यवतमाळ : ४ कोटींचे अवैध बियाणे जप्त | पुढारी

यवतमाळ : ४ कोटींचे अवैध बियाणे जप्त

यवतमाळ;पुढारी वृत्तसेवा: बीज प्रक्रिया केंद्रातअवैधरित्या तयार करण्यात आलेले चार कोटी २० लाख रुपयांचे बियाणे जप्त करण्यात आले. कृषी विभागाच्या पुणे, अमरावती आणि यवतमाळ येथील तीन पथकांनी दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथे शुक्रवारी (ता. ४) ही कारवाई केली. जप्त करण्यात आलेल्या बियाण्यामध्ये तूर, सोयाबीन, हरभरा यांचा समावेश आहे. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.

खुल्या बाजारातून सोयाबीन, तूर, चना  आणून, त्‍याची मशीनमधून छाटणी करून बॅग भरायची. तयार झालेली ३० किलोची बॅग शेतकऱ्यांच्या माथी मारायची. अशा प्रकारे एका सीड प्रोसेसिंग प्लान्टमध्ये अवैधरित्या बियाणे तयार केले जात होते. कमी दरात मिळत असल्याने शेतकरी हे बियाणे खरेदी करत होते.  या संदर्भात कृषी विभागाच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली. कारवाईच्या दृष्टीने तीन पथके तयार करण्यात आली. एकाचवेळी या पथकाने धाड टाकून कारवाई केली आणि शुक्रवारी रात्री या बियाण्यांचा भांडाफोड झाला.

या बीज प्रक्रिया केंद्रावरून ८५० क्विंटल सोयाबीन व तूर बियाणे, ६६०.५ क्विंटल लूज  सोयाबीन, १७७९.३ क्विंटल लूज तूर, २७०० क्विंटल लूज चना आणि ट्रकमधून २५० क्विंटल सोयाबीन जप्त करण्यात आले. या सर्व मालाची किंमत चार कोटी २० लाख रुपये असल्याचे तपास पथकाकडून सांगण्यात आले. ही कारवाई कृषी आयुक्तालय पुणेचे तंत्र अधिकारी सुधीर बाईनवाड, कृषी अधिकारी अजय वघरे, अमरावतीचे तंत्र अधिकारी नरेंद्र बारापात्रे, यवतमाळचे कृषी अधीक्षक नवनाथ कोळपकर, कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे यांच्यासह कृषी विभागातील पंकज बर्डे, मस्करे, राजू शिंदे, शेखर थोरात, शिवा जाधव यांनी पार पाडली.

Back to top button