सीएम फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावर उद्धव ठाकरेंची नाराजी | पुढारी

सीएम फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्यावर उद्धव ठाकरेंची नाराजी

मुंबई : पुढारी ऑनलाईन

राज्यातील सत्ता स्थापनेचा अधिक खडतर होत चालला आहे.दिवाळी झाल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी वेग येईल असे चित्र होते,पण भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यामध्यॆ चाललेल्या रस्सीखेचमुळे मार्ग अधिक खडतर होत आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला अधिक महत्त्व द्यायचे नाही अशा पद्धतीने खलबते सुरू केल्याने दोन्ही पक्षांमध्ये अजून थेट कोणतीही चर्चा झालेली नाही. दिवाळी दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनौपचारिकपणे बोलताना मुख्यमंत्रिपदासाठी वाटाघाटी करताना कोणतीही चर्चा झालेली नाही. मेरिटनुसार मागण्या मान्य करू. अगदीच आडमुठेपणा घेतला जाणार नाही असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर शिवसेनेचा चांगलाच तिळपापड झाला आहे. त्यामुळे उभय पक्षातील होणाऱ्या चर्चाही थांबल्या. 

आता या वक्तव्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी  एका वृत्तवाहिनीशी बोलताना नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी असे वक्तव्य करायला नको होते असे उद्ध ठाकरे म्हणाले. भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार जे काही ठरलं आहे ते करावं आम्ही स्थिर सरकार देऊ. मी मित्रपक्षाला शत्रूपक्ष मानत नाही. मला खात्री आहे सगळं काही सुरळीत होईल असेही ते म्हणाले. 

तत्पूर्वी, शिवसेना विधिमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेतेपदाचा प्रस्ताव मांडला आणि सर्व आमदारांनी त्या प्रस्तावाला मंजुरी दिली. यामुळे शिंदे हेच शिवसेनेच्या गटनेतेपदी कायम राहिले. सुनील प्रभू यांची विधानसभेतील शिवसेनेच्या पक्षप्रतोदपदी निवड करण्यात आली आहे.

 

Back to top button