गोव्यात भाजप बहुमताच्या जवळ; उत्तर गोव्यात राणे दाम्पत्य सर्वाधिक आघाडीवर | पुढारी

गोव्यात भाजप बहुमताच्या जवळ; उत्तर गोव्यात राणे दाम्पत्य सर्वाधिक आघाडीवर

पणजी, मडगाव: पुढारी वृत्तसेवा

गोव्यात प्राथमिक कलानुसार भाजप १८ जागांवर तर त्या खालोखाल काँग्रेस १२ जागांवर आघाडीवर आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष ५ जागांवर आघाडीवर आहे. गोवा फॉरवर्ड, आप प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहेत. अपक्षांनी ३ जागांवर आघाडी घेतली आहे. गोव्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये उत्तर गोव्यात विश्वजित राणे व त्यांच्या पत्नी डॉ. दिव्या राणे सध्या सर्वांधिक मतांनी आघाडीवर आहेत. पर्येमधून दिव्या राणे ८६९८ मतांनी आघाडीवर आहेत. तर वाळपईमधून ५८७४ मतांनी आघाडीवर आहेत.

कुडतरीमधून आलेक्स रेजिनाल्ड व कुठ्ठाळीतून आंतानिओ वाझ हे अपक्ष उमेदवार सध्या आघाडीवर आहेत. बाणावलीमध्ये विन्सी व्हीएगस हे आपचे उमेदवार आघाडीवर आहेत. दक्षिणेत मडगावमधील काँग्रेसचे उमेदवार दिगंबर कामत सर्वाधिक ५८४९ मतांनी आधाडीवर आहेत. लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या मांद्रे मतदारसंघात जीत आरोलकर आघाडीवर आहेत. त्यांच्या पाठोपाठ दयानंद सोपटे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. सकाळी पोस्टल मतदानात आघाडीवर असणारे उत्पल पर्रीकर ईव्हीएम मोजणीमध्ये ७०४ मतांनी सध्या पिछाडीवर आहेत. पणजीत बाबूश मोन्सेरात सध्या आघाडीवर आहेत.

नावेलीत अटीतटीची लढत

नावेली मतदारसंघात अटीतटीची लढत सुरू आहे. ९ उमेदवारांपैकी आपच्या प्रतिमा कुतिन्हो यांनी पहिल्या फेरीत आघाडी घेतली असून काँग्रेसचे आवेर्तान फुर्तादो यांच्यापासून त्या १८७ मतांनी आघाडीवर आहे. प्रतिमा आणि काॅंग्रेसचे आवेर्तान यांच्यात अटीतटीची लढत सुरू आहे. भाजपचे उल्हास तुएकर आणि तृणमूलच्या वालांका आलेमाव यांना अनुक्रमे ५०९ आणि ५२२ मते मिळालेली आहेत.

फातोर्ड्यात विजय सरदेसाई आघाडीवर

मतमोजणीच्या पहिल्या फेरीत फातोर्डा मतदारसंघातून गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई १६६३ मते घेऊन आघाडीवर आहेत. तर भाजपचे दामू नाईक हे १०७० मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांच्या मागोमाग आरजीच्या वेलेरी फर्नांडिस यांना २६४ मते प्राप्त झाली आहे. तर तृणमूलच्या सेवूला वाज यांना १४५ मते पहिल्या फेरीत प्राप्त झाली आहे. सरदेसाई दोन वेळा सदर मतदारसंघात निवडून आले आहे. ते तिसऱ्यांदा निवडणुकीत उतरले आहेत.

सावर्डेत गणेश गावकर आघाडीवर

सावर्डे मतदारसंघाचे भाजपचे बंडखोर नेते आणि अपक्ष उमेदवार दीपक पावसकर यांना भाजपचे उमेदवार गणेश गावकर यांनी १४०१ मतांनी मागे टाकले आहे. दीपक पावसकर हे भारतीय जनता पक्षाच्या सरकारात बांधकाम मंत्री राहिले आहेत. भाजपने शेवटच्या क्षणी त्यांना उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. मतमोजणीच्या पहिल्या फेरीत पावसकर यांना १०८९ एवढी मते प्राप्त झाली असून २४९० मते मिळवत भाजपचे गणेश गावकर आघाडीवर आहेत. काँग्रेसचे खेमलो सावंत ७८ मते घेऊन चौथ्या क्रमांकावर आहेत तर अपक्ष उमेदवार आणि कुळेचे सरपंच गंगाराम लांबोर यांना ७१ मते मिळालेली आहेत.

उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांना जबर धक्का बसण्याची शक्यता

केपे मतदारसंघात तीनवेळा जिंकून जिंकलेले भाजप सरकारातील उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांना जबर धक्का बसण्याची शक्यता आहे. केपेचे एल्टन डिकॉस्टा यांच्यापासून ते सुमारे १४२२ मतांनी पिछाडीवर आहेत. बाबू कवळेकर यांना पहिल्या फेरीत ९८१ मते प्राप्त झाली आहे. तर काॅंग्रेसचे एल्टन यांना २४०३ मते मिळालेली आहेत. आपचे राहुल परेरा यांना ६३ तर रेवोल्युशनरी गोवंसचे विशाल गावस देसाई यांना ३५८ मते मिळालेली आहेत. पहिल्या फेरीतच बाबू कवळेकर पिछाडीवर गेल्याने काँग्रेस समर्थकांमध्ये उत्साह संचारला असून भाजपमध्ये मात्र चिंतेचे वातावरण आहे. बाबू कवळेकर हे तीनवेळा काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आले आहेत. दोन वर्षांपूर्वी राजकीय घडामोडीत त्यांनी भाजपत प्रवेश केला होता. भाजप सरकारात ते उपमुख्यमंत्री आणि कृषीमंत्री सुद्धा होते.

मडगावमधून दिगंबर कामत आघाडीवर

मडगाव मतदारसंघातून काँग्रेसचे दिगंबर कामत २८८८ मते घेऊन आघाडीवर आहेत. तर भाजपचे बाबू आजगावकर ८८५ मते घेऊन पिछाडीवर आहेत. त्यांच्या मागोमाग आरजीचे लिकोलीन वाझ यांना पहिल्या फेरीत १४० मते प्राप्त झाली आहेत. तब्बल तीस वर्षे निवडणुकीत हॅटट्रिक साधणारे दिगंबर कामत आताही आघाडीवर आहेत.

सांगे मतदारसंघातून सावित्री कवळेकर आघाडीवर

सांगे मतदारसंघातून अपक्ष उमेदवार आणि बाबू कवळेकर यांच्या पत्नी सावित्री कवळेकर यांनी १३७ मतांची आघाडी घेतली. मतमोजणीची पहिली फेरी सध्या सुरू आहे, ज्यात काँग्रेसचे उमेदवार प्रसाद गावकर यांना ५९९ मते प्राप्त झालेली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार सावित्री यांना १२९८, सुभाष यांना ११६१, प्रसाद गावकर यांना ५९९ अशी मते मिळालेली आहेत. राष्ट्रवादीचे डोमानसियो बारेटो यांना ३२, तृणमूलच्या राखी नाईक यांनाही ३२ तर आपचे अभिजित देसाई यांना ६८ मते मिळालेली आहेत.

हे ही वाचा :

Back to top button