लाच स्वीकारणारे सरपंच, उपसरपंच एसीबीच्या जाळ्यात | पुढारी

लाच स्वीकारणारे सरपंच, उपसरपंच एसीबीच्या जाळ्यात

गडचिरोली : पुढारी ऑनलाईन 

कंत्राटदाराने केलेल्या कामाचे देयक मंजूर करण्याकरिता त्याच्याकडून १ लाख १० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज चामोर्शी तालुक्यातील नेताजीनगर ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचास रंगेहाथ पकडून अटक केली. गोपाल नगेन पाल(५२), असे सरपंचाचे, तर संजित कांचन भट्टाचार्य(३५) असे उपसरपंचाचे नाव आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्त्या कंत्राटदाराने नेताजीनगर ग्रामपंचायतीमार्फत गटारे, सिमेंट काँक्रिट रस्ता व बंधाऱ्याचे बांधकाम केले. त्या कामाचे २२ लाख रुपयांचे देयक त्याला ग्रामपंचायतीकडून घ्यावयाचे होते. मात्र, धनादेशावर स्वाक्षरी करण्यासाठी सरपंच गोपाल पाल व उपसरपंच संजित भट्टाचार्य यांनी कंत्राटदारास २ लाख २० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती ते १ लाख १० हजार रुपये स्वीकारण्यास तयार झाले. परंतु लाच देण्याची तक्रारकर्त्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

त्यानुसार या विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज सापळा रचून सरपंच गोपाल पाल व उपसरपंच संजित भट्टाचार्य यांना ग्रामपंचायत कार्यालयात १ लाख १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडून अटक केली. एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सुरेंद्र गरड यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.

Back to top button