पुण्यातील मानाचा दुसरा गणपती - श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ | पुढारी

पुण्यातील मानाचा दुसरा गणपती - श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

पुण्यनगरीत साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवात लोकमान्य टिळक यांनी श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीस मानाचा दुसरा क्रमांक दिला हे सर्वश्रुत आहे. सन 1893 सालापासून मंडळाच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने तसेच शिस्तबद्ध स्वरूपात साजरा केला जातो. सन 1896 पासून उत्सवातील करमणुकीच्या कार्यक्रमात मेळ्यांचा फार मोठा सहभाग होता. या सर्व मेळ्यांच्या जाहीर कार्यक्रमांची सुरुवात ग्रामदेवतेच्या गणेशोत्सवात हजेरी लावून होत असे. यात स्वातंत्र्य मिळवण्याच्या दृष्टीने प्रबोधन करण्यात येत होते. ही प्रथा 1940 पर्यंत चालू होती.

श्रींची उत्सवमूर्ती दरवर्षी शास्त्रशुद्ध पद्धतीने शाडू मातीत नवीन बनवली जाते. आपल्या पुण्यनगरीतील मानाच्या दुसऱ्या गणपतीच्या मृण्मय पूजनाची सुरवात आषाढ मासात विनायकी चतुर्थीला होते. ब्राम्हमुहुर्ती उठून, शुचिर्भूत होऊन मंत्र म्हणत हातानी मूर्ती घडवण्यास सुरुवात होते. नैसर्गिक द्रव्यांनी पूजा बांधून ती पुन्हा निसर्गातच विलीन करायची हे मुख्य सूत्र जोगेश्वरी गजाननाच्या पार्थिव पूजेत असते. शास्त्रविधीप्रमाणे पंचगव्य, गणेशप्रिय दुर्वा यासह तयार होणारी ही मंगलमूर्ती म्हणूनच भक्तवत्सल, भक्तप्रिय आहे. जुन्या काळातील गंजिफाच्या खेळात निरनिराळ्या चित्रात असलेले जे हत्तीचे चित्र आहे, त्या चित्राप्रमाणेच म्हणजेच आफ्रिकन हत्तीच्या चेहऱ्याप्रमाणे पूर्ण चेहरा असलेले मुख हे या मूर्तीचे वैशिष्ठ्य आहे.

1983 साली श्रींच्या प्राणप्रतिष्ठेसाठी श्रींच्या लाकडी देव्हाऱ्यावर पितळी देव्हारा बसवला. मंडळाच्या शताब्दी वर्षापर्यंत श्रीं ची विसर्जन मिरवणूक सरदार नातूंकडील पेशवेकालीन वैभव सांगणारी पालखी वापरली जाई. शताब्दीवर्षात मंडळाने श्रींसाठी चांदीची पालखी तयार केली. पालखीला साजेशी अशी पालखीची व दैवतांची मानचिन्हे मंडळाने तयार केली आहेत. त्यामध्ये छत्र, चामर,अब्दागिरी, नक्षत्रमाळा आदींचा समावेश आहे.

सन 2011 च्या गणेशोत्सवापासून श्रींची प्राणप्रतिष्ठा नव्याने केलेल्या 65 किलो चांदीच्या देव्हार्यात केली जाते. श्रींची विसर्जन मिरवणूक सुद्धा पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात पार पडते. नगारा, बॅण्ड , ढोलताशा पथके, अश्व पथक , तसेच महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, छत्र,चामरे अब्दागिऱ्यामध्ये चांदीच्या पालखीत विराजमान झालेली श्रींची विलोभनीय मूर्ती अशी मिरवणूक पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात पार पडते. सन 2015 मध्ये पुण्यामध्ये जेव्हा पाणीटंचाई झाली त्यावर्षी मंडळाने श्रींची मूर्ती कृत्रिम हौदात विसर्जन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आणि आजही हीच पद्धत पुढे चालू ठेवली.

Back to top button