वास्तुपूजनाच्या जेवणातून १०४ लोकांना विषबाधा! | पुढारी

वास्तुपूजनाच्या जेवणातून १०४ लोकांना विषबाधा!

भंडारा : पुढारी ऑनलाईन 

वास्तुपूजनाच्या कार्यक्र मात जेवनातून १०४ जणांना विषबाधा झाल्याची घटना भंडारा तालुक्यातील कोथुर्णा येथे गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे. आरोग्य विभागाने तातडीने गावात दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

कोथुर्णा येथील गजानन खोकले यांच्या घराचे बुधवारी वास्तुपूजन होते. या कार्यक्रमासाठी विविध गावावरुन त्यांचे नातेवाईक व गावातील मंडळी असे सुमारे २०० जण आले होते. जेवनानंतर सर्व आपआपल्या घरी निघून गेले. दरम्यान, गुरुवारी सकाळी त्यांना हगवन, मळमळ, उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यामुळे लोकांची गर्दी कोथुर्णा प्राथमिक केंद्रात होऊ लागली. चौकशीअंती वास्तुपूजनाच्या जेवनातून हा प्रकार घडल्याचे उघड झाले. यात एकूण १०४ जणांना विषबाधा झाली. घरमालक गजानन खोकले यांनाही विषबाधा झाल्याचे समोर आले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत वैद्यकीय पथक गावात दाखल झाले. १०३ लोकांवर प्राथमिक उपचार करून घरी पाठविण्यात आले. तर एका महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून आरोग्य विभाग लक्ष ठेऊन आहे.

Back to top button