दिवेआगरचा श्री सुवर्ण गणेश | पुढारी

दिवेआगरचा श्री सुवर्ण गणेश

दिवेआगर हे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यामधील एक निसर्गरमणीय गाव व पर्यटनस्थळ आहे. सुमारे 22 वर्षांपूर्वी दिवेआगर नाव एकदम सर्वत्र चमकले. 17 नोव्हेंबर 1997 रोजी द्रौपदी धर्मा पाटील यांच्या बागेत झाडांची आळी करताना एक तांब्याची पेटी मिळाली. ही बातमी या छोट्याश्या गावात वार्‍यासारखी पसरली.

गावचे सरपंच, प्रतिष्ठित मंडळी, पोलिस अशा सर्वांसमक्ष पेटीचे कुलूप तोडण्यात आले. आत गणपतीचा शुद्ध सोन्याचा मुखवटा सापडला. सोबत एक तांब्याचा डबाही होता. त्यात एक किलो 300 ग्रॅम वजनाचा मुखवटा व 280 ग्रॅम वजनाचे गणपतीचे दागीने होते.

सापडलेली पेटी जमिनीखाली तीन फुटांवर असल्याने सरकारदरबारी जमा करण्याचा प्रश्न नव्हता. ही पेटी मंदिरात ठेवण्यात आली. सापडलेल्या पेटीच्या बाबतीत महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी पुढाकार घेतला.

तेव्हाच्या सांस्कृतिक मंत्र्यांना त्यांनी पटवून दिले, की हा सांस्कृतिक ठेवा मूळ ठिकाणीच असलेल्या मंदिरात राहू द्यावा. त्या बदल्यात त्यांनी फक्त एक छोटे श्रेय मागितले. हा मुखवटा जिथे ठेवला होता, त्याच्यावर महाराष्ट्र राज्याच्या सौजन्याने अशी पाटी लिहिली गेली.

मात्र दुर्दैव या सुवर्णगणेश मंदिरावर 24 मार्च 2012 रोजी दरोडेखोरांनी दरोडा घातला. सुरक्षा रक्षकाची हत्या करुन सुवर्ण गणेश त्यांनी चोरुन नेला.रायगड पोलीसांच्या चाणाक्ष पोलीस तपासाने दरोडेखोरांना अटक करण्यात यश आले.

दरोडेखोरांनी सुवर्णगणेश मुर्तीचे सोने वितळवलेले होते. परिणामी सोने मिळाले; पण मुळ मुर्ती मात्र मुर्ती स्वरुपात नाही. गणेशाचे पुनरागमन गावांत झाले आणि गावांत आंनदोत्सवच झाला.दरम्यान सर्व दरोडेखोरांना जन्मठेपेची शिक्षा देखील झाली.

संपूर्ण रायगड जिल्ह्याचे श्रद्धास्थान असलेल्या दिवेआगर येथील या सुवर्ण गणेश मंदिराचे महाराष्ट्र शासनाने पर्यटन विकास निधीतून एक कोटी रुपये निधी खर्चून मंदिर बांधण्यात आले. गणेश मंदिरात असलेल्या पुरातन शिवकालीन गणेशाच्या मूर्तीवर वजलेप आणि मूर्तींची पुर्नस्थापना गेल्या दिड वर्षापूर्वी करण्यात आल्याचे श्री सुवर्ण गणेश न्यासाचे अध्यक्ष उदय बापट यांनी सांगितले.

दरम्यान यंदाच्या गुढापाडव्याला दरोडेखोरोकडून परत मिळवलेले मुळ सुवर्ण गणेशाचे सोने शासनाकडून न्यासाकडे सुपूर्त करण्यात येणार होते, परंतू कोरोना आपत्तीमुळे ही प्रक्रीया पूर्ण होवू शकलेली नाही. हे सोने शासनाकडून प्राप्त झाल्यावर मुळ सुवर्ण गणेशाच्या मुर्ती प्रमाणेच मूर्ती करुन तिची स्थापना करण्याचे नियोजने केले असल्याचे बापट यांनी सांगितले.

Back to top button