यावर्षी नवरात्र आठ दिवसांची! - पुढारी

यावर्षी नवरात्र आठ दिवसांची!

दा. कृ. सोमण

नवरात्र उत्सव हा नऊ दिवसच का असतो? असा प्रश्न मनात येणे साहजिकच आहे. याचेही उत्तर आपणास शोधता येते. नऊ हा अंक सर्व अंकांमध्ये मोठा आहे. नऊ ही ब्रह्मसंख्या समजली जाते. निर्मितीशक्ती आणि नऊ अंक यामध्ये एक नाते आहे. धान्य जमिनीत गेल्यावर
नऊ दिवसांनी अंकुरते. नवरात्र उत्सव हा निर्मिती म्हणजे आदिशक्तीचा उत्सव असतो. नऊ दिवस !

सनातन वैदिक धर्म हा माणसाने माणसांशी आणि निसर्गाशी माणसासारखे वागण्याची शिकवण देत असतो. तसेच तो निसर्गातील अनेक शक्तींविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यास सांगत असतो. भारत हा शेतीप्रधान देश आहे. त्यामुळे साहजिकच आपल्या सर्व सण- उत्सवांची रचना ही शेतीच्या वेळापत्रकाप्रमाणे करण्यात आली आहे.

भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होत असते म्हणून पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पार्थिव गणेशपूजन केले जाते. त्यानंतर भाद्रपद कृष्णपक्षात ज्यांनी आपणास जन्म दिला, शिक्षण दिले, जमीन-घर दिले त्या पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. त्यानंतर आश्‍विन महिन्यात शेतात तयार झालेले धान्य घरात येते म्हणून निसर्गातील निर्मितीशक्तीविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते.

निर्मितीशक्ती हीच आदिशक्ती आहे. हे विेश 13.7 अब्ज वर्षांपूर्वी या निर्मितीशक्ती म्हणजे आदिशक्तीमुळेच निर्माण झाले. शेतातील रोपांवर धान्य तयार होते तेही या निर्मिती म्हणजे आदिशक्तीमुळेच ! नवीन पिढी जन्माला येते तीही या निसर्गातील निर्मितीशक्तीमुळेच ! म्हणून नवरात्र उत्सव हा या निर्मिती म्हणजे आदिशक्तीचा उत्सव असतो. नऊ दिवस !

नवरात्र उत्सव हा नऊ दिवसच का असतो? असा प्रश्न मनात येणे साहजिकच आहे. याचेही उत्तर आपणास शोधता येते. नऊ हा अंक सर्व अंकांमध्ये मोठा आहे. नऊ ही ब्रह्मसंख्या समजली जाते. निर्मितीशक्ती आणि नऊ अंक यामध्ये एक नाते आहे. धान्य जमिनीत गेल्यावर नऊ दिवसांनी अंकुरते.

गर्भधारणा झाल्यापासून नऊ महिने नऊ दिवसांनी मूल जन्माला येते. नवरात्र हा निर्मितीशक्तीचा-आदिशक्तीचा उत्सव असल्याने नऊ दिवसांचा असतो. आपल्या ऋषीमुनीनी सण-उत्सवांची रचना करताना विज्ञानाचा किती बारकाईने विचार केला होता ही गोष्ट आपल्या लक्षात येते.

खरी दुर्गापूजा

सण-उत्सव साजरे करण्यामागचा मूळ हेतू शास्त्रशुद्ध होता. परंतु कालांतराने सर्व सण- उत्सव साजरे करण्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक पद्धतीत खूप बदल होत गेला ते आपण पाहतोच. नवरात्र उत्सव साजरा करण्याच्या पद्धतीतही असाच बदल झाला.

नवरात्रात माणसे देवीच्या रूपात असलेल्या निर्मितीशक्तीची पूजा मोठ्या भक्तीभावाने करतात. पूजा झाल्यावर आरती करून नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतात. परंतु घरात वावरणार्‍या माता, भगिनी, कन्या याही देवताच असतात त्यांच्याकडे मात्र दुर्लक्ष करतात हे योग्य नव्हे !

काही लोक तर घरात जन्मणार्‍या देवीला जन्म नाकारतात. ही तर मोठी चूक आहे. मूर्तीच्या रूपात असणार्‍या देवतेपेक्षा जिवंत वावरणारी निर्मितीशक्ती खूप मोठी आहे. पण माणसे किती दांभिक असतात ते या गोष्टीवरून कळून येते.

आदिशक्तीची श्रीमहालक्ष्मी, श्रीमहासरस्वती आणि श्रीमहाकाली ही तीन रूपे आहेत. श्री महालक्ष्मी ही अर्थ आणि संपन्नतेची देवता मानली जाते. घरातील स्त्री ही जर अर्थव्यवहार करण्यात कुशल असेल तर संसार सुखाचा होतो. वाईट मार्गाने घरात जर धन येत असेल तर ती त्याला विरोध करते.

वाईट मार्गाने जर पैसे खर्च होत असतील तर त्यालाही स्त्री विरोध करते. घरात जर स्त्री महालक्ष्मी मानली गेली तर घराला घरपण येते, संपन्नता येते. घरातील ही देवता श्रीमहासरस्वती असली म्हणजे ती सुशिक्षित असली तर मुलांना विविध प्रकारचे ज्ञान देऊ शकते.

घरातील ही देवता जर शारिरीकद‍ृष्ट्या सबला असेल तर ती महाकाली बनून त्रास देणार्‍या गुंडांच्या गुंड प्रवृत्तीचा नाश करू शकते आणि अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याची प्रेरणा नवीन पिढीला देऊ शकते. म्हणून नवरात्र उत्सव आपल्या घरात जिवंतरूपात वावरणार्‍या देवतेकडे जास्त लक्ष देण्यास सांगत असतो. तीच खरी आदिशक्तीची पूजा असते. तीच खरी दुर्गापूजा असते.

नवरात्रात कुठल्या रंगाचे वस्त्र परिधान करावे हे कुठल्याही धर्मग्रंथात सांगितलेले नाही. केवळ रंगाने एकता निर्माण होत असते. त्याच
रंगाचे वस्त्र परिधान केले नसले तरी पाप लागत नसते, किंवा नेसले तर पुण्य मिळत नसते ही गोष्ट लक्षात घ्यावयास हवी.

Back to top button