वर्धापनदिन विशेष : कापड उद्योग – परंपरा व संधी | पुढारी

वर्धापनदिन विशेष : कापड उद्योग - परंपरा व संधी

  • अरविंद जोशी

वस्त्रोद्योग हा भारतातला शेतीखालोखालचा दुसर्‍या क्रमांकाचा व्यवसाय आहे. देशाच्या ‘जीडीपी’चा दोन टक्के हिस्सा त्यातून येतो. भारताच्या कपड्यांना जगभरातून चांगली मागणी आहे आणि त्यातून परदेशी चलनाची मोठी कमाई होऊ शकते.

एकेकाळी भारत हा व्यापारात आघाडीवर असलेला देश होता, असे अनेकदा सांगितले जात असते. भारतात पूर्वी कलाकुसरीच्या वस्तू तयार करून जगभर विकल्या जात होत्या. दागिने विकले जात होते. मध्ययुगात भारतातून पोलाद आणि नामी तलवारी परदेशी पाठवल्या जात असत. मसाल्याच्या पदार्थांविषयी तर जगात सर्वत्र भारताचा गवगवा होता. विशेषत:, कापड तयार करून ते निर्यात करण्यात भारत देश आघाडीवर होता. भारतातल्या वस्त्रोद्योगाची परंपरा चार हजार वर्षांपर्यंत मागे नेली जाते. भारतात हातमागावरचे कापड तयार करण्याची कला तेव्हा विकसित झाली होती आणि त्यावर प्रामुख्याने रेशमी वस्त्रे तयार करून ती परदेशात पाठवली जात असत, असे सांगितले जाते. याबाबत भारत आणि चीन यांची तुलना केली जाते; पण एक काळ असा होता की, भारतीय तंत्रज्ञांनी रेशमाचे कापड रंगीत करायला सुरुवात केली होती आणि या व्यवसायात चीनला मागे टाकले होते. भारताची वस्त्रोद्योगाची मक्तेदारी आजही कायम आहे.
भारतातली शेती मोठी संपन्न आहे. भारतात निम्म्या जगाला कापड पुरवण्याचीही क्षमता आहे. मात्र, जगभरात कापडाच्या बाबतीतली लोकांची आवड-निवड बदलत चालली आहे आणि या व्यवसायात तीव्र स्पर्धा आहे. त्यामुळे भारतातल्या वस्त्रोद्योगाला या स्पर्धेला तोंड देऊन टिकून राहताना नाकी नऊ येतात. असे असले तरी भारतातले या क्षेत्रातले व्यापारी आणि कलाकार आपल्या अंगभूत क्षमतेच्या जोरावर आपले वर्चस्व दाखवून देतात.

वस्त्रोद्योगात जिथे निसर्गावर अवलंबून राहण्याचा प्रश्न येतो, तिथे भारतीय वस्त्रोद्योग नेहमीच पुढे राहिला आहे. कापड उद्योगात चार प्रकारच्या नैसर्गिक साधनांचा वापर होतो. कापूस, ताग, रेशीम आणि लोकर. या चार कच्च्या मालांवर कापड तयार करण्याच्या बाबतीत भारताने आघाडी घेतली आहे. आजही कापूस उत्पादनात भारताचा जगात पहिला क्रमांक आहे. पूर्वी अमेरिका, इजिप्त, चीन हे देश कापूस उत्पादनात पुढे होते. भारत कापूस उत्पादनात पाचव्या क्रमांकावर होता; पण भारतात कापसाचे प्रगत बीटी बियाणे वापरण्यास सुरुवात झाली आणि बघता बघता भारत हा पहिल्या क्रमांकाचा कापूस उत्पादक देश ठरला. त्याच्या जोरावर भारताचे वर्चस्व टिकून आहे. कापसाशिवाय ताग अनेक प्रकारच्या कामात मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. लोकरी कपडेही निर्यात होतात. शिवाय, काही धाग्यांत लोकरी धागे मिसळून कापड तयार केले जाते. रेशमी वस्त्रांत तर मनमोहक अशी विविधता आहे. चीनवगळता अन्य कोणताही देश रेशमी कपड्याच्या बाबतीत भारताची बरोबरी करू शकत नाही.

वस्त्रोद्योगात आपण केवळ अंगात घालायच्या कपड्यांचाच विचार करतो; पण चादरी, पलंगपोस, घोंगडी, वाकळ, पडद्याचे कपडे, मॅट, गालिचे, टॉवेल, ताडपत्री आणि तयार कपडे असे किती तरी प्रकार असतात. या सर्वात भारतातला वस्त्रोद्योग जगात नावाजला गेला आहे. भारतात हे कपडे विणण्याचे कौशल्य परंपरेने टिकलेले आहे. भारतातला हा व्यवसाय जवळपास 200 अब्ज डॉलरचा असून, त्यापैकी 45 अब्ज डॉलर्सची निर्यात केली जाते. वस्त्रोद्योग हा शेती खालोखालचा सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा व्यवसाय आहे. भारतात पाच कोटी 80 लाख शेतकरी हे कापूस उत्पादक आहेत. एक कोटी पाच लाख लोक कापसाशी संबंधित सर्व प्रकिया उद्योगात थेट गुंतलेले आहेत. शिवाय, आता तयार कपडे, अनुषंगिक साधने (परल्स), शिलाई इत्यादी कामांत थेटपणे आणि अप्रत्यक्षपणे गुंतलेल्या लोकांची संख्या मोजली; तर भारतातल्या पाच कोटी लोकांची उपजीविका या व्यवसायावर अवलंबून आहे, असे दिसते. भारतातले कापड, टीशर्ट, अन्य तयार कपडे यांना जगात चांगली मागणी आहे. कारण, भारतातले कॉटनचे कापड हे दर्जेदार मानले जाते. त्यामुळे भारतातल्या तयार कपड्यांना जगभरातून चांगली मागणी आहे. त्यातून भारतातली निर्यात अनेक पटींनी वाढवता येते.

सध्या भारतातून जगभरात कपडे निर्यात होतात. त्यात अमेरिकेत होणार्‍या निर्यातीचा वाटा 27 टक्के म्हणजे सर्वात मोठा आहे. युरोपीय संघाचा वाटा 18 टक्के, तर बांगला देशाचा वाटा 17 टक्के आहे. यातली बांगला देशात होणारी निर्यात वेगळ्या प्रकारची आहे.
बांगला देश हा पूर्वी भारताचाच भाग होता आणि तिथेही वस्त्रोद्योगाची परंपरा आहे. भारतातली पहिली कापड गिरणी कोलकात्यात 1818 साली निघाली होती. कारण, ढाका या शहराच्या परिसरात परंपरेने हातमागाचे कापड मोठ्या प्रमाणावर तयार होत होते. मुंबई आणि अहमदाबाद या दोन मोठ्या शहरांत कोलकात्यानंतर वीस-पंचवीस वर्षांनी कापड गिरण्या उभ्या राहिल्या आहेत. कापडाचे मोठे केंद्र असलेले आणि जगप्रसिद्ध मलमलीचे कापड तयार करणारे ढाका शहर आता बांगला देशाची राजधानी आहे. जगात मुक्त अर्थव्यवस्थेचे वारे वाहायला लागल्यावर बांगला देशाला जाग आली आणि त्या देशाने तयार कपडे निर्माण करून ते परदेशात निर्यात करण्याच्या व्यवसायात मोठी गती घेतली. त्यावर त्या देशाची अर्थव्यवस्था सुधारली आहे. मात्र, तिथे रेडिमेड कपडे तयार करण्यासाठी लागणारे कापड पुरेसे तयार होत नाही. ते भारतातून मागवले जाते. तेव्हा बांगला देश हा रेडिमेड कपड्यात जगात आघाडीवर असला, तरी त्यासाठी लागणार्‍या कापडासाठी तो भारतावर अवलंबून आहे.

सध्या भारतातून 6.3 अब्ज डॉलरचे तयार कपडे निर्यात होतात; पण या निर्यातीला यापेक्षा मोठी संधी आहे. जगातल्या निर्यात व्यापारात भारताचा वाटा 4 टक्के आहे. तोच चीनचा वाटा 34 टक्के आहे. त्यामुळे भारतातून कापड निर्यात करण्याचे मोठे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. 2027 साली ही निर्यात 30 अब्ज डॉलर व्हावी, अशी अपेक्षा आहे. ते अगदीच अशक्य नाही. या तयार कपड्यातही गणवेश हे वेगळे क्षेत्र आहे. अनेक शाळा, महाविद्यालये, कारखाने, कार्यालये, दवाखाने, यात सर्वांना गणवेश सक्तीचा झाला आहे. त्याची वेगळी निर्यात होते. महाराष्ट्रात सोलापूर हे गणवेश तयार करण्यात आघाडीवर असून, तिथे 350 कारखाने आहेत. नुकतेच सोलापूरच्या तयार कपड्यांचे मोठे प्रदर्शन हैदराबाद येथे भरले होते. सोलापूर हे चादर आणि टॉवेलच्या पाठोपाठ गणवेश निर्यात करणारे मोठे केंद्र ठरले आहे. महाराष्ट्रात मालेगाव, भिवंडी आणि इचलकरंजी ही यंत्रमागावर कापड तयार करणारी मोठी केंद्रे असून, त्यांच्यासह महाराष्ट्रात 50 लाख लोकांची उपजीविका या व्यवसायावर अवलंबून आहे.

भारताला निर्यातीचे 30 अब्जच काय; पण त्यापेक्षाही मोठे उद्दिष्ट गाठता येईल; पण त्यासाठी बदलत्या काळाची पावले ओळखावी लागतील. जगात सध्या कृत्रिम धाग्याच्या कपड्यांंना मागणी आहे. तेव्हा कापसावरचा भर थोडा कमी करून आपल्याला या कृत्रिम धाग्यापासून तयार होणार्‍या कपड्यांवर अधिक भर द्यावा लागेल. कृत्रिम धाग्यांत पॉलिस्टर, व्हिस्कोस, नायलॉन आणि क्रिलिक या चार प्रकारांचा समावेश होतो. या धाग्यावर आधारित वस्त्रोद्योग वाढवायचा असेल; तर त्यासाठी मोठी परदेशी गुंतवणूक आवश्यक आहे. आता जपान, मॉरिशस, बेल्जियम आणि इटली या चार देशांतल्या गुंतवणूकदारांनी भारताची या क्षेत्रातली क्षमता ओळखली असून, भारतात गुंतवणूक करायला सुरुवात केली आहे. भारताला आपली निर्यात वाढवायची असेल; तर जागतिक स्पर्धेत कमी किमतीला कापड उपलब्ध करून द्यावे लागेल. भारतातले कापड महाग का असते, याचा शोध घ्यावा लागेल. आपल्या देशात कापूस विदर्भात पिकतो; पण त्यावर प्रक्रिया तिथे होत नाहे. जालन्याला होते. सूत सोलापूरला आणि कापड मालेगावला तयार होते. या विकेंद्रीकरणामुळे आणि वाहतुकीमुळे भारतातील कापड महाग होते. तेव्हा कापूस विदर्भात पिकत असेल; तर त्यावरच्या प्रक्रिया तिथेच केल्या पाहिजेत आणि कापडही तिथेच तयार झाले पाहिजे. तरच त्या कापडांवरचा उत्पादन खर्च कमी होईल आणि त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातली स्पर्धात्मकता वाढेल.

Back to top button