स्वयंपाकघरातील चूल, जाते, पाटा, वरवंटा, माती, पितळेच्या भांड्यांची जागा कालानुरूप हायटेक किचन अप्लायन्सेसनी घेतली आहे. रोजचा स्वयंपाक अधिक सहज व अधिक चवदार करण्यासाठी गॅजेट वर्ल्डमध्ये क्षणागणिक नवनवी गॅजेट्स गृहिणींच्या सेवेत दाखल होत आहेत. इतकेच नाही तर सध्या जगभरात बोलबाला सुरू असलेले आर्टिफिशिअल इंटेलिजन्सी (कृत्रिम बुद्धिनता) किचनमध्ये अवतरले आहे. तुमच्या फ्रीजमध्ये कोणते पदार्थ आहेत, हे कॅमेऱ्याच्या मदतीने स्कॅन होऊन उपलब्ध पदार्थानुसार कोण-कोणत्या पाककृती बनू शकतात, याची यादी क्षणात तुमच्या स्मार्ट फोनवर त्यामुळे उपलब्ध होत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे स्मार्ट झालेले किचन आणखी स्मार्ट होत आहे.
ओव्हन, मायक्रोवेव्हमध्ये शिजत असलेल्या पदार्थांची दृश्ये थेट सोशल मीडियावर शेअर करता येणार आहेत. या ओव्हनमध्ये एआय प्रो कुकिंग अल्गोरिदमचा वापर केला असून, वेगवेगळ्या प्रकारच्या तब्बल ८० डीश हा ओव्हन ओळखतो आणि त्या त्या डीशनुसार लागणारे तापमान, वेळ व मोड सिलेक्ट करतो.
कोणतेही पदार्थ थंड ठेवणारा फ्रीज देखील या टेक्नोसॅव्ही वर्ल्डमध्ये स्मार्ट झाला आहे. स्मार्ट फ्रीजमध्ये ३२ इंची टच स्क्रीन, स्पिकर व इंटरनेट या सुविधा आहेत. याशिवाय एक टच करताच फ्रीजमध्ये आत कोणकोणते पदार्थ आहेत, हे फ्रीजच्या दारावर असणाऱ्या स्क्रीनवर तसेच स्मार्ट फोनवर दिसू शकते, तसेच उपलब्ध पदार्थांनुसार कोणती पाककृती केली जाऊ शकते, याची माहितीसुद्धा हा फ्रीज देतो.
स्वयंपाकघरात कटिंग बोर्डचा वापर केला जातो. हा कटिंग बोर्डदेखील स्मार्ट झाला आहे. या बोर्डवर ठेवलेल्या पदार्थाचे वजन किती आहे, त्यातून किती कॅलरी मिळणार यापासून ते त्या पदार्थापासून कोणती पाककृती तयार करता येऊ शकते, याबाबतची सर्व माहिती स्मार्ट फोनवर उपलब्ध होते.