बारामती: माळेगाव गोळीबार प्रकरणी चौघांना अटक | पुढारी

बारामती: माळेगाव गोळीबार प्रकरणी चौघांना अटक

बारामती : पुढारी वृत्तसेवा

माळेगाव बुद्रूक (ता. बारामती) येथील रविराज सदाशिवराव तावरे (वय ४०) यांच्यावर गोळीबार करत जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी चौघांना अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये एका अल्पवयीनाचा समावेश आहे. पूर्ववैमनस्य व राजकिय आणि आर्थिक फायदा मिळविण्याच्या उद्देशाने हा हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी दिली. प्रशांत पोपटराव मोरे, टॉम उर्फ विनोद पोपटराव मोरे, एक अल्पवयीन मुलगा व  राहूल उर्फ रिबल यादव अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. 

जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांनी याप्रकरणी सोमवारी उशीरा फिर्य़ाद दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी प्राणघातक हल्ल्यासह शस्त्र अधिनियम व अन्य कलमांनुसार गुन्हा दाखल केला होता.  पोलिस निरीक्षक ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश लंगुटे, उपनिरीक्षक नितीन मोहिते आदींची पथके तयार करण्यात आली होती. त्यात उरूळीकांचन येथे आरोपी असल्याची माहिती मिळाली. दुसऱया पथकाला यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश असल्याचे व तो माळेगावात असल्याचे कळाले. पोलिसांनी अवघ्या पाच तासात याप्रकरणी चौघा आरोपींना अटक केली. 

त्यांच्याकडे केलेल्या सखोल चौकशीतून गोळीबारामागील कारण स्पष्ट झाले. फिर्यादी तावरे या जिल्हा परिषद सदस्य असून त्यांनी केलेल्या विकासकामांचा रोष मनात धरून, फिर्य़ादीचे पती व कार्यकर्त्यांना वारंवार धमकावण्याचा प्रयत्न करत त्यातून दहशत माजविण्यासाठी तसेच पूर्व वैमनस्यातून राजकिय व आर्थिक फायद्यासाठी रविराज यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. ही कामगिरी ढवाण, लंगुटे, मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली राहूल पांढरे, नंदू जाधव, विजय वाघमोडे, विनोद लोखंडे, नितीन चव्हाण, दिपक दराडे, निखील जाधव यांनी केली. 

माळेगाव-पणदरे जिल्हा परिषद गटाचे प्रतिनिधित्व करणाऱया रोहिणी तावरे यांच्यासमोरच त्यांचे पती रविराज तावरे यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना सोमवारी (दि. ३१ मे) रोजी सायंकाळी माळेगावातील संभाजीनगर येथे घडली होती. पत्नीसह स्वतःच्या मोटारीतून ते वडापाव आणण्यासाठी गेले होते. वडापाव विक्रेत्याला पैसे देवून ते मोटारीकडे येत असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. यामुळे बारामती तालुक्यात खळबळ उडाली होती. तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक महेश ढवाण यांच्यासह अधिकारी- कर्मचा-यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी अवस्थेतील तावरे यांना येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. आमदार रोहित पवार यांनीही तात्काळ हॉस्पिटलमध्ये जात तावरे यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. असले प्रकार बारामतीत खपवून घेणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.  उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे रविराज हे निकटवर्तीय आहेत. पवार यांना या घटनेची माहिती कळताच त्यांनी पोलिस खात्याला कारवाईचे आदेश दिले. तसेच तावरे यांच्या प्रकृतीसंबंधीची माहिती सातत्याने घेतली. बारामती हॉस्पिटलमधील उपचारानंतर तावरे यांना गिरीराज रुग्णालयात हलविण्यात आले. पवार यांच्या प्रयत्नातून पुण्यातील डॉक्टरांचे पथकही बारामतीत दाखल झाले होते. 

सोमवारी रात्री उशीरा जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनीही बारामतीला भेट देत परिस्थितीची पाहणी केली होती. अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ पथके रवाना करण्यात आली. दुसरीकडे माळेगावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी बंदोबस्त वाढविण्यात आला होता. 

Back to top button