पुणे : व्याज न दिल्याने ओढून नेली चारचाकी | पुढारी

पुणे : व्याज न दिल्याने ओढून नेली चारचाकी

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा 

वेळेवर व्याज न दिल्याने तिघांनी मिळून एकाची चारचाकी ओढून नेली. या प्रकरणी त्यांच्यावर सावकारी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार फेब्रुवारी २०१९ ते मे २०२१ दरम्यान पिंपळे सौदागर येथे घडला. 

राहुल रविंद्र जुनवणे (वय ४०, रा. औंध) शुभम अलोक अगरवाल (वय २१, रा. खडकी), नितेश अरुण उत्तरकर (वय ३१, रा . एम.जी रोड, खडकी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील अगरवाल याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी महेश पोपट काटे (वय ३९, रा.काटेनगर, पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी फेब्रुवारी २०१९ मध्ये आरोपींकडून दरमहा चार टक्के व्याजदराने सहा लाख रुपये घेतले. त्यासाठी आरोपींनी त्यांच्याकडून चारचाकी कारचे कागदपत्र आणि दोन चेक घेतले. दरम्यानच्या काळात फिर्यादी यांना व्याज देणे शक्य झाले नाही. त्यामुळे आरोपींनी फिर्यादी यांचा चेक दुप्पट रक्कम टाकून बाऊन्स केला. तसेच, त्यांची चारचाकी कार जबरदस्ती नेऊन विकून टाकण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पुढील तपास सांगवी पोलिस करीत आहेत.        

‘पुढारी’ने वेधले होते लक्ष…

पिंपरी – चिंचवडमध्ये सुरु असलेल्या खासगी सावकारीकडे सर्वप्रथम ‘पुढारी’ने लक्ष वेधले. ”कोरोनाने मारले ; सावकारीने घेरले” या मथळ्याखाली ‘पुढारी’त नुकतेच वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी खासगी सावकारांची मुस्कटदाबी करण्यास सुरुवात केली. पिंपरी कॅम्पातील बुग्गी, वाकडचा लॅन्ड माफिया अमित कलाटे आणि आता औंध येथील मोठे प्रस्थ असलेल्या जुनवणेसह तिघांवर गुन्हा दाखल केल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

Back to top button