पुढारी ऑनलाईन डेस्क :'शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला' हे वाक्य तुम्ही वाचलं असेल किंवा ऐकले तरी असेल; पण शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला असे का म्हटले जाते? नेमकं काय घडले होते?…
साल १९७८चं होतं, महाराष्ट्रात फेब्रुवारी महिन्यात निवडणूका जाहीर झाल्या. काँग्रेसमध्ये इंदिरा काँग्रेस आणि समाजवादी काँग्रेस (चव्हाण आणि रेड्डी काँग्रेस) असे दोन गट पडले होते. इंदिरा काँग्रेसचे नेतृत्व नाशिकराव तिरपुडे करत होते. तर समाजवादी काँग्रेसचे नेतृत्व वसंतदादा पाटील यांच्याकडे होते. १९७८ साली झालेल्या या निवडणूका दोन्ही काँग्रेस पक्षांनी स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतला.
निवडणुकीचा बिगूल वाजताच इंदिरा काँग्रेस आणि समाजवादी काँग्रेसचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करू लागले. जनता पक्ष संपूर्ण ताकदीने निवडणूकीच्या रिंगणात उतरला होता. या निवडणुकीत ९९ जागा पटकावत जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला. इंदिरा काँग्रेसला ६९ तर समाजवादी काँग्रेसला ६२ जागांवर समाधान मानावे लागले हाेते. ३६ मतदारसंघांमध्ये अपक्षांनी बाजी मारली हाेती.
निवडणुकीचा निकाल जाहीर झाला अन् समाजवादी काँग्रेसकडून विधिमंडळ पक्षनेतेपदी वसंतदादा पाटील यांची निवड करण्यात आली. जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवत इंदिरा काँग्रेस आणि समाजवादी काँग्रेस यांनी सत्ता स्थापन करावी, असा विचार वसंतदादा पाटील यांनी मांडला. यासाठी वसंतदादा पाटील दिल्लीत पोहचले. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि वसंतदादा पाटील यांनी यशवंतराव चव्हाण यांची भेट घेतली.
यशवंतराव चव्हाण यांनी इंदिरा काँग्रेसबरोबर वाटाघाटी करण्यास परवानगी दिली. वसंतदादा पाटील आणि वसंतराव नाईक यांनी इंदिरा गांधी यांची भेट घेतली. इंदिरा गांधींनी सशर्त पाठींबा देणार असल्याचे सांगितले. वसंतदादा बिनशर्त पाठींबा हवा, असे म्हणत माघारी निघाले मात्र वसंतदादादा दिल्ली विमानतळावर पोहचताच इंदिरा गांधी यांनी आमचा बिनशर्त पाठींबा असेल असे जाहीर केले.
विधिमंडळ पक्षनेतेपदी वसंतदादा असल्याने मुख्यमंत्री वसंतदादा होणार हे फिक्स झाले. ७ मार्च १९७८ रोजी राज्यपाल सादिक अली यांनी वसंतदादा पाटील यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. वसंतदादा दुसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. इंदिरा काँग्रेसचे नाशिकराव तिरपुडे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्याच वर्षात वसंतदादांनी अनेक धाडसी निर्णय घेतले. मात्र सत्तास्थापन झाल्यानंतर काही काळातच समाजवादी काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेस यांच्यामध्ये संघर्षास सुरूवात झाली. राज्यातील विविध महामंडळांच्या नियुक्त्यांवरुन दोन्ही पक्षांमध्ये टोकाचे वाद झाले. इंदिरा काँग्रेस मनमानी करत आहे, असे समाजवादी काँग्रेसच्या आमदारांना वाटू लागले. वसंतदादांनी दोन्ही पक्षांतील वाद मिटवण्याचे प्रयत्न केले मात्र हे प्रयत्न अपुरे पडले.
समाजवादी काँग्रेसमध्येच शरद पवारांच्या नेतृत्वामध्ये एक गट वसंतदादा पाटील यांच्याविरोधात गेला. याचा फायदा विरोधी पक्षात असलेल्या जनता पक्षाने घेण्यास सुरुवात केली. याच काळात विधान परिषदेच्या अध्यक्षपदी गवई यांची एकमताने निवड करण्यात आली. दोन्ही काँग्रेसमधील वादामुळे आणि शरद पवार नेतृत्व करत असलेल्या गटामुळे वसंतदादा पाटील अडचणीत आले. १२ जून १९७८ रोजी शरद पवार यांच्यासह सुशीलकुमार शिंदे आणि इतर दोन प्रमुख मंत्र्यांनी राजीनामे दिले. इंदिरा काँग्रेसच्या मनमानीमुळे हा निर्णय घेत असल्याचे या चार मंत्र्यांनी जाहीर केले. शरद पवारांनी जनता पक्षाशी वाटाघाटी करत सत्तास्थापनेसाठी प्रयत्न सुरु केले अन् शरद पवारांनी मॅजिक फिगर गाठली. या नव्या आघाडीला 'पुरोगामी लोकशाही दल' असे नाव देण्यात आले.
१७ जून १९७८ साली वसंतदादा पाटील यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. अन् 'पुलोद' चे नेतृत्व करत १८ जून १९७८ रोजी वयाच्या अवघ्या ३८ वर्षी शरद पवारांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. वसंतदादा पाटील यांचं सरकार तीन महिन्यांमध्येच शरद पवार यांनी पाडले होते. शरद पवार हे यशवंतराव चव्हाण यांचे मानसपुत्र आणि यशवंतराव चव्हाण यांनी शरद पवारांच्या 'पुलोद' च्या प्रयोगाला आशीर्वाद दिला. यामुळे वसंतदादा पाटील आणि यशवंतराव चव्हाण यांच्यातही आरोप-प्रत्यारोप होऊ लागले.
शरद पवारांनी वसंतदादांचे सरकार पाडल्यानंतर आजवर या घटनेचा उल्लेख अनेक दिग्गज नेत्यांनी आणि खासकरुन शरद पवारांच्या विरोधात असलेल्या नेत्यांनी 'शरद पवारांनी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला' असाच केला आहे. बाळासाहेब ठाकरेंपासून उद्धव ठाकरेपर्यंतच्या नेत्यांनी वेळीवेळी या मुद्यावरुन शरद पवारांवर टीका केली. भाजपच्या गोपनाथ मुंडे ते प्रमोद महाजन यांनाही शरद पवारांवर टीका करताना 'खंजीर खुपसला' या वाक्यप्रचाराचा वारंवार उल्लेख केला.