भू-व्यवस्थापन : शेतजमिनीचे आरोग्य कसे जपाल? | पुढारी

भू-व्यवस्थापन : शेतजमिनीचे आरोग्य कसे जपाल?

– विवेक दाभोळे

शेतीप्रधान व्यवस्थेसाठी सध्याचा काळ हा काहीसा संक्रमणाचा काळ ठरत आहे. मात्र याच काळात पर्यावरणातील बदल, वाढते प्रदूषण या समस्या जागतिक पातळीवर गंभीर बनू लागल्या आहेत. शेतीप्रदूषणाचे प्रमाण कमी करणे हे तर आता गरजेचे बनले आहे.

निसर्गातील जल, वायू, पाणी, अग्नी, मृदा आदी पंचमहाभूतांची साथ घेत शेतीची अनादी काळापासून वाटचाल सुरू आहे. प्रगतीच्या बदलत्या टप्प्यात शेतीमध्ये देखील बदल होत गेले. केवळ एका व्यक्तीने होणारी शेतीची कामे आता अजस्त्र यंत्राच्या मदतीने वेगाने होत आहेत. अर्थात या बदलाच्या काळात पीक उत्पादनासाठी देखील पद्धतीमध्ये अगदी समूळ बदल होत गेले आहेत.

पिकांचे उत्पादन वाढण्यासाठी पाण्याचा मनमानी होणारा वापर आणि जमिनीची गरज लक्षात न घेता विशेषत: रासायनिक खतांचा केला जात असलेला बेसुमार मारा यामुळे मौल्यवान शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

आता तर आधुनिक काळात औद्योगिकीकरणाचे प्रमाण वाढतच आहे. याच काळात शेतीमध्ये देखील मोठे बदल होत गेले. प्रदूषणाचे प्रमाण आणि प्रकार देखील वाढले. केवळ मर्यादित असलेले प्रदूषणाचे प्रमाण आता तर मात्र झपाट्याने वाढू लागले आहे. पिण्याच्या तसेच शेतीसाठीच्या पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या नद्यांपाठोपाठ मोठ्या प्रमाणात मानवी जीवन व्यापून टाकू लागलेल्या प्रदूषणाचा झटका शेतीलादेखील बसू लागला.

नद्यांमधील प्रदूषित पाण्याचा पिकांवर परिणाम होऊ लागला. याचवेळी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे पिकांच्या उत्पादनांवर त्याचा परिणाम होऊ लागला. नद्यांमध्ये काठावरील शहरांमधील सांडपाणी, मोठमोठ्या उद्योगांमधील प्रदूषित पाणी सोडण्यात येऊ लागले. या प्रदूषित, सांडपाण्याचा परिणाम शेतीवर होऊ लागला. यातूनच शेतजमिनीचे प्रदूषण ही तोपर्यंत कोणाला माहीत नसलेली संकल्पना चर्चेत येऊ लागली.

झपाट्याने तुकडीकरण होऊ लागलेल्या भारतीय शेतीसाठी शेतजमिनींचे प्रदूषण हे मोठेच संकट ठरू लागले. दिवसेंदिवस वाढू लागलेल्या या प्रदूषणाच्या वाढत्या प्रमाणातूनच या संकट निवारणासाठीच्या उपाययोजनांची चर्चा होत आहे. अर्थात तोपर्यंत निसर्गानेदेखील आपले काम सुरू केले होते असेच आता म्हणावे लागेल. यातूनच शेतीची नासाडी न करणारी, प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याची ताकद असलेली निसर्ग शेती, जैविक व सेंद्रिय शेती याची चर्चा होऊ लागली.

सेंद्रिय शेतीतून दुहेरी लाभ

बदलत्या काळात शेती उत्पादनात वाढ साध्य करण्यासाठी आणि शेतीची उत्पादकता कायम टिकवून ठेवण्यासाठी कृषितील नवतंत्राबरोबरच सेंद्रिय, जैविक शेतीचे महत्त्व वाढत आहे. अधिक पीक उत्पादनाच्या हव्यासापोटी रासायनिक खते आणि पाण्याचादेखील पीक तसेच जमिनीची गरज न ओळखता केलेला बेसुमार वापर यामुळे अपेक्षित उत्पादन तर मिळत नाहीच, उलट सोन्यासारख्या जमिनीची नासाडी होत आहे. यातूनच एकरी उत्पादनातील घट तसेच जमिनी क्षारपड होण्यासारख्या समस्यांचे प्रमाण वाढू लागले आहे.

सेंद्रिय तसेच जैविक खतांची जोड…

अर्थात यात केवळ रासायनिक खतांच्या जोडीला सेंद्रिय तसेच जैविक खतांची जोड दिल्यास शेतीतून अधिक उत्पादन वाढणे शक्य आहे, अनेक ठिकाणी ते शक्यदेखील झाले आहे. खरे तर आताच्या काळात शेती – पिकांचा वाढता उत्पादन खर्च हा सामान्यच काय, पण अगदी बड्या शेतकर्‍यांच्यादेखील आटोक्यात राहिलेला नाही. शिवाय हातात हुकमी बाजारपेठ नसल्याने शेतीमालाच्या दराच्या बाबतीतदेखील त्यांचा अपेक्षाभंग होत आहे.

पांढर्‍या लोकरी माव्यावर नियंत्रण मिळविणे शक्य…

फळझाडे तसेच पिकांवर रोगकिडींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत असल्याने उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. बर्‍याचवेळा या रोगकिडींचा बंदोबस्त हा रासायनिक उपाययोजनेपेक्षा जैविक पद्धतीने करणे फायद्याचे ठरते. याचे उदाहरण म्हणून उसावरील पांढर्‍या लोकरी माव्याच्या जैविक नियंत्रणाकडे पाहता येईल. कोणत्याही उपाययोजनेला दाद न देणार्‍या पांढर्‍या लोकरी माव्यावर (व्हाईट वुली अ‍ॅफिड) अखेर क्रोनोबात्रा अफिडीव्होरासारख्या किडीनेच नियंत्रण मिळविणे शक्य आहे, अशा वास्तविकतेकडे कडे डोळेझाक करता येणार नाही. विशेष म्हणजे भुईमूग, सोयाबीन – सारख्या द्विदल पिकांच्या मुळांवर असणार्‍या गाठींमध्ये असलेल्या सहजीवी जीवाणूंमुळे (रायझो-बियम) जमिनीतील नत्राचे स्थिरीकरण (फिक्सेशन ऑफ नायट्रोजन) होते.

यातून या जीवाणूंमुळे नत्र पुरेशा प्रमाणात पिकांना उपलब्ध होतो, जमिनीची सुपिकताही कायम राहते. टोकणीच्या वेळी देखील भुईमुगाच्या बियाणांला रायझोबियम लावले जाते. त्याचादेखील कमाल फायदा पिकांना होतो. त्याची उत्पादन वाढीसाठी चांगली मदत होते.

सिंचनासाठी ठिबकचा वापर फायद्याचा…

जीवाणू खतांचे तसेच जैविक शेतीचेदेखील महत्त्व वाढू लागले आहे. ज्वारी, बाजरीसारख्या तृणधान्यवर्गीय पिकांच्या बियाणाला अ‍ॅझोटोबॅक्टर तसेच द्विदलवर्गीय पिकांच्या बियाणाला रायझोबियम जीवाणू लावले, तर त्यामुळे उत्पादनात मोठीच वाढ शक्य आहे. त्याचप्रमाणे सिंचनासाठी ठिबकचा वापर फायद्याचा ठरू लागला आहे. यातून शेतीच्या नासाडीचे प्रमाण आपोआपच कमी होऊ लागले असल्याचे चित्र आहे.

जमिनीत शेतकरी एक धान्याचे बी पेरतो; त्यापासून अक्षरश: हजारो बी मिळतात, यापेक्षा शेतीचे महत्त्व कोणते? शेती शाबूत ठेवून वातावरण आणि निसर्गदेखील स्वच्छ राखण्याचे काम हे शेतीतूनच होते, हे लक्षात आणून शेतीचे महत्त्व जाणण्याची गरज आहे!

हे ही वाचा :

पहा व्हि़डिओ : मृदगंध ; एक अनोखी शेती.

Back to top button