Dr. Babasaheb Ambedkar : माणगाव परिषदेत राजर्षी शाहू म्हणाले, बाबासाहेब राष्ट्रीय नेते होतील... - पुढारी

Dr. Babasaheb Ambedkar : माणगाव परिषदेत राजर्षी शाहू म्हणाले, बाबासाहेब राष्ट्रीय नेते होतील...

भारतातील कोट्यवधी लोकांच्या सर्वंकष दुःखाला आणि दारिद्य्राला जबाबदार ठरलेला हिंदू समाजामधील अस्पृश्यतेचा दुष्ट आणि घृणास्पद कलंक पूर्णपणे नष्ट व्हावा, म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) या प्रकांड पंडिताने जो लढा उभा केला, त्यालाही आता जवळजवळ शंभर वर्षे होत आली आहेत. याच क्रांतिकारी लढ्यातील एक महत्त्वाची घटना म्हणून त्यावेळच्या कागल संस्थानातील माणगाव या ठिकाणी 21 व 22 मार्च 1920 रोजी शाहू छत्रपती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्‍त प्रयत्नाने अस्पृश्यांच्या भरलेल्या परिषदेचा विचार करावा लागेल.

अस्पृश्यता समूळ नष्ट करण्याच्या प्रश्‍नाबाबत अनुभूतीवाल्यांना सहानुभूतीवाल्यांनी शिकवू नये. आमच्या या प्रश्‍नात सवर्णांनी नाक खुपसण्याचे काही कारण नाही, अशी डॉ. बाबासाहेबांची अस्पृश्यता प्रश्‍नासंबंधीची कडक भूमिका होती. त्यामधूनच ते श्री. म. माटे यांच्या अस्पृश्यता निवारण प्रयत्नांवर तुटून पडतात. 20 मे 1927 च्या ‘बहिष्कृत भारत’मध्ये डॉ. आंबेडकर लिहितात, ‘ब्राह्मणांत अस्पृश्यता निवारणाची सोंगे घेऊन मिरवणार्‍या लोकांपैकी माटे मास्तर हे एक आहेत.’ तर 21 मार्च 1936 च्या ‘जनता’ पत्रकात नाटककारांनी चालविलेले ‘अस्पृश्यता निवारण’ या लेखामध्ये प्रबोधनकार ठाकरे यांच्या ‘स्वरा ब्राह्मण’ या नाटकाची टर उडवितात. इतकेच नव्हे तर ‘बहिष्कृत भारत’मध्ये ज्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा ऋषीराज असा गौरवाने उल्‍लेख येतो. त्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची अस्पृश्यता निवारणाची तळमळ त्यांना मान्य होती. (Dr. Babasaheb Ambedkar)

परंतु, साऊथबरो कमिटीपुढे म. शिंदे यांनी दिलेली साक्ष त्यांना अस्पृश्यांवर अन्याय करणारी वाटत होती. म्हणून 1919 पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्यासारखा ‘बोले तैसा चाले’ या कोटीतील महामानव यांच्यामध्येही मतभेद झालेले पहावयास मिळतात.

महर्षी शिंदे यांना मध्यवर्ती कायदे मंडळात जातवार मतदार संघातून प्रतिनिधी निवडण्याचे तत्त्व मान्य नव्हते शाहू छत्रपतींचे अस्पृश्यता निवारण याउलट शाहू छत्रपती ब्रिटिश सरकारकडे म्हणजेच माँट्येंग्यू चेम्सफर्ड समितीपुढे जातवार मतदार संघाची जोरदार मागणी करीत होते. इतकेच नव्हे तर जाती संस्था नष्ट करण्यासाठी जातवार सभा भरवा, असे मनःपूर्वक सांगून आपल्या जातीचे नेतृत्व आपल्या जातीच्या पुढार्‍यांकडे द्या, असे कळकळीचे आव्हान ते करीत होते.

शाहू छत्रपती यांनी कोल्हापूर संस्थानात अस्पृश्यता समूळ नष्ट करण्यासाठी, नोकर्‍यांमध्ये राखीव जागा, अस्पृश्यांना मोफत शिक्षण, अस्पृश्यता निवारणाचे विविध कायदे करून त्यांची कडक अंमलबजावणी केली.

आपल्या संस्थान सेवेतच अस्पृश्यांची नेमणूक नव्हे, तर देवाचा पुजारी म्हणून गणू महार यांच्यासारख्या अस्पृश्य व्यक्‍तीची जाणीवपूर्वक नेमणूक करणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या क्रियाशील प्रकांड पंडिताचा स्नेह आपणहून वाढविणे आणि त्याही पुढे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुरू करीत असलेल्या ‘मूकनायक’ या पत्रकाची पैसे देऊनही ‘केसरी’मध्ये जाहिरात छापली जात नव्हती, त्या ‘मूकनायक’ पत्रकासाठी डॉ. आंबेडकरांना 2500 रुपयांची मदत करून ‘मूकनायक’ बोलके करण्याची महत्त्वाची भूमिका शाहू छत्रपतींनी पार पाडणे, इत्यादी अनेक कारणांमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना शाहू छत्रपतीच आपला ‘खरा सखा’ असल्याची खात्री पटली होती. गेली हजारो वर्षे सवर्ण हिंदूंच्या आर्थिक, धार्मिक, सामाजिक आणि राजकीय गुलामगिरीत अडकून पडलेल्या दलितांना प्रथम तुम्ही गुलाम आहात, हे माहीत करून देणे अतिशय आवश्यक होते. (Dr. Babasaheb Ambedkar)

जनावरांकडून जनावरे बनविण्यार्‍या या सनातनी समाजव्यवस्थेविरुद्ध बंड करून उठण्याची गरज आहे. म्हणून तुम्ही सर्व संघटित व्हा आणि या जुलमी सर्वंकष गुलामगिरीविरुद्ध संघर्ष करा. आता तरी जागे व्हा, असे दलितांना त्यांच्यापैकी कोणी तरी शहाण्या व्यक्‍तीने सांगणे महत्त्वाचे होते. नेमकी तीच भूमिका डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याकडे घेतली.

याच हेतूने ते दलितांना एकत्र आणू लागले. त्यामधूनच अस्पृश्यांच्या परिषदा भरविणे सुरू झाले. अस्पृश्यता निवारण चळवळीचे नेतृत्व सवर्ण नेत्यांनी करावे, हे त्यांना मंजूर नव्हते. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुंबई येथे 1918 च्या मार्च महिन्यात महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या पुढाकाराने आणि बडोद्याचे सयाजीराव गायकवाड महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषदेला हजर राहिलेले दिसत नाहीत.

माणगाव परिषदेचे नियोजन (Dr. Babasaheb Ambedkar)

अस्पृश्यता निवारण चळवळीचे नेतृत्व आपल्या हाती घेत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपला ‘खरा सखा’ असलेल्या राजर्षी शाहू छत्रपतींची मदत पुढे सतत घेतलेली दिसते. 21 आणि 22 मार्च 1920 रोजी माणगाव येथे झालेली ही अस्पृश्यांची परिषद पूर्वनियोजित होती आणि शाहू छत्रपती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महामानवांच्या संयुक्‍त प्रयत्नातून ती आकाराला आली होती. याचे अनेक पुरावे आता उपलब्ध झाले आहेत.

अलीकडे काही विचारवंतांना महामानवांमधील सहयोगापेक्षा त्यांच्या मतभेदावर आपले लक्ष केंद्रित करण्यात अधिक धन्यता वाटते. त्यामधूनच माणगाव परिषदेच्या पूर्वनियोजनासंबंधी काही चुकीची विधाने केली जातात. परंतु, माणगाव परिषद- 61 वा स्मृतिमहोत्सव विशेष अंकात प्रज्ञावत गौतम यांनी गंगाधर यशवंत पोळ या प्रत्यक्ष माणगाव परिषदेत सहभागी असलेल्या व्यक्‍तीची मुलाखत शब्दांकित केली आहे. (Dr. Babasaheb Ambedkar )

त्या मुलाखतीत पोळ सांगतात, ‘दत्तोबा पोवारांनी पुढाकार घेऊन शाहू महाराज व कोल्हापुरातील अस्पृश्यांचे पुढारी डॉ. रमाकांत कांबळे, गंगाराम कांबळे, तुकाराम गणाचारी, शिवराम कांबळे, रामचंद्र कांबळे, निंगाप्पा ऐदाळे या सर्वांशी चर्चा करून त्यांच्या गाठीभेटी घेऊन त्याचवेळी डॉ. आंबेडकरांशी पत्रव्यवहार करून 20 मार्च 1920 या दिवशी, त्यावेळी अस्पृश्य समाजाशी विशेष प्रेमभावना असलेल्या सुधारक मतांच्या गावकामगार पाटलांच्या (श्री. अण्णासाहेब दादगोंडा पाटील) कागल जहागिरीतील माणगाव या गावी, अस्पृश्यांची पहिली सभा डॉ. आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्याचे ठराव व पत्रके छापली. याच अंकात शाहू छत्रपतींनी सुरू केलेल्या मिस क्‍लार्क वसतिगृहाचे सुपरिटेंडन्ट लिंगाप्पा आयदाळ यांची ही साक्ष या निवेदनाला देणारी अशीच आहे.

माणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली भव्य मंडपात भरलेल्या या अस्पृश्यांच्या सभेला पहिलाच दिवस पाडवा सणाचा असूनही 5000 लोकांचा समुदाय जमला होता. माणगाव येथील अण्णासाहेब दादगोंडा पाटील या गावप्रमुखाचा ही परिषद घडवून आणण्यात सिंहाचा वाटा होता.

परिषदेचे प्रत्यक्ष कामकाज

या परिषदेच्या पहिल्या दिवशी म्हणजे 21 मार्च रोजी डॉ. बाबासाहेबांनी आपल्या भाषणात अस्पृश्यांच्या आर्थिक, धार्मिक, राजकीय आणि
सांस्कृतिक- सामाजिक अशा सर्वांगीण गुलामगिरीला दुःख, अन्याय आणि दारिद्य्राला हिंदू समाजाची जुलमी वर्णव्यवस्था कशी जबाबदार आहे, हे सविस्तरपणे पटवून दिले आणि या अन्यायी समाजव्यवस्थेविरुद्ध बंड करण्याचे आपल्या दलित बांधवांना कळकळीचे आव्हान केले. तर या परिषदेच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे 22 मार्च रोजी शाहू छत्रपतींनी आपल्या लेखी भाषणात कोल्हापूर संस्थानामध्ये अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी अस्पृश्य लोकांची हजेरी घेण्याची क्रूर पद्धत बंद करणे, महार वतन आणि कुलकर्णी वतनाची जुलमी प्रथा कायद्याने नष्ट करणे, सर्व जातीतील व्यक्‍तींना तलाठी आणि वकील म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध करून देणे, या आपण केलेल्या प्रयत्नांची सविस्तर माहिती दिली. (Dr. Babasaheb Ambedkar )

त्याही पुढे जाऊन लवकर आपण अस्पृश्यांना जातवार मतदार संघातून त्यांचे प्रतिनिधी मध्यवर्ती कायदे मंडळात निवडून देण्यासंबंधी ब्रिटिश सरकारला भाग पाडणार आहे, हेही सांगितले आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अस्पृश्यांचे नेतृत्व अस्पृश्य नेत्यांनीच केले पाहिजे हा लाखमोलाचा सल्‍ला शाहू छत्रपतींनी मोठ्या कळकळीने पुढील शब्दांत दिला होता. ‘तथापि, मी येथे जमलेल्या सर्व लोकांस हीच विनंती करतो की, आतापर्यंत आम्ही निकृष्ट अवस्थेस पोहोचण्याचे कारण आम्ही आमचा योग्य पुढारी शोधून काढीत नाही.

गोड बोलून नावलौकिक मिळविण्याच्या हेतूने आमच्यापैकी काही आपलपोटी मंडळी अयोग्य पुढारी नेमून देऊन अज्ञानी लोकांना फसवितात. पशू-पक्षीदेखील आपल्याच जातीचा पुढारी करतात, पक्ष्यांत कधी चतुष्पादाचा पुढारी झाला नाही. चतुष्पादी कधीही पक्ष्यांचा पुढारी नसतो. गाय, बैल, मेंढरे यात मात्र धनगर त्यांचा पुढारी असतो. त्यामुळे शेवटी त्यांना कसाबखान्यात जावे लागते.’

आपल्या भाषणात शेवटी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रजपूतवाडीस येण्याची तसदी घेऊन आपल्याबरोबर भोजन करण्याची विनंती करण्यास शाहू छत्रपती विसरले नव्हते!

परिषदेतील ठराव

या परिषदेतील एकूण पंधरा ठराव मान्य करण्यात आले. त्यामध्ये अस्पृश्यता निवारणाचा वेग वाढेल, असे काही महत्त्वाचे ठराव जसे होते तसे राजर्षी शाहू छत्रपती आणि माणगावचे प्रमुख अण्णासाहेब दादगोंडा पाटील या दोघांसंबंधी कृतज्ञता व्यक्‍त करणार्‍या ठरावांचाही समावेश आहे. याखेरीज एक महत्त्वाचा ठराव ‘मूकनायक’च्या अंकात वाचावयास मिळतो. तो म्हणजे येथून पुढे कोणत्याही महार व्यक्‍तींनी गावातील मृत जनावरे ओढून नेऊन त्यांची विल्हेवाट लावण्याचे घृणास्पद काम करण्याचे नाही, हा होय.

अशी ही 21 आणि 22 मार्च 1920 रोजी माणगाव येथे राजर्षी शाहू छत्रपती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहयोगातून अस्पृश्यांची कोल्हापूर भागात झालेली अविस्मरणीय अशी परिषद होय. ही परिषद म्हणजे 30, 31 मे आणि 1 जून 1920 रोजी नागपूर येथे शाहू छत्रपतींच्या अध्यक्षतेखाली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रमुख नेतृत्वाखाली भरलेल्या अखिल भारतीय बहिष्कृत समाजाच्या प्रचंड मोठ्या परिषदेची जणू रंगीत तालीमच होती. राजर्षी शाहू छत्रपती आणि डॉ. बाबासाहेबांना नागपूर परिषदेत
परस्परांची उपस्थिती किती अनिवार्य आणि महत्त्वाची वाटत होती, हे त्यांच्या पत्रव्यवहारांमधून लक्षात येते.

माणगाव परिषदेचे परिणाम

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाने साकारलेली आणि राजर्षी शाहू छत्रपतींच्या प्रमुख उपस्थितीने विशेष गाजलेल्या माणगाव अस्पृश्य परिषदेचे चांगले आणि वाईट, असे दोन्ही प्रकारचे परिणाम आपणास पहावयास मिळतात.

या परिषदेचा सर्वात वाईट परिणाम म्हणजे माणगाव आणि इतर असंख्य गावांत महार समाजाला सवर्णांच्या सर्व प्रकारच्या बहिष्काराला तोंड द्यावे लागले होते. 10 एप्रिल 1920 च्या ‘मूकनायक’मध्ये ऐदाळे नावाचे गृहस्थ लिहितात, श्रीजन्महाराज सरकार करवीर तुम्हाला सर्वतर्‍हेची मदत देऊन तुमचे आयुष्य सुखात घालवतील, असे म्हणून अस्पृश्यांना गावात येण्याची दुकानात माल खरेदी करण्याची व बायका- मुलांस रानात सर्पण फाट्यास फिरण्याची व मोटेवर पाणी भरण्याची बंदी होत आहे.

अस्पृश्य लोक जवळच्या गावांतून माल आणण्याचे काम करीत असून नदीतून दोन मैलावरून पाणी आणीत आहेत. माणगावचे प्रमुख पुढारी अण्णासाहेब दादगोंडा पाटील यांनाही गावच्या बहिष्काराच्या त्रासाला- अमानुष छळाला सामोरे जावे लागले. परंतु, या भल्या गृहस्थाने आपले अस्पृश्यता निवारणाचे कार्य सोडले नाही.

त्यांनी कोणत्याही प्रकारची तडजोड केली नाही. याउलट सवर्णांच्या पुढे एक उत्तम ‘आदर्श’ निर्माण केला. हा या परिषदेचा एक महत्त्वाचा चांगला परिणाम मानावा लागेल. तर दुसरा चांगला परिणाम माणगाव आणि इतर अनेक खेड्यांतून महार लोकांनी मृत जनावरे ओढण्याची त्यांच्या आरोग्याला घातक असणारी दुष्ट प्रथा सोडून दिली आणि तिसरे सर्वात महत्त्वाची या परिषदेचे फलश्रुती म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखे प्रकांड पंडित आणि चारित्र्यसंपन्‍न नेतृत्व दलित समाजाला लाभले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीच 1939 साली कोल्हापूर येथे दलित प्रजा परिषदेत बोलताना हे मोठ्या अभिमानाने पुढील शब्दांत सांगून टाकले होते. ‘कै . शाहू छत्रपतींनी समाजातील विषमता नष्ट करण्याचा आटोकाट प्रयत्न केला व ब्राह्मण्याचा बालेकिल्‍ला ढासळून टाकला. ही एक काही लहान कामगिरी नाही. माझ्या सार्वजनिक आयुष्याचा श्रीगणेशा कै. छत्रपती महाराजांच्या अध्यक्षतेखाली झाला. ह्या माणगावच्या परिषदेतच मी गिरविला होता.’ ही गोष्ट येथे नमूद करणे आवश्यक आहे.

संदर्भ- 1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बहिष्कृत भारत आणि मूकनायक- संपादन- वसंत मून- Education Department, Govt. of Maharashtra 1990.
2) जनता पत्रातील लेखड डॉ. बाबासाहेब आंबेडकर- संपादक अरुण कांबळे.
3) माणगाव परिषदेहून 61 वा स्मृतिमहोत्सव विशेष अंक- दि. 20 व 21 मार्च 1982 संपादक- प्रा. रमेश ढावरे.
4) लोकराजा शाहू छत्रपती – डॉ. रमेश जाधव

दैनिक पुढारी वृत्तपत्रामध्ये पूर्वप्रसिद्धी दिनांक १४ एप्रिल २०१६

 

 

 

 

Back to top button