परंपरा-संस्कृतीचा श्रावण व्रतवैकल्याचा | पुढारी

परंपरा-संस्कृतीचा श्रावण व्रतवैकल्याचा

डॉ. लीला पाटील, कोल्हापूर

श्रावण पौर्णिमेला नारळी पौर्णिमा म्हणतात. नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ अर्पण करून ही पौर्णिमा साजरी करण्यात येते. ही पौर्णिमा राखी पौर्णिमा म्हणूनही ओळखण्यात येते.

पावसाळ्यात बंद केलेल्या बोटी या पौर्णिमेला सुरू करण्यात येतात. समुद्रकाठी कोळी बांधव-भगिनी एकत्रित समुद्राची पूजा करतात. यावेळी समुद्रात नारळ टाकून वाहतूक सुरू केली जाते, म्हणून या पौर्णिमेला नारळ पौर्णिमा म्हणतात. समुद्र पूजनातून रोजी-रोटी देणार्‍या समुद्राविषयीची अपार श्रद्धा आणि कृतज्ञता व्यक्‍त केली जाते. पूर्वीच्या काळी व आजच्या युगातही समुद्रमार्गे व्यापार व्यवसाय सुरू आहे. त्यासाठी समुद्रमार्गच एकमेव उपयुक्‍त ठरणारा आहे. म्हणून त्याबद्दलची कृतज्ञता व्यक्‍त करण्यासाठीची ही नारळी पौर्णिमा. यादिवशी नारळी भात हा गोडधोडाचा प्रकार सर्वांच्याकडे हमखास केला जातो. समुद्र पूजा व त्याचबरोबर आनंद प्रकटीकरण जल्‍लोषातून याचा समन्वय साधणार्‍या नारळी पौर्णिमेस धार्मिक व त्याच जोडीला व्यावहारिक महत्त्व आहे.

श्रावण पौर्णिमा ही राखी पौर्णिमा आहे. एका कथेनुसार युधिष्ठराने कृष्णाला वर्षभर येणार्‍या अरिष्टांपासून स्वतःचे रक्षण करण्याचा मार्ग विचारला तेव्हा कृष्णाने त्याला शास्त्रोक्‍त रक्षाबंधन विधी करण्यास सांगितला. याबद्दलची आणखी कथा अशी की, इंद्र आणि दैत्यराज यांच्यात दीर्घकाळ युद्ध चालू होते. दैत्य राजाने इंद्राचे राज्य बळकावले. तेव्हा इंद्र बृहस्पतीकडे सल्‍ला मागायला गेला. बृहस्पतीने इंद्राला सबुरीचा सल्‍ला देवून वेळ आल्यावर दैत्य सुरावर हल्‍ला करावा असे सांगितले. श्रावण पौर्णिमेला इंद्राणी आणि बृहस्पती यांनी इंद्राच्या उजव्या मनगटाला राखी बांधली. दैत्य राजाशी युद्ध सुरू करण्याची ही सूचना होती. यानंतर दैत्य सुरावर इंद्राने हल्‍ला करून स्वर्गलोक मनुष्यलोक आणि नागलोक यांच्यावर स्वामित्व मिळविले.

आणखी एका कथेनुसार बळीराजाचे वर्चस्व देवांना सहन झाले नाही. देवांनी कपट केले. विष्णूने वामनावतार धारण करून बळीला पाताळात लोटले. अशा कपटाचा धनी झाल्याने वामनाला बळीच्या वाड्यावर द्वारपाल म्हणून रहावे लागले. इकडे विष्णूला शोधून काढल्यावाचून लक्ष्मीला राहवेना. तिने नारदाला सल्‍ला विचारला व नारदाने युक्‍ती सांगितली. लक्ष्मी बळीच्या वाड्यावर गेली. बळीला आनंद झाला. ‘मी तुझी काय सेवा करू माते’ असे बळीने विचारले. तेव्हा लक्ष्मी म्हणाली, ‘आज रक्षाबंधनाचा दिवस आहे म्हणून भाऊ या नात्याने तुला राखी बांधणार. ती तू बांधून घे.’ बळीने आनंदाने राखी बांधून घेतली. या गोष्टीची फेड कशी करावी, असे त्याने लक्ष्मीला विचारले. लक्ष्मीने त्याला सांगितले की, ‘तुझ्या त्या द्वारपालाला तुझ्या सेवेतून मुक्‍त कर. तो माझा पती आहे.’ आपल्या दारावर असलेला द्वारपाल म्हणजे साक्षात विष्णू आहे हे कळल्यावर बळीने त्याला आनंदाने मुक्‍त केले आणि लक्ष्मी नारायणाचे दर्शन घेवून तो धन्य झाला.

पूर्वीच्या काळी मंत्री राजाला राखी बांधत असत. सूर्योदयाला स्नान करून उपाकर्म व ऋषींचे तर्पण केल्यानंतर दुपारनंतर राखी तयार केली जात असे. अक्षता, सोने व पांढर्‍या मोहर्‍या एकत्र करून त्याची एकच पुरचुंडी बांधायची. ती पुरचुंडी एका रेशमी दोर्‍यात गाठवायची. त्या राखीची पूजा करून मंत्री ती राजाला बांधत असतं. त्यावेळी एक मंत्र उच्चारीत असत,
येन बद्धो बली राजा दानवेद्रो महाबलः |
तेन त्वामापि बध्नामि रक्षा मा चल मावल ||

इतिहास काळात उत्तर भारतात बहिणीने भावाला राखी बांधायची अशी पद्धत सुरू झाली. भावाचा उत्कर्ष व्हावा आणि बहिणीला त्याने गरज पडेल तेव्हा संरक्षण द्यावे, या हेतूने राखी बांधली जात असे. मोगल काळात रजपूत स्त्रिया समर्थ आणि योग्य व्यक्‍तीला राखी पाठवून त्यांना राखी बंधू बनवत आणि हे बंधूही संकटकाळी आपल्या बहिणीच्या रक्षणासाठी तत्परतेने धाव घेत. उदेपूरची राणी कर्मवती हिने गुजरातच्या बहाद्दूर शहापासून रक्षण करावे म्हणून ह्युमायुनाला राखी पाठवली होती, ही गोष्ट प्रसिद्धच आहे. पूर्वी उत्तर भारतात मर्यादित असलेले रक्षाबंधन आता भारतभर पसरले आहे. दूरगावी असलेल्या बहिणी आपल्या भावांकडे राख्या पाठवतात. ज्याला शक्य असेल तो भाऊ बहिणीकडून राखी बांधून घेण्यासाठी तिच्या घरी जातो. रक्षाबंधनाने भावाबहिणीतले स्नेहसंबंध दृढतर होण्यास मदत होते. मथुरा वृंदावनात यावेळी जणू यात्रा लोटते. कित्येक बहिण-भाऊ या पवित्र स्थानी जातात आणि तिथे रक्षाबंधनाचा सोहळा साजरा करतात. राजस्थानात स्त्रिया एकमेकींना राख्या बांधतात. नणंदेने भावजयला, सासूने सुनेला, थोरल्या जावेने धाकट्या जावेला राखी बांधावयाची असते.

राखी पौर्णिमेच्या अगोदर दोन दिवस गाईचे शेण आणून कापसाने ते घराच्या प्रत्येक दाराशेजारी भिंतीवर लावतात. या लेपनाचा आकार रुपयापासून तळहातापर्यंत हवा तेवढा ठेवतात. शेणाच्या लेपनावर दुसर्‍या दिवशी चुना लावतात. चुना सुकल्यानंतर त्यावर लाल मातीने स्वस्तिक, तुळस, फुले, मोर, रामनाम याची चित्रे काढतात. याला ‘सूण’ म्हणतात. सूण म्हणजे शुभशकून. राखीच्या दिवशी सकाळी शुभ मुहूर्त पाहून या सूणाची पूजा करतात. लाडवाचा तुकडा खिरीत बुडवून तो रेशमाच्या दोर्‍याला बांधून तो सूणाला चिकटवतात. या गोष्टीचा अर्थ सूणाला जेवायला घातले, नैवेद्य दाखविला. नंतर घरातील सर्वजण सूणाला नमस्कार करतात.

विविध सण, उत्सव आणि व्रतवैकल्ये हे भारतीय संस्कृतीचे, अविभाज्यतेचे दर्शन घडविणारी अशी विविध घटिते आहे. ऋतू परिवर्तनाशी, नक्षत्र परिवर्तनाशी, कृषि संस्कृतिनिष्ट हंगामाशी हे सण बांधले गेले असल्यामुळे सर्व भारतभर जे महोत्सव आणि सण साजरे होतात त्यांच्यामध्ये एकसंधता व समांतरता असलेली दिसून येते. लोकसाहित्यातून सण उत्सवांचे तपशिलाने आविष्करण होते. याचे कारण भौतिक जीवनाचा ते अविभाज्य घटक असतात. श्रावण मास तर सणांचा राजा. प्रत्येक सणांमागे धार्मिक विचार-विधी आहे. शिवाय आध्यात्मिक अशी पार्श्‍वभूमी आहेच. त्यामुळे सण, व्रतवैकल्याच्या साजरेपणाला धार्मिक विधीची जोड अंतरिक समाधान देणारी असते.

Back to top button