दोन अल्पवयीन निरागस मुलींवर मानसिक आघात | पुढारी

दोन अल्पवयीन निरागस मुलींवर मानसिक आघात

मडगाव : रतिका नाईक वय अवघे तेरा वर्षे. मन कोवळे. प्रेम काय असते याची साधी जाणीव नाही.खेळण्या बागडण्याचे वय. अशा वयातील दोन निरागस, अल्पवयीन मुलींवर मातृत्व लादल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्या चार महिन्यांच्या गर्भवती राहिल्याचे समजल्यामुळे अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. दोघींवरही गर्भपात करण्याची वेळ आली.
या घटनेला महिना लोटला. या घटनेनंतर दोन्ही मुलींनी समाजापासून नाते जवळपास तोडले आहे. शाळेला जाण्यास त्या मुली घाबरत आहेत. लोकांच्या नजरेला नजर मिळवण्याची त्यांच्यात हिंमत नाही. गरीब कुटुंबात जन्मलेल्या या दोन्ही मुलींसाठी, त्यांच्या कुटुंबासाठी हा मोठा आघात आहे. त्यांच्या वडिलांनी तर कामावर जाणे बंद केले आहे. त्या नराधमांना अटक झाली आहे, त्या निष्पाप मुली मात्र विमनस्क मन:स्थितीची शिक्षा भोगत आहेत.
सध्या त्या मुलींवर लाजेपोटी घरात दडून बसण्याची वेळ आली आहे. पोलिसांनी कोणताही किंतु-परंतु मनात न ठेवता तपास केला तर नराधमांना शिक्षा होईलच, पण ज्या लाजेपोटी मुलींनी शिक्षण घेणे बंद केले आहे. ज्यामुळे त्यांच्या आईवडिलांनी कामावर जाणेही बंद केले आहे, या गरीबांचा आता कोण विचार करणार?

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अशा मुलींचा गर्भपात करता येतो; पण 13 वयाच्या मुलीचे शरीर मातृत्वच नव्हे तर गर्भपातसारखी वैद्यकीय प्रक्रिया करण्यासही तयार नसते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.असे म्हणतात की लहानपणी एखादी घटना घडल्यास ती जन्मभर लक्षात राहते. शिवाय घटनेनुसार मुलावर चांगले वाईट परिणामही होतात. एकाने वाईट स्पर्श केला तरी मुलांना ते जन्मभर लक्षात राहते. त्यामुळे या मुलींना तसेच त्यांच्या कुटुंबियांचेही समुपदेशन होणे खूप खूप गरजेचे आहे. सर्व सरकारी यंत्रणांसह सामाजिक संस्थांनी, अशासकीय संस्थांनी या समुपदेशनासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. कायदेशीर कारवाई एक भाग झाला, परंतु त्यांचे नीतीधैर्य खचू नये, याची जबाबदारी सामाजिक कार्यकर्ते, संस्थांनी स्वीकारायला हवी.

Back to top button