लातूर : खुनातील फरार आरोपीचा पोलिस निरीक्षकावर हल्ला | पुढारी

लातूर : खुनातील फरार आरोपीचा पोलिस निरीक्षकावर हल्ला

लातूर; पुढारी वृत्तसेवा : खुनातील फरार आरोपीस ताब्यात घेत असताना आरोपीने पोलिस निरीक्षकावर जीवघेणा हल्ला केला. आरोपीने पोलिस निरीक्षकांचे पिस्टल हिसकावून घेण्याचा प्रयत्न करीत त्यांना मारहाण केली. यावेळी पोलिस निरीक्षकांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला. यामध्ये आरोपी जखमी झाला आहे. पोलिस निरीक्षक विजय मोहिते व आरोपी नारायण तुकाराम इरबतनवाड वर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुधवारी (दि. १) रात्री ही घटना घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, 24 मार्च रोजी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह चाकुर पोलिस ठाणे हद्दीत मिळून आला होता. याबाबत चाकुर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता. तपासात मृत व्यक्ती हा शिरूर ताजबंद येथील सचिन उर्फ लालू शिवसांब दावनगावे असल्याचे सिद्ध झाले होते. गुन्ह्याचा तपास सुरू असताना मयत सचिन दावनगावे व नारायण तुकाराम इरबतनवाड याचा जागेवरून वाद होता, असे कळले होते. नारायण इरबतनवाड याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने सचिनचा खून केल्याचे निष्पन्न झाले होते. त्याच्या नंतर त्याला अटक करून चाकूर पोलिस ठाण्यात चौकशीसाठी आणले होते. 24 मार्च रोजी तो चाकुर पोलीस ठाण्यातून पळून गेला होता. त्याचा शोध घेण्यासाठी 11 राज्यासह महाराष्ट्रातील विविध शहरात पोलिस पथके रवाना झाली होती.

दरम्यान लातुरातील श्रीनगरमध्ये एका भाड्याच्या घरात तो लपून बसल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलीस निरीक्षक बालाजी मोहिते यांच्या पथकाने सदर घरावर छापा टाकला असता तो पळून जात होता. पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्याने पोलीस निरीक्षक बालाजी मोहिते यांच्यावर हल्ला करून त्यांचा दोन्ही हाताने गळा दाबला. त्यांच्या गुप्तांगावर मारून त्यांचे पिस्टल तो हिसकावून घेत होता त्यावेळी स्वसंरक्षणार्थ मोहिते यांनी एक गोळी त्याच्यावर झाडली त्यात नारायण इरबतनवाड जखमी झाला.

दरम्यान नारायण इरबतनवाड विरोधात यापूर्वी अहमदपूर बीड, अहमदनगर, खामगाव, बुलढाणा येथे गुन्हे दाखल असल्याची पोलिसानी दिली. अधिक तपास पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले हे करीत आहेत.

Back to top button