Dr. Babasaheb Ambedkar : बाबासाहेब म्हणाले होते, केवळ शेतीवर अवलंबून राहू नका... | पुढारी

Dr. Babasaheb Ambedkar : बाबासाहेब म्हणाले होते, केवळ शेतीवर अवलंबून राहू नका...

पावसाच्या आणि निसर्गाच्या अनिश्चितपणामुळे शेतकर्‍याला केवळ शेतीवर अवलंबून राहणे अवघडच नव्हे तर ते असंभव आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचे मत होते. पाण्याचे नियोजन केले नाही तर आपल्याकडे पुढच्या 75 वर्षांत पाण्याचे दुर्भिक्ष अनुभवायला मिळेल, पाण्यासाठी रक्त सांडले जाईल, असेही डॉ. आंबेडकर म्हणाले होते. दुर्दैवाने त्यांची विधाने आजच्या परिस्थितीत सत्य ठरली आहेत. देशभरातील शेतकरी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर आणि बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनाच्या निमित्ताने विशेष लेख.

शेती व्यवसाय भारतात किफायतशीर होऊ शकत नाही, त्याची अनेक कारणे आहेत. कमीत कमी लोक उदरनिर्वाहासाठी थेट शेतीवर अवलंबून असले पाहिजेत. याउलट आपली परिस्थिती आहे. 83 टक्के लोक स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी फक्त आणि फक्त शेतीवर अवलंबून आहेत. (Dr. Babasaheb Ambedkar)

आपण शेतीप्रधान राष्ट्र आहोत, यात अभिमान बाळगण्याची गरज नाही. उलट हे आपलं दुर्दैव आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते.1917 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एक शोधनिबंध लिहिला होता, , Small holdings in India, its problems and Remedies. त्यामध्ये त्यांचा निष्कर्ष मांडताना ते म्हणतात की, येणार्‍या काळात आपल्या देशात जमिनीचे अतिशय छोटे छोटे तुकडे होतील (small holdings). थोडक्यात, आपण जे आता पाहतोय की, आपल्याकडे 83 टक्के शेतकरी अल्पभूधारक आहे.

अल्पभूधारक म्हणजे 1 किंवा 2 एकरचा मालक. शेतीचे अतिशय लहान लहान तुकडे झाल्याने एवढ्याशा प्लॉटवर उत्पादकता वाढवणे अशक्य गोष्ट आहे. कितीही पाणी, वीज, बियाणे व आधुनिक अवजारे दिली तरी उत्पादनाचे scaling up ज्याला म्हणतात, ती केवळ अशक्य असणारी गोष्ट आहे. ही पुढच्या काळात येणारी समस्या असणार आहे. यापेक्षा वेगळं आपण आता काय पाहतोय. हीच सर्वात भेडसावणारी समस्या आहे हे आपण आता अनुभवतोय.सातत्याने जमिनीचा कमी कमी होत जाणारा आकार हा अतिशय धोकादायक ठरू शकतो आणि याला उपाय जर कोणता असेल तर तो collective farming अथवा सहकारी शेती.

1943 साली डॉ. बाबासाहेब म्हणाले होते, आपल्या देशात आज जर पाण्याचे नियोजन केले नाही तर आपल्याकडे पुढच्या 75 वर्षांत पाण्याचे दुर्भिक्ष अनुभवायला मिळेल. पाण्यासाठी रक्त सांडले जाईल, आपण हेही अनुभवतोय. शेतीला पाण्याची अतिशय गरज आहे हे आपण जाणतो. डॉ. बाबासाहेब पुढे म्हणतात, पाणी साठवण, पाण्याचे नियोजन करणे अत्यावश्यक बाब आहे. ज्या प्रदेशात पाऊस कमी पडतो, तिथे आपल्याला पाणी घेऊन जाणे गरजेचे आहे. साधारणपणे उत्तरेतल्या नद्यांना वर्षातून दोनवेळा पूर येतो. त्या दुथडी वाहत असतात. एकदा पावसाळ्यात आणि दुसरे उन्हाळ्यात बर्फ वितळताना. हे उत्तरेतलं पाणी दक्षिणेत घेऊन जाणं गरजेचं आहे. थोडक्यात, उत्तरेतल्या नद्या दक्षिणेतल्या नद्यांशी जोडल्या जाव्यात, ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची महत्त्वाकांक्षी योजना होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, माझा (भारतीय शेतकरी) शेतकरी गरीब आहे आणि या गरिबीमुळे त्याच्याकडे शेतीसाठी लागणार्‍या गुंतवणुकीला पैसे उरत नाहीत. त्याच्याकडे पुरेशी अवजारे नसतात, तो पाणी विकत घेऊ शकत नाही, लागणारी वीज त्याला परवडत नाही, चांगलं बियाणं त्याच्याकडे नसतं. यामुळे शेतीची उत्पादकता तो वाढवू शकत नाही. (Dr. Babasaheb Ambedkar)

त्यासाठी त्रिसूत्री उपाय डॉ. बाबासाहेबांनी सुचवले होते. 1. शेतीला लागणारे अवजार आधुनिक असले पाहिजे. पारंपरिक पद्धतीने केलेली शेती कधीच समृद्धी आणू शकणार नाही. 2. आधुनिकीकरण करण्यासाठी म्हणजे जमिनी छोटे तुकड्यांचे एकत्रीकरण होणं आवश्यक आहे. 3. शेतीला चांगल्या बी-बियाण्यांची गरज आहे. त्याशिवाय शेती चांगली होऊ शकत नाही. वरील तिन्ही गोष्टी शेतकर्‍याला पुरवण्याची जबाबदारी सरकारची असेल. थोडक्यात, शेतकर्‍याला शेतीसाठी लागणारा खर्च सरकारने केला पाहिजे, ही सरकारची जबाबदारी आहे. शेतमालाला हमीभावापेक्षा in advance शेतीसाठी लागणारा खर्च सरकारने दिला पाहिजे. या सूचनेचे महत्त्व आज जाणवते.

शेती जर चांगली व्हावी वाटत असेल तर पावसाची गरज आहे. पाऊस जर मुबलक हवा असेल तर जंगलांचे हरित पट्टे निर्माण करणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारने वनीकरणाचा कार्यक्रम तातडीने हाती घेण्याची गरज आहे. याशिवाय मुबलक पाऊस पडणे शक्य नाही. आजही या विषयावर आपण गंभीर नाही. एकूणच पावसाच्या आणि निसर्गाच्या अनिश्चितपणामुळे शेतकर्‍याला केवळ शेतीवर अवलंबून राहणे अवघडच नव्हे तर ते असंभव आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मत होते. (Dr. Babasaheb Ambedkar)

याचा पुरेपूर अनुभव आपण घेतोय. ग्रामीण भागात शेतीला पूरक असे उद्योग निर्माण झाले पाहिजे. शेतमालावर processing करणारे उद्योग, कुटीर उद्योग, कुक्कुटपालन, पशुधन, यावर आधारित उद्योगधंदे ग्रामीण भागात निर्माण केल्याने नोकर्‍या निर्माण होतील. कोणतेही उद्योग निर्माण करायचे असतील तर त्यासाठी वीजनिर्मिती होणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारकडून प्रयत्न व्हायला पाहिजेत, असे त्यांचे मत होते.

ग्रामीण भागात कुटीर उद्योग निर्माण केल्याने नोकर्‍या निर्माण निश्चितच होतील; परंतु यावर कोणतेही सरकार काम करताना दिसत नाही, हे देशाचे दुर्दैव आहे. एकूणच निव्वळ शेतीवर शेतकरी उदरनिर्वाहासाठी अवलंबून राहू शकत नाही. शेतीवर आधारित उद्योग, शेतीसाठी लागणार्‍या अवजारांचा उद्योग, शेतमालावर प्रक्रिया करणारा उद्योग, कुक्कुटपालनावर आधारित उद्योग, पशुधनावर आधारित उद्योग असे अनेक उद्योग ग्रामीण भागात उभे करता येतील. त्यातून नोकर्‍या, व्यवसाय निर्माण होतील. यावर एकमत होऊन सरकारने काम करण्याची गरज आहे. यालाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रामीण विकासाचे मॉडेल निश्चितपणे म्हणू शकतो.

सुनील कदम, ठाणे
(आंबेडकरी विचारांचे अभ्यासक)

दैनिक पुढारी वृत्तपत्रामध्ये पूर्वप्रसिद्धी दिनांक 6 डिसेंबर 2020

Back to top button