कार्ल्याची आदिशक्ति एकविरादेवी
कार्ला- पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात असणा-या लोणावळा शहराजवळ असणारी कार्ला निवासनी शक्तिदायिनी आदिशक्ति श्री एकविरा आई महाराष्ट्राची आराध्य कुल देवता, हाकेला धावनाणारी व नवसाला पावणारी आई एकवीरा म्हणजेच आदिमाता रेणुका ही परशुरामाची माता होय.
एकवीरेची ख्याती सर्व कामप्रदायनी सह्याद्री खंडात असा उल्लेख सापडतो की भगवान शंकराचे वरदान लाभलेले आदिमाता रेणुकाचा इश्वांकंशीय राजा रेणू राज्याच्या नावावरून रेणुका हे नाव धारण झाले. पढे जन्मदग्री ऋषिंशी रेणुकाचा विवाह झाला. त्यानंतर रेणुकेस रुमावंत, सुशेषा, वसु, विश्वासू व परशुराम अशी पाच मुले झाली त्या पाच पुत्रांमध्ये एक महावीर असेल आणि त्याच्या पराक्रमामुळे तू एकविरा ओळखली जाशील असे वरदान भगवान शंकराने दिले.
आई एकविरेचे स्थान कार्ला गडावर स्वंयभू असून अतिशय प्राचीन आहे. आईची मुर्ती तांदळादगडात प्रगटलेली शेंदूर चर्चित आहे. आईचे डोळे मिन्यापासून बनविले आहेत आईचे रुप प्रसन्नकारी असून आई एकविरा जलदेवता म्हणुण प्रसिद्ध आहे. वेहेरगाव कार्ला गडावर देवीचे पुरातन मंदिर असून शेजारी बुध्दकालिन लेणी असल्याने येथे इतिहास संशोधक व परदेशी पर्यटकांची देखील खुप गर्दी असते. कार्ला गडावरील शिल्पे उशवदत्त शकाधिपती राजाने सन १२० मध्ये बांधली असल्याचा उल्लेख सापडतो, १८६६ मध्ये कार्ला गडावरील मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील थोर संत एकनाथ महाराज यांची ही कुलदेवता. एकविरा मातेची कहाणी स्कंदपुराण, महाभारत, गणेशपुराण, कालीपुराण आदीमध्ये दिसते.
आई एकविरा ही आगरी, कुणबी, कायस्थ, सोनार, क्षत्रिय, चौकळाशी, वैश्य इत्यादी समाजाची कुलदेवता आहे. त्यामुळे ठाणे, मुंबई, रायगड, यांच्यासह मावळ तालुक्याचे श्रध्दास्थान बनले आहे. त्यामुळे वर्षभर लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. तसेचे शेजारी असणा-या प्राचीन बौध्द कालिन कार्ला लेणी आहे. येथील शिल्प चायग्रह, सिंहस्तभादी शिल्प मुख गुफा, सभामंडप, उत्तर सिंहस्तस्तंभ, स्तंभावरील शिल्पे काष्टकाम भिंती चित्रे, शिलालेख यासाठी कार्ला लेणी देखील जगप्रसिध्द आहे. गडावर मुख्य चैत्रयात्रा व नवरात्रीमध्ये पालखी होमहवन, जागरण, गोंधळ, भजन, किर्तन यासारखे अनेक कार्यक्रम होत असतात याचबरोबर ट्रस्टच्या वतिने भाविकांसाठी दर्शन रांगेची व्यवस्था केली आहे.