Dr. Babasaheb Ambedkar : बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला राजर्षी शाहूंनी दिले पाठबळ - पुढारी

Dr. Babasaheb Ambedkar : बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला राजर्षी शाहूंनी दिले पाठबळ

कोल्हापूर ; सागर यादव : राजर्षी शाहूंकडून ‘लोकमान्य’ पदवी, हयातीतच पुतळा उभारणी, करवीर इलाख्यात वकिलीची सनद आणि पन्हाळगडावर दीड एकर मोफत जागा, असे भरभरून प्रेम कोल्हापूरकरांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांना दिले होते. ‘शाहूनगरी’चे डॉ. आंबेडकर यांच्याशी असणारे ऋणानुबंध अनोखे होते.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजन समाजाला ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ असा संदेश दिला. त्यांच्या कार्याला व चळवळीला भक्कम पाठबळ देण्याचे कार्य लोकराजा राजर्षी शाहूंनी केले. आजही हे ऋणानुबंध जपत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिद्धार्थनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळ्यासाठी समिती व लोकवर्गणीला बगल देऊन मालोजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली साधेपणाने सोहळा साजरा होत आहे.

कोल्हापुरात मिरवणूक, सत्कार… (Dr. Babasaheb Ambedkar)

राजर्षी शाहू महाराज व डॉ. आंबेडकरांची भेट सन 1919 ला मुंबई येथे झाली. परळ येथील चाळीत जाऊन राजर्षी शाहू महाराज हे आंबेडकर यांना पन्हाळा लॉज या आपल्या बंगल्यावर घेऊन गेले होते. भेटीवेळी राजर्षी शाहूंनी डॉ. आंबेडकरांना कोल्हापुरात येण्याचे आमंत्रण दिले होते. त्यानुसार आंबेडकर कोल्हापुरात आले, त्यावेळी रेल्वे स्टेशनवर त्यांचे भव्य स्वागत केले. सरकारी विश्राम धाम येथे त्यांची राहण्याची व्यवस्था करून बग्गीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शहरात मिरवणूक काढण्यात आली होती. सोनतळी कॅम्पवर राजेशाही भोजन आणि मुंबईला परतताना जरीपटक्याचा आहेर देऊन राजर्षी शाहू महाराज यांनी त्यांचा भव्य सत्कारही केला होता.

‘पुढारी’चेही पाठबळ… (Dr. Babasaheb Ambedkar)

नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेशासह चळवळीच्या अनेक कार्यात डॉ. आंबेडकरांसोबत ‘पुढारी’कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांनी सक्रिय सहभाग घेतला. याचबरोबर ‘पुढारी’च्या माध्यमातून चळवळ व्यापक करण्यासाठी सडेतोड लिखाण करून डॉ. आंबेडकरांच्या कार्याला पाठबळही दिले.

छत्रपती राजाराम महाराज यांनी वारसा जपला…

लोकराजा राजर्षी शाहूंचा वारसा जपत छत्रपती राजाराम महाराज यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला यथाशक्ती बळ दिले. राजर्षी शाहूंनी डॉ. आंबेडकरांना करवीर इलाख्यात वकिली करण्याची सनद दिली होती. राजाराम महाराज यांनी 8 मे 1929 रोजी या सनदीचे नूतनीकरण केले. तसेच डॉ. बाबासाहेब छत्रपतींचे प्रजाजन व्हावेत, यासाठी पन्हाळा येथे घर बांधण्यासाठी दीड एकर जागा देण्याच्या प्रस्तावासही राजाराम महाराज यांनी मंजुरी दिली होती (26 जानेवारी 1935). खासबाग मैदानात 30 डिसेंबर 1939 रोजी झालेल्या प्रजा परिषदेचे अध्यक्षस्थान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भूषवले.

यानंतर दसरा चौकातील राजर्षी शाहूंच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या साक्षीने त्यांचा नागरी सत्कारही करण्यात आला. इतकेच नव्हे तर त्यांच्या हयातीतच कोल्हापूरकरांनी त्यांचा पुतळा बिंदू चौकात उभारला (9 डिसेंबर 1950). यानंतर 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचे महापरिनिर्वाण झाले. त्यावेळीही कोल्हापूरकरांनी त्यांना भावनिक निरोप दिला. त्यांच्या रक्षेची भव्य मिरवणूक काढून मोठी शोकसभा घेण्यात आली होती.

राजर्षी शाहूंकडून आर्थिक पाठबळ (Dr. Babasaheb Ambedkar)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परदेशातील उच्चशिक्षणासह जनजागृतीच्या कार्यासाठी लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांनी आर्थिक पाठबळ दिले होते. ‘मूकनायक’ या त्यांच्या वृत्तपत्रासाठी राजर्षी शाहू महाराज यांनी अडीच हजार रुपयांची मदत केली. त्यामुळे 30 जानेवारी 1920 रोजी ‘मूकनायक’चा पहिला अंक प्रसिद्ध झाला.

‘लोकमान्य’ पदवीने सन्मान

माणगाव परिषदेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक कार्याची सुरुवात झाली. यावेळी दलित समाजाला डॉ. आंबेडकर यांच्या रूपाने नेतृत्व मिळाल्याचे राजर्षी शाहूंनी जाहीर केले. तसेच या दरम्यानच्या पत्रव्यवहारात राजर्षी शाहूंनी डॉ. आंबेडकर यांना ‘लोकमान्य’ अशी पदवी देऊन विशेष गौरव केला होता.

दैनिक पुढारी वत्तपत्रामध्ये पूर्वप्रसिद्धी दिनांक १४ एप्रिल २०२१

Back to top button