साडेतीन शक्तिपीठांपैकी एक कोल्‍हापुरच्या अंबाबाईचा नवरात्रौत्‍सव - पुढारी

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक कोल्‍हापुरच्या अंबाबाईचा नवरात्रौत्‍सव

कोल्‍हापूर; पुढारी ऑनलाईन : अंबाबाईचा नवरात्रौत्‍सव : साडेतीन शक्‍तिपीठापैकी एक प्रमुख पीठ म्‍हणून कोल्‍हापूरच्या अंबाबाईची देशभर ओळख आहे. पंचगंगा नदीच्या तीरावर वसलेल्‍या कोल्‍हापूरला दक्षिण काशी असेही म्‍हणतात. हेमाडपंथी पध्दतीचे बांधकाम असलेले हे मंदिर म्‍हणजे स्‍थापत्‍यशास्‍त्राचा एक उत्‍कृष्‍ट नमुना आहे. मंदिराची रचना तारकाकृती असून मुख्य मंदिराच्या गाभार्‍यात दगडी चबुतर्‍यावर अंबाबाईची मुर्ती स्‍थानापन्न आहे. श्री अंबाबाई मंदिरातील शारदीय नवरात्रौत्सवात भावभक्तीला अक्षरश: पूर येतो. नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजे भाविकांच्या मर्मबंधातील ठेवच ठरते. श्री अंबाबाई दर्शनासाठी लाखो भाविकांची मांदियाळी करवीरनगरीत दाखल होते. भक्तिरसात चिंब होत असलेल्या या नवरात्रौत्सवाच्या सोहळ्याचे हे शब्दचित्र…..

आश्‍विन शुद्ध प्रतिपदा या दिवशी करवीरनिवासिनी अंबाबाईच्या नवरात्र महोत्सवास सुरुवात होते. दक्षिण व पश्‍चिम महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून आणि कर्नाटक, आंध्र प्रदेशातूनही या महोत्सवास लाखो भाविक कोल्हापुरात येतात व देवीच्या दर्शनाचा लाभ ‘घेतात. महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत असणार्‍या या श्री ;अंबाबाईचा नवरात्र सोहळा मोठ्या उत्साहाने अंबाबाई मंदिरात साजरा केला जातो. अनेक लोक या नऊ दिवसांत कोल्हापुरात राहतात व धार्मिक विधी पूर्ण करतात. पूजा- अर्चा, जप, उपवास व सप्तशतीच्या पाठांचे वाचन हा धार्मिक विधीतील भाग असतो.

नवरात्राच्या पहिल्याच दिवशी म्हणजे आश्‍विन शुद्ध प्रतिपदेदिवशी मंदिरात घटस्थापना केली जाते. यावेळी पुण्याहवाचन करून धार्मिक विधीने कलश पूजन करून दीपदेवतेची यथासांग पूजा करून नवरात्राला सुरुवात होते. त्यानंतर देवीची नित्य पूजा-अर्चा, आरती असा कार्यक्रम सुरू होतो. घटस्थापना झाल्यानंतर तोफेची सलामी दिली जाते. नवरात्रातील प्रतिपदा, पंचमी, अष्टमी व नवमी या चार दिवशी विविधता आढळते. या प्रत्येक दिवशी देवीच्या कार्यक्रमा काहीसा बदल केला जातो.

पंचमीच्या दिवशी अंबाबाई पालखीमध्ये विराजमान होऊन येथून तीन मैलांवर असलेल्या त्र्यंबुली देवीला भेटण्यासाठी जाते. या दिवशी त्र्यंबुलीच्या टेकडीवर मोठी यात्रा भरलेली असते. लाखो नागरिक या यात्रेत भाग घेतात. या दिवशी सकाळी 10 वाजता अंबाबाईची पालखी मंदिरातून निघते. वाटेमध्ये शाहूमिलमध्ये व टाकाळा येथील तळ्याच्या ठिकाणी भेट दिली जाते. टाकाळा येथील परिसरातील लोक मोठ्या भाविकतेने देवीची आरती करतात. त्यानंतर दुपारी ठीक 12.00 वाजता देवीची पालखी त्र्यंबुली देवीच्या मंदिरात प्रवेश करते.

दोन्ही देवतांच्या भेटीचा सोहळा अत्यंत प्रेक्षणीय असतो. भेटीच्या वेळी आरती केली जाते. त्या ठराविक 2 ते 3 मिनिटांच्या काळात दोन्ही देवता तेजःपुंज दिसतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यानंतर देवी परत पालखीत विराजमान झाल्यानंतर बाहेरील चौकात कुष्मांड (कोहळा) बळी दिला जातो व त्यानंतर पालखी परतते. रस्त्यात अनेक भक्त आरती, पूजा करतात. पालखीने मंदिरात प्रवेश केल्यानंतर परत देवीची आरती केली जाते.

अष्टमी हा दिवस नवरात्रातील महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी देवीचा जागर होतो. या जागराच्या दिवशी देवी निद्रा घेत नाही, अशी पारंपरिक भावना आहे. या दिवशी देवीच्या नित्यक्रमातही बदल होतो. रात्री 8.00 वाजता देवी सिंहासनावर आरूढ होते व देवीची नगरप्रदक्षिणा करण्यासाठी वाजंत्री, लवाजमा यासह मिरवणूक निघते. अनेक भाविक या मिरवणुकीत मोठ्या उत्साहाने भाग घेतात. यावेळी काही स्त्रियांच्यात देवीचा संचार होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. अष्टमीच्या दिवशी देवीच्या नित्यक्रमातील शेजारती होत नाही. रात्री 12 च्या पुढे देवीची यथासांग पूजा सुरू होते. ही पूजा साधारणतः 2 ते 3 तासांपर्यंत चालते.

नवमी हा नवरात्राचा शेवटचा दिवस. या दिवशी धार्मिक विधी वेगळ्या प्रकारचा असतो. मंदिरातील महाकालीच्या मंदिरासमोर विटांचा कुंड तयार केला जातो. या कुंडामध्ये 3.00 वाजता देवीच्या सप्तशतीपाठांचे (लक्ष्मी- नारायण पाठांचे) वाचन सुरू होते. वाचन सुरू असतानाच होमकुंडामध्ये तीळ, तांदूळ, तूप या साहित्याचे हवन सुरू असते. हा विधी तीन तास चालतो. या हवनाच्या वेळी वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे कुष्मांडबळी (कोहळ्याचे फळ) दिला जातो. उत्तरार्धात तुपाची आहुती समर्पित केली जाते. यावेळी अनेक महिला या होमामध्ये खण व नारळाची आहुती देतात. पूर्णाहुती झाल्यानंतर नवरात्र उठते. साधारणतः 2 ते 2.30 तासानंतर देवीचा दरवाजा उघडला जातो व पूर्ववत कार्यक्रम सुरू होतात.

नवरात्रीतील नित्य कार्यक्रमामध्ये पहाटे 4.45 वाजता दरवाजा उघडतो. त्यानंतर देवीच्या पायावर दुधाचे स्नान व पूजा होऊन काकड आरती म्हणून देवीला आळविले जाते. परत 9 वाजता देवीचे स्नान, पूजाविधीनंतर 12.00 वाजता भक्त लोकांतर्फे देवीला महापूजा पाद्यपूजा, कुंकुमार्चन असे अनेक विधी केले जातात. त्यानंतर आरतीचा कार्यक्रम झाल्यावर देवीची अत्यंत आकर्षक पूजा बांधली जाते. या पूजेवेळी जडजवाहिरे व सोन्याचे दागिने यांनी मढविलेल्या देवीचे दर्शन नेत्राचे पारणे फेडणारे असते.

सिंहारूढ, खडीपूजा, हत्ती आरूढ, गरुडारूढ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा मंदिरातील पुजारी मोठ्या कौशल्याने बांधतात. ही पूजा पाहण्यासाठी हजारो लोकांची रांगच्या रांग मंदिराच्या आवारात उभी असते. रात्रौ 8.15 वाजता परत आरती होते. त्यानंतर 9.30 वाजता मोठ्या उत्साही वातावरणात मंदिराच्या परिसरातून देवीची पालखी प्रदक्षिणा होते. 10.00 वाजता पालखी गरुड मंडप येथे येऊन देवी सिंहासनारूढ होते. प्रदक्षिणेमध्ये पालखी सात ठिकाणी थांबते. भालदार-चोपदार, वाजंत्री हा लवाजमा सोबत असतो.

गरुड मंडपामध्ये भक्त मंडळातर्फे देवीसमोर विविध कलाकारांचे गायन होते. 11.00 वाजता तोफेची सलामी होऊन पालखी परत मंदिरात प्रवेश करते. त्यानंतर आरती होऊन देवीची पूजा उतरली जाते. 11.30 वाजता देवीची शेजारती होऊन दिवसभराचा कार्यक्रम संपतो. प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत देवीच्या मंदिरात विविध कार्यक्रम केले जातात. अंबाबाई भक्त मंडळातर्फे आश्‍विन शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी महाप्रसाद केला जातो. देवीसमोर नित्य कार्यक्रम, विद्युत रोषणाई व देवीच्या पालखीवेळी पायघड्या घालणे हे भाग महालक्ष्मी भक्त मंडळ सांभाळतात. दसरा तथा विजयादशमी या दिवशी देवीची पालखी सायंकाळी पाच वाजता मंदिरातून निघते. कोल्हापुरातील दसरा चौकामध्ये दरबारी लोकांसमवेत सोने लुटण्याचा कार्यक्रम केला जातो. त्यानंतर अंबाबाईची पालखी दलित वस्तीतून नेण्यात येते. तेथे लोकांतर्फे देवीची आरती होऊन पालखी पंचगंगा नदीवर श्रीधरस्वामींच्या मठाला भेट देते व रात्री नऊ वाजता परत मंदिरात प्रवेश करते.

– नंदकुमार मराठे

हेही वाचलत का?

Back to top button