कुटुंब नियोजन : लैंगिक शिक्षणावर सडेतोड बोलणारे रधों !!! | पुढारी

कुटुंब नियोजन : लैंगिक शिक्षणावर सडेतोड बोलणारे रधों !!!

पुढारी ऑनलाईन डेस्क : सेक्स, कामव्यवहार, कामप्रेरणा, समागम, कुटुंब नियोजन पद्धती, स्त्रियांचे विकार, स्त्री-पुरुष संबंध, प्रजनन, हे शब्द आजही आपल्या समाजात खुल्या विचाराने स्वीकारले जात नाहीत. तर, आजपासून नव्वद एक वर्षे मागे गेलं आणि या विषयावर प्रत्यक्ष मजकूर छापण्याचं धाडस एखाद्याने केलं असेल, समाजाचा क्रोधाग्नी कसा उफाळून आला असेल, याचा फक्त विचारच केलेला बरा. पण, एका महान व्यक्तीनं केलं होतं. त्यांचं नाव आहे रघुनाथ धोंडो कर्वे.  आज त्‍यांची  जयंती. संततिनियमन आणि लैंगिक शिक्षणासाठी त्‍यांनी केलेल्‍या कार्याचा हा संक्षिप्‍त आढावा….

१५ जुलै १९२७ रोजी ‘समाजस्वास्थ्य’ नियतकालिकेचा पहिला अंक प्रकाशित केला. स्त्री-पुरुष संबंध या विषयावर समाज बोलण्याचं टाळत असेल, तर या समाजस्वास्थ्य धोक्यात येते, ही अत्यंत साधी पण तत्कालिन समाजात धाडसाची ठरणारी विचारधारा कर्वेंनी निवडली होती. आज अगदी सहजपणे स्वीकारल्या जाणाऱ्या ‘कुटुंबनियोजना’च्या विचाराचे खरे श्रेय र. धों. कर्वे यांनाच जाते.

लोकसंख्या वाढ ही जगाची डोकेदुखी ठरलेली आहे. त्यात भारत चीन पाठाेपाठ दुसर्‍या स्‍थानी आहे. १४० कोटींचा टप्पा आपण पार पाडलेला आहे. पण, आज लोकसंख्या वाढीच्या मूळाशी जाऊन विचार करणं गरजेचं आहे. त्याला गांभीर्याने घेतलं जातंच असं नाही. पण, हा विषय गांभीर्याने घेऊन कर्वेंनी कुटुंब नियोजन या विषयाच्या प्रसारासाठी पुढाकार घेतला आणि ‘समाजस्वास्थ्य’ नावाचे नियतकालिक सुरू केले.

कुटुंब नियोजन www.pudhari.news

लोकसंख्येला आळा, नको असलेले गरोदरपण, गर्भपात यातून स्त्रीयांची सूटका होईल. कमी उत्पन्नातून होणारी कुटुंबाची फरपट थांबेल, असे समाज बदलाचे विचार कर्व्यांनी नियतकालिकेतून मांडले, त्याचा प्रसार केला. “बोल तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले”, या उक्तीप्रमाणे कर्व्यांनी फक्त विचारच मांडला नाही तर प्रत्यक्ष जीवनात त्याची अंमलबजावणी केली. र. धों. कर्वे यांनी आपल्या पत्नीला म्हणजेत मालतीला अपत्यच होऊ दिले नाही.

‘समाजस्वास्थ्य’ हे नियतकालिकेला समाजाने प्रचंड विरोध केला. पण, त्यांचा अंक चोरून वाचण्यास समाज मागे पडला नाही. कर्वे यांच्या समाज परिवर्तानाच्या विचार लोकांनी विरोध केला असला तर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, रियासतकार सरदेसाई, रॅंग्लर परांजपे, मामा वररेकर या मान्यवरांनी पाठिंबा दिला. महत्वाचं काय, तर इतकी वर्षं झाली तरी समाज अजूनही या विषयावर खुलेपणाने बोलताना दिसत नाही.

आजही एका सुधारलेल्या वर्गाने कुटुंबनियोजनाला सकारात्मकतेने घेतले असेल तरी, बहुसंख्य वर्ग या विचाराला स्वीकारताना दिसत नाही. अनेक मुलांना जन्म देऊन धर्म वाढवत असल्याचा प्रसार आजही समाजात धर्मपंडितांकडून होताना दिसतो. शासनाच्या धोरणामध्ये ‘कुटुंबनियोजन’, ‘नसबंदीचा कार्यक्रम’, यांसारख्या तत्सम कार्यक्रमांची आखणी केली असली तरी लोकसंख्या वाढीचा वेग कमी झाला आहे, असं आजही ठामपणे सांगता येत नाही. पण, र. धों. कर्वे यांनी खुलेपणाने मांडलेले विचार समाजाने स्वीकरणं आजही तितकंच गरजेचं आहे.

हे वाचलंत का?

Back to top button