परिपक्व अभिनयाचं विद्यापीठ | पुढारी

परिपक्व अभिनयाचं विद्यापीठ

  •  राजीव मुळये, नाट्य दिग्दर्शक, लेखक

विक्रम गोखले यांच्याकडे सहजसोपा अभिनय उपजतच होता. कायिक, वाचिक आणि मुद्राभिनयासाठी आवश्यक सर्व पैलू त्यांच्या देखण्या व्यक्तिमत्त्वात मूळचेच होते. पण अभिनयातील परिपक्वता मात्र व्यासंग, चिंतन आणि अभ्यासातूनच येते. परिपक्वता हा तर गोखलेंच्या अभिनयाचा अविभाज्य घटक. ही परिपक्वता व्यक्तिमत्त्वातच यावी लागते. त्यासाठी आचारविचारांबरोबरच दृष्टिकोनही महत्त्वाचा ठरतो.

रंगभूमीने चित्रपटष्टीला अनेक सक्षम दिले, असं म्हटलं जात असलं तरी रंगभूमीवरचा अभिनयआणि अन्य माध्यमांतला अभिनय यातील सीमारेषा गेल्या काही वर्षांत हळूहळू गडद होत गेली. एकीकडे तंत्रज्ञान सुधारलं, तर दुसरीकडे प्रत्येक माध्यमाचा स्वतंत्र असा प्रेक्षकवर्ग तयार झाला. छोट्या आणि मोठ्या पडद्याच्या मागण्या बदलल्या. खिशात मावणारा ओटीटीचा पडदा तर थेट हॉलीवूड शैलीच्या अभिनयाची मागणी करू लागला. या स्थित्यंतरांमध्ये अत्यंत सुलभपणे माध्यमान्तर करू शकणारे अभिनेते अगदी मोजकेच दिसून येतात आणि विक्रम गोखले हे त्यापैकी एक होत. शैलीत काळानुरूप, माध्यमानुरूप बदल करण्याचं कसब अनेक अभिनेत्यांना साध्य झालं; परंतु विक्रम गोखले हे असे अभिनेते होत, ज्यांची मूळ शैलीच कोणत्याही माध्यमाच्या साच्यात चपखल बसणारी होती. अभिनयाच्या मागे चिंतन आणि अभ्यासाचा भाग मोठा असतो. विक्रम गोखले यांच्या अभिनयात तो दिसतोच; पण त्याचा बोजडपणा मात्र जाणवत नाही. अगदी सहजपणे ते भूमिकेत उतरलेले दिसतात.

गोखलेंसारख्या अभिनेत्यामधली प्रचंड ताकद, ऊर्जा आपल्याला दिसते; परंतु त्यामागचे परिश्रम, तपश्चर्या दिसत नाही. शिस्त आणि जिज्ञासा जवळ असल्याखेरीज एवढा मोठा पल्ला गाठता येत नाही. रंगभूमीवर त्यांची एन्ट्रीच मुळात विजया मेहता यांच्या ‘बॅरिस्टर’ नाटकातून झाली. त्यांच्या घराण्याला जरी अभिनयाचा मोठा वारसा लाभला असला, तरी केवळ त्या पुण्याईवर कामं मिळवत राहणं त्यांना मान्य नव्हतं. तसं करणारे कलावंत दोन-तीन नाटका-सिनेमांतून दिसतात आणि नंतर एक तर गायब होतात किंवा अधूनमधून अगदी नगण्य भूमिकेतून भेटत राहतात. गोखलेंचा दमदार अभिनय ही प्रदीर्घ तपश्चर्येची फलश्रुती होय. त्यांच्या आजी कमलाबाई गोखले या पहिल्या बालकलाकार होत तर वडील चंद्रकांत गोखले हे ख्यातनाम अभिनेते. अशी पार्श्वभूमी असताना स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटवणं अत्यंत अवघड गोष्ट असते. कुणाच्याही पावलावर पाऊल न टाकता स्वतःची शैली निर्माण करण्यासाठी त्यांनी जे परिश्रम घेतले, त्यातल्या सातत्यामुळंच त्यांची प्रतिमा एवढी मोठी होऊ शकली.

अभिनयाच्या अभ्यासात निरीक्षणाला खूप महत्त्व आहे. विशिष्ट स्वभावाची व्यक्ती कोणत्या प्रसंगाला कसा प्रतिसाद देते, तिच्या प्रतिक्रिया कशा असतात हे बारकाईनं पाहावं लागतं. हातात आलेल्या संहितेचा अभ्यास करून त्यातलं आपलं पात्र समजून घ्यावं लागतं. त्याचा स्वभाव आणि संहितेतलं स्थान याचा विचार करून पात्र साकारावं लागतं. म्हणूनच निरीक्षणाबरोबर विश्लेषणाची शक्ती अभिनेत्याकडे असणं आवश्यक असतं. आशय-विषयाचं एकंदर आकलन किती प्रामाणिकपणे केलं जातं यावर विश्लेषणाची शक्ती अवलंबून असते. मुख्य म्हणजे, ही संपूर्ण प्रक्रिया रंगमंचावर किंवा पडद्यावर काम करणाऱ्या  अभिनेत्यामध्ये दिसते. दिलेले संवाद म्हणणं आणि संवाद साधणं यात खूप फरक असतो. कारण बोलणं हा विचारांचा अंतिम आविष्कार असतो. हा विचार ज्यांच्या अभिनयातून ओतप्रोत दिसतो, अशा मोजक्या नटांमध्ये विक्रम गोखले यांचा समावेश होतो.

नाटकाबरोबरच मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत विक्रम गोखले यांनी स्वतःचं हक्काचं स्थान निर्माण केलं. अत्यंत चारित्र्यवान आणि सहृदयी चरित्रनायक रंगवणारे अभिनेते चंद्रकांत गोखले यांचे ते सुपुत्र. पुण्याच्या भावे हायस्कूल आणि वेलणकर हायस्कूलमधून त्यांनी शिक्षण घेतलं. सध्याचं आबासाहेब गरवारे महाविद्यालय त्यावेळी एमईएस कॉलेज म्हणून ओळखलं जात होतं. या महाविद्यालयात त्यांनी उच्च शिक्षण सुरू केलं; परंतु अभिनयात करिअर करण्यासाठी शिक्षण सोडण्याचा निर्णय घेतला. पुढे अंधकार असतो आणि आपल्या बळावर, कर्तृत्वावर, जिद्दीवर, परिश्रमांवर पुढची वाटचाल करायची असते. आपहून मुटका, राजसंन्यास, बेबंदशाही या नाटकांमधून भूमिका साकारतानाच त्यांनी शेवग्याच्या शेंगा या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पहिलं पाऊल टाकलं. बाळ कोल्हटकरांचं ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ या नाटकातून त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केलं, तर ‘अनोळखी’ या चित्रपटात त्यांनी प्रथमच नायक रंगवला. अभिनयासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत गोष्टी गोखलेंकडे होत्याच. वाचिक अभिनयासाठी लागणारा उत्तम आवाज आणि संवादफेकीसाठी आवश्यक सुस्पष्ट शब्दोच्चार, त्याचप्रमाणं मुद्रा खुलवणारे सुंदर डोळे त्यांना लाभले होते. परिपक्वता हा गोखलेंच्या अभिनयाचा अविभाज्य घटक. ही परिपक्वता व्यक्तिमत्त्वातच यावी लागते आणि त्यासाठी आचार- विचारांबरोबरच दृष्टिकोनही महत्त्वाचा ठरतो. पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना करून अनेक समाजोपयोगी कामं केली. वयोवृद्ध कलावंतांना हक्काचा निवारा असावा, या भूमिकेतून त्यांनी मोठी जमीन चित्रपट महामंडळाला दिली आहे. फोटोग्राफीचा छंद जपून त्यांनी मुळातच कॅमेऱ्याशी मैत्री केली. कॅमेऱ्यानंही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे सगळे पैलू मग भरभरून टिपले.

विविधरंगी भूमिका विक्रम गोखले यांनी अचूकपणे स्वामी आणि बारकाव्यांसह साकारल्या. बाळा गाऊ कशी अंगाई, कळत-नकळत, माहेरची साडी या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका रसिकांच्या कायम लक्षात राहिल्या. कुंकू, मुक्ता, ” आणि वाजंत्री, विजली आधारस्तंभ ” आदी मराठी चित्रपटांमधून त्यांनी भूमिका साकारल्या. १९९४ मधील ‘वजीर’ चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. वैद्यकीय व्यवसायावरील ‘आघात’ चित्रपटाचं दिग्दर्शनही विक्रम गोखले यांनी केलं आणि या पहिल्याच चित्रपटासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला. २०१३ मध्ये ‘अनुमती’ चित्रपटातील भूमिकेनं त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. कोल्हापूर आणि न्यूयॉर्क आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही त्यांना पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

हिंदी चित्रपटसृष्टीत गोखले यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली. इन्साफ, खुदा गवाह, हम दिल दे चुके सनम, हे राम, भूलभुलय्या, मदहोशी, तुम बिन, चॅम्पियन, लाडला, हसते हसते, अग्निपथ, सलीम लंगडे पे मत रो, मिशन ११ जुलै, गफला, धुवाँ आदी चित्रपटांमधून त्यांनी भूमिका साकारल्या. दूरदर्शन मालिकांमध्येही त्यांनी छाप उमटवली. ‘विरुद्ध’ या मालिकेतील धीरेंद्रराय सिंघानिया ही त्यांची भूमिका विशेष गाजली. पाखेरीज जीवनसाथी, संजीवनी, मेरा नाम करेगी रोशन या हिंदी मालिका; तर या सुखांनो या, अग्रिहोत्र या मराठी मालिकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. आजारपणामुळं ते रुग्णालयात दाखल होण्याच्या काही दिवस आधी ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत ते संगीत गुरूच्या भूमिकेत दिसले. चित्रपटसृष्टीत केवळ मराठी आणि हिंदीच नव्हे तर गुजराती, तमिळ आणि कम चित्रपट त्यांनी भूमिका केल्या. अभिनय या विषयावर शैक्षणिक संस्थांमधून आणि विद्यापीठांमधून अतिथी प्राध्यापक म्हणून काम केलं. रंगभूमीवर प्रेम करणारा हा सच्चा कलावंत. रंगभूमीवरचा अभिनय खूपच वेगळा. इथं रिटेक नाही आणि क्लोजअपसुद्धा नाही. आत्यंतिक एकाग्रता आणि भूमिकेशी समरस होणं ही रंगभूमीची पहिली गरज. गोखले यांच्याकडे आकर्षक व्यक्तिमत्त्वाबरोबरच या गोष्टी असल्यामुळं रंगभूमीवर त्यांनी अमीट ठसा उमटवला. अपराध मीच केला, वेगळं व्हायचंय मला, जास्वंदी, स्वामी, महासागर, जावई माझा भला, दुसरा सामना, आणि मकरंद राजाध्यक्ष, संकेत मीलनाचा, खरं सांगायचं तर.., आप्पा आणि बाप्पा, नकळत सारे घडले आदी नाटकांमधून त्यांनी प्रमुख भूमिका केल्या. ‘बॅरिस्टर’ मधली त्यांची मध्यवर्ती भूमिका अक्षरश: रसिकमनावर कोरली गेली. उच्चारांइतकेच विचार स्पष्ट असलेल्या या कलावंताने परखडपणे आपली मतं वेळोवेळी नोंदवली. त्यांच्या भेदक डोळ्यांमधली जरब आणि ठामपणा आपल्याला सदैव आठवत राहील.

 

 

Back to top button