...आणि भाजपच्या पायाखालची वाळू सरकली; एकनाथ शिंदेंचा पलटवार | पुढारी

...आणि भाजपच्या पायाखालची वाळू सरकली; एकनाथ शिंदेंचा पलटवार

मुंबई : पुढारी ऑनलाईन

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ठाकरे सरकारला आज विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागणार आहे. या ठरवापूर्वीच राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपाला सुरूवात झाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांचा शपथविधी बेकायदेशीर असल्याचा आरोप करत याविरोधात याचिका दाखल केली असल्याचे म्हटले. त्यांच्या या आरोपावर शिवसेना गटनेते एकनाथ शिंदे यांनी पलटवार केला आहे. कोणत्याही याचिकेला आम्ही घाबरत नसून भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. भाजप रडीचा डाव खेळू पाहतंय, असा आरोप शिंदे यांनी केला आहे. 

चंद्रकांत पाटील यांनी नव्या सरकारने सगळे नियम धाब्यावर बसवले असल्याचा गंभीर आरोप केला. प्रोटोकॉलनुसार शपथविधी झाला नसल्याचा दावा करत त्यांनी याबाबत राज्यपालांकडे याचिका दाखल केली असल्याची माहिती दिली. 

या पार्श्वभूमीवर बोलताना शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी पाटील यांच्यावर पलटवार केला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्याने भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असा टोला शिंदे यांनी यावेळी लगावला. 

विधानसभाध्यक्षसाठी महाविकास आघाडीकडून नाना पटोले यांना उमेदवारी देण्यात आली आहे आणि नाना पटोलेच अध्यक्ष होतील, असा विश्वासही शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. 

Back to top button