शिवसेना- राष्ट्रवादी- काँग्रेसकडून आमदारांना व्हीप जारी  | पुढारी

शिवसेना- राष्ट्रवादी- काँग्रेसकडून आमदारांना व्हीप जारी 

मुंबई : पुढारी ऑनलाईन

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा विश्वासदर्शक ठराव आज, दुपारी २ वाजता शनिवारी विधानसभेत मांडला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेसह राष्ट्रवादी आणि काँग्रेसने त्यांच्या सर्व आमदारांनी सभागृहात उपस्थित रहावे यासाठी पक्षादेश (व्हीप) जारी केला आहे. राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेते जयंत पाटील यांनी पक्षाच्या वतीने पक्षादेश बजावला आहे. 

राष्ट्रवादी पक्षाच्या सर्व विधानसभा सदस्यांना पक्षादेश बजावण्यात येत आहे की आज, शनिवार (दि.३०) रोजी विधीमंडळाचे अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मंत्रिमंडळावरील विश्वासदर्शक प्रस्ताव घेण्यात येणार आहे. तरी राष्ट्रवादी पक्षाच्या सर्व सदस्यांनी यावेळी सभागृहात पूर्णवेळ उपस्थित राहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या विश्वासदर्शक प्रस्तावाच्या बाजूने मतदान करावे, असे पक्षादेशमध्ये म्हटले आहे.

तर विधीमंडळात आज विश्वासदर्शक ठरावावेळी उपस्थित राहण्यासाठी काँग्रेसनेही तीन ओळींचा व्हीप जारी केला आहे.

महाराष्ट्र विकास आघाडीला बहुमत सिद्ध करण्यासाठी १४५ आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. महाराष्ट्र विकास आघाडीत सध्या एकूण १७३ आमदारांचा समावेश आहे. महाराष्ट्र विकास आघाडीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेससह इतर पक्ष आणि अपक्षांचा देखील समावेश आहे. 

 

Back to top button