यशवंतराव चव्हाण : महाराष्ट्र राज्याच्या शिल्पकारांचा खजाना पाहण्यासाठी एकवेळ ‘विरंगुळा’ पहायलाच हवा ! - पुढारी

यशवंतराव चव्हाण : महाराष्ट्र राज्याच्या शिल्पकारांचा खजाना पाहण्यासाठी एकवेळ ‘विरंगुळा’ पहायलाच हवा !

– मोहनराव डकरे, सचिव, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई विभागीय केंद्र, कराड.

नवमहाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांचे रविवार दि. 25 नोव्हेंबर रोजी स्मृतीदिन, त्या निमित्ताने…

यशवंतराव चव्हाण यांचे देहावसान दि.25 नोव्हेंबर 1984 रोजी 2 रेसकोर्ड न्यू दिल्ली येथे वास्तव्यास असताना झाले. यशवंतरावजींचा फार मोठा ग्रंथ संचय होता. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र कराड ‘विरंगुळा’ येथे साहेबांचा पत्रव्यवहार आणि इतर साहित्य (कागदपत्रे) विरंगुळ्यात आहेत. साहेबांच्या साहित्यावर पी.एच.डी. करू इच्छिणार्‍या व्यक्तींना प्रतिष्ठानच्या (मुंबई) पूर्व परवानगीने हे साहित्य दाखविले जाते.

काय आहे विरंगुळ्यात, असा प्रश्न अनेक जिज्ञासूना पडतो. विरंगुळ्यात देश विदेशातून साहेबांना पाठविलेली मूळ पत्रे 8024 आहेत. मूळ पत्र कॉम्प्युटरच्या सहाय्याने दाखविण्याची सोय विरंगुळ्यात आहे. साहेबांच्या संदर्भात वर्तमानपत्रातील कात्रणे 1584 आहेत. भारतातल्या नामवंत साहित्यिकांनी यशवंतराव चव्हाण यांच्यावर लिहलेले लेख, तसेच साहेबांनी नानाविध ठिकाणी केलेली 637 भाषणे विरंगुळ्याच्या दफ्तरी आहेत. साहेबांनी मान्यवरांच्या पुस्तकाला दिलेल्या 168 प्रस्तावनाही विरंगुळ्यात आहेत. साहेबांचे स्वतःचे 51 लेख व साहेब यांच्यावर इतरांनी लिहिलेले 142 लेख आहेत. भारतातील 25 विद्यापीठात दिलेली 25 भाषणे (दीक्षांत समारंभात) विरंगुळ्यात आहेत.

आता या भाषणांचे ‘विद्यार्थी मित्रानो’ हे पुस्तकही प्रतिष्ठानने प्रसिद्ध केले आहे. साहेबांच्या जीवनचरित्रावर केलेल्या मान्यवरांच्या 120 कविता संग्रहात आहेत. भारतातील नामवंत 6 विद्यापीठांनी साहेबांना डॉक्टरेट बहाल केली आहे. साहेबांच्या 155 जन्मकुंडल्याही आहेत. करमाळा (सोलापूर जिल्हा) येथील पाठक शास्त्रींनी साहेबांच्या केवळ हाताच्या ठश्यावर लिहलेले भविष्य कथन आहे. साहेबांच्या हाताचे ठसे (मूळ स्वरूपात) विरंगुळ्यातच आहेत.

सौ. वेणूताई साक्षात देवता होत्या. त्यांचा दिवस पहाटे 4 वाजता सुरू व्हायचा. दररोज त्या 208 वेळा ॐ लिहायच्या वही पूर्ण झाल्यावर ती गंगार्पण करावयाची असा त्यांचा नियम होता. 3 वह्या आजही विरंगुळ्यात आहेत. ‘विरंगुळा’ हे साहेबांचे स्वतःचे निवासस्थान आहे. माझे पंधरा वर्षांपासून विरंगुळ्याशी नाते आहे. मी मोठा भाग्यवान आहे.

Back to top button