शरद पवारांच्या 'सिल्व्हर ओक'वर विरोधकांची खलबते! | पुढारी

शरद पवारांच्या 'सिल्व्हर ओक'वर विरोधकांची खलबते!

मुंबई : पुढारी ऑनलाईन

राज्यातील सत्ता समीकरणाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची त्यांची ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी भेट घेतली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले. 

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे शंभरच्या वर उमेदवार निवडून आले. आता राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. युतीत मुख्यमंत्रीपद आणि समसमान पदवाटपावरूव पेच आहे. सत्ता समीकरणाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि राष्ट्रवादीचे शरद पवार नेमकी काय भूमिका घेणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

काही वेगळा फॉर्म्युला वापरून सत्तेत सहभागी होणार असल्याच्या चर्चेवर शरद पवार यांनी याआधीच भूमिका स्पष्ट केली आहे. आम्हाला त्या रस्त्याने जायचे नाही. शेती आणि शेतीचे प्रश्‍न आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. उद्योगधंद्यातले मोठे राज्य असलेल्या महाराष्ट्रात ५० टक्के कारखाने बंद पडले आहेत. हजारोंचे रोजगार बुडत आहेत. या प्रश्‍नांसंबंधी जनमत तयार करणे, त्यांची सोडवणूक करण्यासाठी संघटनात्मक काळजी घेणे, यावर आमचे अधिक लक्ष राहील, असे पवार यांनी म्हटले आहे.

 

Back to top button