'मुनगंटीवार यांनी स्वतःला मंत्रिपद मिळतं का ते पहावे' | पुढारी

'मुनगंटीवार यांनी स्वतःला मंत्रिपद मिळतं का ते पहावे'

मुंबई : पुढारी ऑनलाईन

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर समान सत्तावाटप आणि मुख्यमंत्रिपदावरून भाजप-शिवसेनेत चांगलीच खडाजंगी सुरू आहे. मुख्यमंत्रिपदासह सत्तेत समसमान वाटा मिळावा यासाठी शिवसेना आग्रही आहे. यामुळे युतीत मोठा पेच निर्माण झाले असल्याचे चित्र राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे. यावरुन सेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना खोचक चिमटे काढले आहेत. राऊत यांनी भाजपचे नेते आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर तोफ डागली आहे. मुनगंटीवार यांनी स्वतःला मंत्रिपद मिळतं का ते पहावे, असा खोचक चिमटा राऊत यांनी मुनगंटीवार यांना काढला आहे.

मुनगंटीवार यांनी स्वतःला मंत्रिपद मिळतं का ते पहावे असा खोचक चिमटा काढत, विनाशकाले विपरीत बुद्धी हे विधान त्यांनी स्वतःबद्दल केले, असा टोलाही  राऊत यांनी लगावला. पर्याय सर्वांसाठी खुले असतात, पण आम्हाला ते पाप करायचे नाहीत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सत्तेचे समान वाटप होणार असे ठरले होते. त्यात मुख्यमंत्रिपद येत नाही का? मुख्यमंत्रिपद हे काही एनजीओचं पद आहे का, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. शिवसेनेने कुठलेही पाऊल मागे घेतलेले नाही. मुख्यमंत्रिपद हे एनजीओचे पद आहे काय?, असा सवाल करत मुख्यमंत्रिपद हे सत्तेचं पद आहे. समसमान वाटप म्हणजे सर्वच पदांचे ५०- ५० वाटप करणे असते. शिवसेना कोणत्याही पदांसाठी अडून बसलेली नाही. भाजपने सामंजस्याने घ्यायला हवे, असे राऊत यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले आहे.

भाजपच नव्हे, तर इतर कोणाकडेही १४५ आमदारांचे समर्थन असल्यास त्यांनी खुशाल सरकार तयार करावे, असे म्हणत भाजपला टोलाही मारला. तसेच जे जे प्रमुख नेते आहेत ते हारले आहेत किंवा त्यांना सत्तेपासून लांब ठेवले जात असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे.

इतकेच नव्हे तर शिवसेनेने मुखपत्र सामना अग्रलेखातूनही भाजपवर तोफ डागली आहे. ‘मुख्यमंत्री’ हे सत्तापद नाही व त्याचे समान वाटप करता येणे शक्य नसेल असे कुणाला वाटत असेल तर त्या बिन ‘सत्ते’च्या पदासाठी देशभरात इतका आटापिटा कशासाठी? मुख्यमंत्रीपदाचा म्हणा किंवा समसमान पदवाटपाचा पेच पडला आहे हे नक्की. जर सर्वकाही आधीच ठरले असेल तर पेच का पडावा? असा सवाल शिवसेनेने केला आहे. 

Back to top button