पर्यावरण : नद्यांची शोकांतिका | पुढारी

पर्यावरण : नद्यांची शोकांतिका

प्रा. डॉ. मधुकर बाचुळकर

भारतामध्ये सर्वसाधारणपणे महत्त्वाच्या 400 नद्या आहेत. या नद्यांना अनेक उपनद्या आहेत. यामध्ये 11 मुख्य नद्या असून त्यांची खोरी मोठी आहेत. यामध्ये गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा, मेघना, तापी, गोदावरी, कृष्णा, नर्मदा, कावेरी, महानदी यांचा आणि जम्मू-काश्मीरमधून उगम पावणार्‍या झेलम, चेनाब, सतलज या नद्यांचा समावेश होतो. महाराष्ट्राचा विचार करता आकारमानाच्या दृष्टीने हे देशातील तिसर्‍या क्रमांकाचे सर्वांत मोठे राज्य आहे. महाराष्ट्रात कृष्णा, गोदावरी, तापी, नर्मदा आणि कोकणातल्या नद्या या मिळून पाच महत्त्वाची नदी खोरे आहेत. यातील कृष्णा, गोदावरी, तापी आणि नर्मदा या नदी खोर्‍यांतून महाराष्ट्राला 55 टक्के पाणी उपलब्ध होऊ शकते; तर कोकणातील 11 नद्यांमधून जवळपास 45 टक्के पाणी मिळू शकतो. महाराष्ट्रात मोठ्या आणि मध्यम नद्या जवळपास 112 आहेत.

धरणांबाबत भारत जगात तिसर्‍या स्थानावर असून आपल्या देशात एकूण 5202 मुख्य धरणे आहेत. जगात सर्वांत जास्त धरणे ही चीनमध्ये असून दुसर्‍या स्थानावर अमेरिका आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण 1121 धरणे असून यामध्ये मोठ्या आकाराची 282 धरणे, तर 75 धरणे ही मध्यम आकाराची आहेत. भारतात सर्वाधिक धरणे महाराष्ट्रात असून त्याखालोखाल मध्य प्रदेश, गुजरात आणि आंध्र प्रदेशचा क्रमांक लागतो. भारतीय द्वीपकल्पामध्ये पाण्याचा मुख्य स्रोत हा नदी असून येथील बहुतांश नद्यांचा उगम पश्चिम घाटात होतो. महाराष्ट्रात पश्चिम घाटातील बराचसा भाग येतो. याच पश्चिम घाटामध्ये 120 मुख्य नद्यांची उगमस्थाने आहेत. यापैकी कृष्णा, गोदावरी, कावेरी, पूर्णा, पैनगंगा, मुळा, इंद्रावती, कोयना, वारणा, पंचगंगा, दूधगंगा, भीमा, मुळशी, घटप्रभा, मलप्रभा, तुंगभ्रद्रा, हेमावती, मोयर, ताम्रपर्णी या मुख्य नद्या आणि उपनद्या पूर्ववाहिनी असून त्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. याखेरीज वैतरणा, धामणगंगा, सावित्री, वसिष्ठी, मांडवी, चाप्रा, तालपोना, काळी, गंगावती, शरावती, पांबर, पेरियार, परमबिकुलम या नद्या पश्चिमवाहिनी असूनही शेवटी त्या अरबी समुद्राला मिळतात. त्यामुळे पश्चिम घाट हा भारतीय द्वीपकल्पासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पश्चिम घाटातील जवळपास सर्व नद्यांवर मिळून 2043 धरणे बांधली गेलेली आहेत. पश्चिम घाटात गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, तमिळनाडूचा काही भाग आणि केरळचा भाग येतो. तथापि, महाराष्ट्र आणि कर्नाटकाचे क्षेत्रफळ जास्त आहे.

पश्चिम घाटातील सर्व नद्या आणि उपनद्यांवर जलविद्युत प्रकल्प उभारले गेलेले आहेत. यातून 10235 मेगावॅटपेक्षाही अधिक वीजनिर्मिती होते. या नद्या-धरणांमधून मिळणारे पाणी आणि त्यावर उभारण्यात आलेले विद्युत प्रकल्प यांवर आपली कृषी व्यवस्था आणि उद्योगजगत अवलंबून आहे. त्यामुळे पश्चिम घाट हा भारतीय द्वीपकल्पाचा आर्थिक कणा आहे.

खरे म्हणजे नद्या ही निसर्गाने आपल्याला दिलेली खूप मोठी देणगी आहे. आपले संपूर्ण भवितव्य नद्यांवर अवलंबून आहे. भारतीय संस्कृतीमध्ये नदीला माता म्हटले जाते. आपल्या जीवनात नद्यांचे इतके अनन्यसाधारण महत्त्व असूनही आपण नद्यांची काळजी घेतो का, याचे उत्तर शोधताना निराशा पदरी येते. कारण आजघडीला देशातील सर्वच्या सर्व नद्यांचे प्रदूषण झालेले आहे. किंबहुना, नदी प्रदूषण ही आजची सर्वांत मोठी समस्या आहे. या प्रदूषणाला अनेक कारणे आहेत. त्यापैकी एक म्हणजे, औद्योगिक प्रकल्पांमध्ये तयार होणारे रसायनमिश्रित पाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नद्यांमध्ये सोडले जाते. वास्तविक राज्या-राज्यात प्रदूषण नियंत्रण मंडळे आहेत, नदी प्रदूषणासंदर्भात नियम-कायदे आहेत; पण ते सर्व धाब्यावर बसवून राजरोसपणाने नद्यांचे प्रदूषण होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायती यांच्याकडूनही गावा-शहरांमधील सांडपाणी कसलीही प्रक्रिया न करता नद्यांमध्ये सोडले जाते. वास्तविक या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते शेतीसाठी वापरता येणे शक्य आहे. पण त्याबाबत गांभीर्य दिसून येत नाही.

केवळ औद्योगिक प्रकल्प आणि गावा-शहरांमधून जाणार्‍या सांडपाण्यामुळेच नद्यांचे प्रदूषण होत नाही; तर आधुनिक शेतीसुद्धा नदीप्रदूषणास जबाबदार आहे. कारण या शेतीमध्ये रासायनिक खते, कीटकनाशके, तणनाशके यांचा बेसुमार वापर केला जातो. तसेच पाण्याचाही अतिरेकी वापर केला जातो. यामुळे आपल्या जमिनी प्रदूषित झाल्या आहेत. शेतांना अवाजवी पाणी दिल्यामुळे ते झिरपून पुन्हा नद्यांकडे जाते. पर्यायाने नद्यांचेही प्रदूषण होते. कारण आपल्याकडे बहुतांश शेती ही नदीजवळच्या भागातच आहे. आज नद्यांच्या पाण्यामध्ये नायट्रोजनचे प्रमाण यामुळे वाढत चालले असून त्यातून शेवाळही वाढत चालले आहे.

महाराष्ट्रातील सर्व नद्यांचे पाणी पाहिल्यास त्याचा रंग हिरवट दिसून येतो. हे शेवाळ कुजल्यामुळे पाण्याचा कुबट वास येतो आणि ते पिण्यायोग्य उरत नाही. अशा प्रदूषित पाण्यामध्ये तणवर्गीय वनस्पतींची मोठ्या प्रमाणावर वाढ होते. केंदाळ किंवा जलपर्णीनी व्यापलेल्या नद्या महाराष्ट्राला नव्या नाहीत. देशभरातील नद्यांचीही थोड्या फार फरकाने हीच स्थिती आहे. या प्रदूषणास सर्वस्वी जबाबदार आपण आणि आपली आधुनिक जीवनशैली आहे. दुर्दैवाने, हेच प्रदूषित पाणी आपल्याला वापरावे लागत असल्याने आज आरोग्याचे प्रश्नही गंभीर बनत चालले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील पंचगंगा, मुळा, मुठा या नद्यांच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. देशातील सर्वाधिक प्रदूषित नद्यांमध्ये पंचगंगेचा समावेश होणे ही बाब शोभणारी नाही.

पाणी प्रदूषणाबाबत नागरिकांमध्ये जसे गांभीर्य दिसून येत नाही, त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे राज्यकर्त्यांचा याकडे पाहण्याचा दृष्टिकोन. याचे उत्तम उदाहरण म्हणून पंचगंगा नदी प्रदूषणाचे घेता येईल. या नदीच्या पाणी प्रदूषणाबाबत नागरिकांनी आंदोलने सुरू केली तेव्हा राज्यकर्त्यांनी नदी प्रदूषणमुक्त करण्याचा विचार करण्याऐवजी या लोकांना थेट धरणातून पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले आणि त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून योजनाही आखली. यातून नागरिकांना शुद्ध-स्वच्छ पाणी मिळेलही; परंतु त्याचा दुसरा अर्थ की, पंचगंगा नदी ही अशीच प्रदूषित राहू द्यायची असा होतो. आज शहरा-महानगरांमधून नद्यांमध्ये मैलामिश्रित पाणी सोडले जाते. मग त्या नद्यांच्या काठांवरील गावांनी हेच पाणी प्यायचे का, असा प्रश्न उपस्थित होतो. प्रदूषित पाण्यामुळे आरोग्याचे होणारे नुकसान खूप मोठे आहे. या दूषित पाण्यातून विविध आजार पसरत आहेत. पण याचे कुणालाही गांभीर्य वाटत नाही. नद्यांचे पाणी प्रवाही राहिले तर नैसर्गिकरीत्या ते आपोआप प्रदूषणमुक्त होते. पण आपल्या नद्यांवर ठिकठिकाणी बंधारे बांधले गेल्यामुळे हे पाणी प्रवाहित राहातच नाही. दुसरीकडे शेती, कारखाने आणि औद्योगिक प्रकल्प हे नदीपात्रापासून दूर असणे आवश्यक आहे. पूर्वी नदीच्या उगमापासून आणि नदीच्या पात्रापासून पाच किलोमीटर अंतरावर कोणत्याही प्रकल्पाला मान्यता दिली जात नव्हती. पण आपला देश शेतीप्रधान असल्याने शेतीला परवानगी दिली गेली. तसेच औद्योगिक प्रकल्पांसाठीही हा नियम शिथिल करून 500 मीटर ही सीमा ठरवण्यात आली. परिणामी आज अनेक औद्योगिक प्रकल्प नदीकिनारी उभे राहिलेले दिसतात.

नद्यांसंदर्भातील आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे गाळाचा भरणा. आज राज्यातील, देशातील बहुतांश नद्या व धरणे गाळाने भरू लागली आहेत. याचे एक कारण म्हणजे बहुतांश नद्यांचे उगम हे डोंगराळ भागात आहेत. पण या नद्यांच्या आजूबाजूला असणार्‍या डोंगरपर्वतांवरील जंगले नष्ट करून टाकण्यात आली आहेत. परिणामी या डोंगरांवरील जमिनीची, सुपीक मातीची धूप होण्याचे प्रमाण वाढून नद्यांमधील गाळ वाढला आहे. गेल्या काही वर्षांत अतिपावसाचे प्रमाण वाढल्याने डोंगर उतारावरून वाहून येणार्‍या गाळाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. नद्यांची नैसर्गिक पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे. म्हणूनच अलीकडील काळात थोडासा जरी पाऊस पडला तरी पूर येण्याच्या घटना घडताना दिसतात. दुसरीकडे नद्यांमधून होणारे वाळू उपशाचे प्रमाण आजही पूर्णपणे थांबलेले नाही. नद्यांमध्ये कचरा, निर्माल्य, मूर्ती विसर्जन हे थांबवले पाहिजे.

Back to top button