विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून नाना पटोलेंचा अर्ज दाखल | पुढारी

विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून नाना पटोलेंचा अर्ज दाखल

मुंबई : पुढारी ऑनलाईन

महाविकास आघाडी सरकारचे उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला आणि विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला देण्याचे निश्चित झाले. विधानसभेच्या अध्यक्षपदावर कोणाला बसवायचे यावरून काँग्रेसमध्ये धुसफूस सुरु होती. मात्र, आज या पदासाठी महाविकास आघाडीने एकमताने नाना पटोले यांचे नाव जाहीर केले. शिवसेना- राष्ट्रवादी- काँग्रेसच्या महाविकास आघाडीकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी आज एकमताने नाना पटोले यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला  आहे, अशी माहिती शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.

नाना पटोले हे अनुभवी नेते असून त्यांना सभागृहाचा प्रदीर्घ अनुभव आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी, नाना पटोले यांच्याकडे चांगले नेतृत्वगुण असून ते शेतकऱ्यांसाठी लढा देणारे नेते असल्याचे म्हटले. पटोले यांना विधीमंडळ कामकाजाचा अनुभव आहे, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

तर नाना पटोले यांनी, विधानसभेची आगळीवेगळी पंरपरा कायम ठेवण्याचा प्रयत्न करेन, असे सांगितले. जनतेला विधानसभेतून न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत राहीन, असेही ते म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्रीपदी शपथ घेतलेले जयंत पाटील यांनी, विधानसभा अध्यक्षपदाबाबत आता वाद राहिलेला नाही. तर उपमुख्यमंत्रीपदाबाबत शरद पवार निर्णय घेतील, असे स्पष्ट केले. आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव पारदर्शक पद्धतीने होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीमध्ये उपमुख्यमंत्रिपदावर कोणाला बसवावे याबाबत चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अजित पवार यांनाच उपमुख्यमंत्री बनवावे म्हणून आग्रही आहेत. परंतु काँग्रेसचा अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करण्यास विरोध असल्याची चर्चा सुरू आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची काँग्रेसमध्ये चर्चा होती. मात्र, पृथ्वीराज चव्हाण यांना अध्यक्षपद देण्यास राष्ट्रवादीचा विरोध असल्याचेही बोलले जात होते. विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसमध्ये पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण या दोन माजी मुख्यमंत्र्यांमध्ये स्पर्धा होती. मात्र, अखेर नाना पटोले यांचे नाव निश्चित झाले आहे.

 

Back to top button