राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी अजित पवारांची निवड  | पुढारी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी अजित पवारांची निवड 

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यात विक्रमी मतांनी (१ लाख ६५ हजार) निवडून आलेल्या अजित पवार यांची विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला.

यानंतर सर्व नेत्यांकडून त्यांच्या नावाला अनुमोदन दिले. यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार स्तुतीसुमने उधळली. त्यांच्यामुळे राष्ट्रवादीला यश मिळाल्याचे पाटील यांनी सांगितले. पक्ष बदलून मत मिळत नाहीत असा टोमणा त्यांनी पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना लगावला.

नेतेपदी निवड झाल्यानंतर अजित पवार यांनी बेरोजगारी, शेती प्रश्नांवर आक्रमक भूमिका मांडणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर पराभूत झालेल्या उमेदवारांशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. विधानसभेतील गटनेता निवडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक आज मुंबईतील पक्षाच्या कार्यालयात झाली. यावेळी पक्षाचे सर्व नुतन आमदार उपस्थित होते. या निवडणुकीत युवा चेहरा म्हणून समोर आलेल्या पवार कुटुंबीयातील आमदार रोहित पवार यांची एन्ट्री लक्षवेधी झाली. 

शरद पवारांचे पक्षाच्या कार्यालयात आगमन होताच तुतारी वाजवून स्वागत करण्यात आले. कार्यालयही आकर्षक करण्यात आले आहे. पहिल्यांदाच पक्षाच्या कार्यालयात प्रवेश करत असलेल्या आमदार रोहित पवार यांनी आपल्यासाठी सर्वांत मोठा दिवस असल्याचे  सांगितले. पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदारांची संख्या अनेक असल्याने उत्सुकता असल्याचेही ते म्हणाले.

Back to top button