online 7/12 : मोबाईल नंबरवरुन सात-बारा कसा काढायचा? | पुढारी

online 7/12 : मोबाईल नंबरवरुन सात-बारा कसा काढायचा?

पुढारी ऑनलाईन डेस्क : सात-बारा काढण्यासाठी तुम्हाला चावडीच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. कोतवालकडे विनंती करा त्यानंतर तलाठ्याची सही घ्या. या सगळ्या प्रक्रियेत शेतकऱ्यांचा किमान आठवडा जायचा. या सगळ्यापासून मुक्तता मिळवण्यासाठी राज्य शासनाने ऑनलाईन सात-बारा (online 7/12) काढण्याची सुविधा केली. यामुळे ऑनलाईन सातबारा (online 7/12) काढण्यासाठी तुम्हाला तलाठी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही.

मागच्या चार वर्षांपासून राज्यभरात ऑनलाईन पद्धतीने सात-बारा मिळवण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. नेमका हा online 7/12 काढायचा कसा हा सगळ्यांसमोर प्रश्न उपस्थित राहतो यासाठी या सोप्या पद्धती जाणून घ्या.

ऑनलाईन पद्धतीने डिजिटल स्वाक्षरीचा सात-बारा घरबसल्या काढता येतो. दरम्यान, ऑनलाईन काढलेल्या सात-बाऱ्याचा वापर सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठीही होतो. सामान्यातील सामान्य शेतकरीदेखील या योजनेचा फायदा अगदी सहजरित्या घेऊ शकतो. सामान्य नागरिक मोठ्या संख्येने या सुविधेचा लाभ घेत आहेत.

डिजिटल सातबारा काढण्याची पद्धत

bhulekh.mahabhumi.gov.in या वेबसाईटला जावे लागेल. त्यानंतर तुमच्यासमोर महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट ओपन होईल.

digitaly signed 7/12 असे उजव्या कोपऱ्यात असेल यावर क्लिक केल्यास आपल्याला अजून काही पर्याय समोर दिसतील.

यावर तुम्ही क्लिक केल्यास ‘आपला 7/12’ नावाचे एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल.

या वेबसाईटवर आपण नोंदणी केली असेल तर लॉग इन करून तुम्ही थेट वेबसाईटवर जाऊ शकता.

पण, जर तुम्ही पहिल्यांदाच नवीन सात-बारा काढत असाल, तर मोबाईल क्रमांक वापरूनही तुम्हाला सातबारा काढता येतो.

OTP based login चा वापर करून सातबारा

OTP based login चा वापर करून आपण सात-बारा काढू शकता. यासाठी कोणतेही शुल्क लागत नाही.

त्यानंतर Enter Mobile Numberच्या खालच्या रकान्यात तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. आणि मग Send OTP या पर्यायावर क्लिक करायचे.

या पर्यायावर क्लिक केल्यावर OTP sent on your mobile असा मेसेज तिथे येईल.

यानंतर तुमच्या नंबरवर OTP येईल. त्यानंतर VERIFY डिजीटल स्वाक्षरीत सात-बारा येईल. त्यानंतर Verify OTP या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

Digitally signed 7/12 काढण्याची पद्धत

पुढे तुमच्यासमोर आपला सात-बारा नावानं एक नवीन पेज ओपन होईल. या पेजवर Digitally signed 7/12, Digitally signed 8A, Digitally signed Property card, Recharge Account, Payment History, Payment Status असे वेगवेगळे पर्याय दिसतील.

यातल्या Digitally signed 7/12 या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर ‘डिजिटल स्वाक्षरीत सातबारा’ असं शीर्षक असलेलं पेज तुमच्यासमोर ओपन होईल. यामध्ये सगळ्यात शेवटी सूचना दिलेली आहे की, “Rs.15 will be charged for download of every satbara. This amount will be deducted from available balance.”

याचा अर्थ सात-बाऱ्यासाठी 15 रुपये चार्ज केले जातील, ते तुमच्या उपलब्ध बॅलन्समधून कापले जातील.

आता आपण नवीन रेजिस्ट्रेशन केलेलं असल्यामुळे आपल्या खात्यात इथं काही बॅलन्स नसतं.

त्यामुळे सगळ्यात आधी खात्यात पैसे जमा करणं गरजेचं असतं. ते कसे करायचे तर खाली असलेल्या रिचार्ज अकाऊंट या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर हे पैसे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग किंवा भीम अप असेल तर त्याद्वारे जमा करता येऊ शकतात. तसे वेगवेगळे पर्याय इथे दिलेले आहेत.

त्यानंतर डिजिटल सात-बाऱ्याच्या फॉर्मवर परत गेलो, तर तिथं तुम्हाला 15 रुपये तुमच्या खात्यात जमा असल्याचं दिसेल.

आता डिजिटल सहीचा सात-बारा मिळवण्यासाठी तुम्हाला फॉर्मवर दिलेली माहिती भरायची आहे.

यात जिल्ह्याचं, तालुक्याचं आणि गावाचं नाव निवडायचं आहे.

त्यानंतर सर्व्हे किंवा गट नंबर टाकायचा आहे आणि सगळ्यात शेवटी डाऊनलोड म्हणायचं आहे.

त्यानंतर डाऊनलोड झालेला सात-बारा तुम्हाला स्क्रीनवर दिसेल.

यावर स्पष्ट लिहिलेलं असतं की, हा online satbara डिजटल स्वाक्षरीत तयार केला असल्यामुळे त्यावर कोणत्याही सही शिक्क्याची गरज नाही.

online satbara कसा वाचायचा?

सात-बाऱ्यावर सुरुवातीला गाव नमुना 7 आणि खाली गाव नमुना 12 असतो.

गाव नमुना सातमध्ये शेतकऱ्याकडे किती जमीन आहे, त्याचा किती जमिनीवर अधिकार आहे, हे नमूद केलेलं असतं.

यामध्ये डाव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात गट क्रमांक दिलेला असतो आणि त्यानंतर कोणत्या भूधारणा पद्धतीअंतर्गत ही जमीन येते, ते सांगितलं असतं.

सात-बारा तीन प्रकारात विभागलेला असतो. यात शेताचे नाव भोगवटादाराचे नाव व क्षेत्र आणि शेवटी खाते क्रमांक असतो.

शेताचं नावासमोर शेताला काही ठरावीक नाव दिलेलं असेल, तर ते इथं नमूद केलेलं असतं.

इथं तुमच्याकडे किती जमीन आहे ते हेक्टर आरमध्ये दिलेलं असतं. ती जिरायती आहे, बागायती आहे का तेसुद्धा सांगितलेलं असतं.

एकूण क्षेत्र किती ती सांगितलेलं असतं. त्याखाली पोट खराब म्हणजेच लागवडीस अयोग्य अशा जमिनींची माहिती दिलेली असते.

त्यानंतर भोगवटादाराचं नाव म्हणजे ती जमीन कुणाच्या मालकीची आहे, ते सांगितलेलं असतं.

त्यासमोर या जमिनीवर किती कर म्हणजेच शेतसारा आकारला जातो ते सांगितलं आहे.

तिसऱ्या रकान्यात खाते क्रमांक असतो. त्यात गाव नमुना आठ-असाठीचा खाते क्रमांक नमूद केलेला असतो.

या भागात कर्जाचा बोजा आहे का, विहीर असेल तर त्यावर कुणाचा ह्क्क आहे, आदी माहितीही असते.

त्यानंतर खाली गाव नमुना -12 असतो. ही पिकांची नोंदवही असते.

यात तुम्ही कोणत्या वर्षी कोणती पिकं घेतली, ती किती क्षेत्रावर घेतली आणि त्यासाठी जलसिंचनाचा स्रोत काय आहे, हे नमूद केलेलं असतं.

हे ही पाहा :

Back to top button