तर त्याचे प्रत्यक्ष आचरण त्यांनी केले. झुळु-झुळु वाहणार्या पाटाच्या पाण्याबरोबर विठ्ठलाची गाणी गाणार्या श्रमयोगी संत सावता माळी यांना आपल्या श्रमाची सर्व साधने विठ्ठलमय वाटतात म्हणून ते म्हणतात,
कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी
लसूण, मिरची, कोथंबिरी अवघा झाला माझा हरी
मोट नाडा विहीर दोरी अवघी व्यापीली पंढरी
वास्तविक पाहता आषाढी-कार्तिकी पंढरीच्या वार्या आणि कृषी संस्कृती यांचा अगदी घट्ट अनुबंध आहे. ज्याचे वर्णन करताना डॉ. सदानंद मोरे यांनी म्हटले आहे, ‘महाराष्ट्रात शेती आणि शेतीशी निगडीत असणार्या सर्वच घटकांनी प्रथमपासूनच वारकरी जीवन पत्करले होते व वारीचा काळसुद्धा शेतकर्यांच्या वेळापत्रकाशी सुसंगत होता.
आपली शेतीची कामे आटोपून, पेरणी करून शेतकरी आषाढी वारीला निघायचा.’ तोच शेतकरी राजा आज अस्मानी आणि सुलतानी संकटांनी ग्रासला आहे. यावर्षी तर भर मे महिन्यात पर्जन्यराजा एवढा धोऽऽ धो ऽऽ बरसला की, जूनच्या मध्यापर्यंत शेतीची पूर्व मशागत आणि पेरणीसाठी त्याने शेतकर्यांना संधीच दिली नाही, तरीदेखील डोळ्यांत आलेले आसू गिळीत, चेहर्यावर हसू आणत शेतकरी आषाढीला निघाला आहे, तरीदेखील ना. धो. महानोरदादांच्या शब्दात तो म्हणत आहे,
‘दिंड्या पताकांनी गजबजली पंढरी
तरी मी श्रीहरी कासावीस ।
बरसू दें नभ सृष्टीचा सोहळा
कुणब्याचा मळा उभा राहों॥’ (क्रमश:)
- प्रा. शिवाजीराव भुकेले,
(लेखक संत साहित्याचे अभ्यासक व ख्यातनाम व्याख्याते आहेत.)