दरोडा, वाटमारी करणारी टोळी जेरबंद; मुद्देमाल जप्त | पुढारी

दरोडा, वाटमारी करणारी टोळी जेरबंद; मुद्देमाल जप्त

सांगली : पुढारी वृत्तसेवा

दरोडा, जबरी चोरी, चाकूचा धाक दाखवून लुटणे या गुन्ह्यांबद्दल पोलिसांनी तिघांना अटक केली. त्यांच्याकडून चांदीचे दागिने, मोबाईल, दुचाकी, दोन चाकू असा सुमारे 63 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. 

पल्ली गंगाराम काळे (वय 25), आनंदा रामा काळे (दोघे  रा. मल्लेवाडी) आणि अक्षय शहाजी काळे (रा.  मालगाव) अशी संशयितांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई 

केली. मिरज ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीतील पंढरपूर रस्त्यावरील तानंग फाटा येथे अजंठा प्रिकास्ट कारखान्यात काही दिवसांपूर्वी  दरोडा पडला होता. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. जुन्या रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी करीत असताना या दरोड्याच्या गुन्ह्यातील चोरलेला  मुद्देमाल विक्री करण्यासाठी एकजण येणार असल्याची माहिती  पोलिसांना मिळाली. 

त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून मिरज येथील गाडवे चौकाजवळ पल्ली काळे याला  पकडले. त्याच्याकडे (एमएच 10 बीपी 4368) ही दुचाकी होती. त्याच्याकडे असलेल्या  कापडी पिशवीमध्ये काय आहे, असे विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.   त्यामुळे त्याची  झडती  घेतली. त्याच्याकडे  चांदीचे दागिने,   दोन  चाकू मिळाले.  त्याने सांगितले की, मी इतर दोन साथीदारांच्या मदतीने  एका पाईपच्या कंपनीमध्ये  जाऊन आत झोपलेल्या  लोकांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील चांदीचे दागिने आणि रोख रक्कम घेतली होती.त्याशिवाय   वाटसरुंना अडवून  त्यांचा  मोबाईल घेतला असल्याची कबुली दिली.  

इतर  दोन साथीदार टाकळी रस्त्यावर आंबेडकरनगर येथे असल्याचे त्याने सांगितले. त्याप्रमाणे  पथकाने टाकळी रोडवर आंबेडकरनगर येथे छापा टाकून आनंदा काळे आणि अक्षय काळे या दोघांना ताब्यात  घेतले.  दरोडा आणि वाटमारीचा गुन्हा केला असल्याची कबुली त्यांनी दिली आहे. त्यांच्यावर इतर पोलिस ठाण्यात दरोडा व जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत असे पोलिसांनी सांगितले.

त्यांच्याकडून   चोरीस गेलेल्या चांदीच्या साखळ्या,  चांदीचे पैंजण,  मोबाईल, दुचाकी, दोन चाकू असा  63 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.   मिरज ग्रामीण पोलिस ठाणे येथे तिघांच्याविरोधात  गुन्हा दाखल झाला आहे.   पुढील तपास मिरज ग्रामीण पोलिस ठाणेतील पोलिस करीत आहेत.

Back to top button