कोल्हापूर : जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाचा निर्घृण खून | पुढारी

कोल्हापूर : जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाचा निर्घृण खून

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : घर जागेच्या वादातून सख्या भावासह पुतण्या आणि आणि जावयाने धारदार शस्त्राने हल्ला करून भगवान रामचंद्र बुचडे (वय 55 रा. वरणगे पाडळी, ता. करवीर) यांचा खून केला. शनिवारी सकाळी ही घटना घडली. पोलीस सूत्रांकडून दिलेल्या माहितीनुसार मृत भगवान आणि मुख्य संशयित भैरवनाथ हे दोघे सख्खे भाऊ आहेत. घरालगत असलेल्या १५ आणि पाच गुंठे जमिनीवरून त्यांच्यात वर्ष दीड वर्षांपासून वाद सुरु होता. 

अधिक वाचा : शिवाजी महाराजांचा पुतळा रायगडावर मेघडंबरीत बसला आणि आनंदाश्रू वाहू लागले…

या हल्ल्यात भगवान बुचडे यांचा मुलगा महेश (वय 22) आणि हल्लेखोर भैरवनाथ बुचडे (वय 34) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी भैरवनाथ रामचंद्र बुचडे, नाना भैरवनाथ बुचडे, जावई सुधीर थोरात यांच्या विरुद्ध करवीर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक वाचा : UNLOCK : कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्याचा तिसऱ्या टप्प्यात समावेश! ‘अशी’ असेल नियमावली

याप्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप कोळेकर, सहाय्यक निरीक्षक अरविंद कांबळे घटनास्थळी दाखल झाले आहेत. बुचडे कुटुंबातील कर्त्याचा घरासमोरील रस्त्यावरच खून झाल्याने नातेवाईकांनी आक्रोश केला.

अधिक वाचा : कोल्हापूर : जि.प.तील शिवसेना सभापतींच्या राजीनाम्यासाठी मुंबईतून फिल्डिंग

जमिनीच्या कारणातून त्यांच्यात सुरू असलेला वाद सामोपचाराने मिटवण्यासाठी गावातील प्रमुख मंडळीसह नातेवाईकांनी प्रयत्न केले होते. मात्र, हा वाद टोकाला गेला होता भगवान बुचडे यांनी याप्रकरणी तंटामुक्त समितीकडे धाव घेतली होती.

समिती सदस्यांनी या विषयावर येत्या सोमवारी बैठक बोलावली होती. मात्र संशयित भैरवनाथ बुचडेने दोन दिवसांपूर्वी घरालगत असलेल्या पाच गुंठे जागेत जनावराचा गोठा बांधण्याचे काम सुरू केले. त्यास भगवान व कुटुंबीयांनी विरोध केला होता. जागेची वाटणी झाल्यानंतर गोटा बांध असेही त्यास सांगण्यात आले होते. मात्र त्याने ताठर भूमिका घेतली होती. 

भगवान बुचडेने आज सकाळी समझोता करण्यासाठी चार बहिणींना घरी बोलावले होते. त्यांच्यात चर्चा सुरू असतानाच भैरवनाथ आणि त्याच्या मुलाने पुन्हा गोठ्याचे काम सुरू केले. त्यास भगवान तसेच त्यांचा मुलगा महेश आणि कुटुंबीयांनी विरोध करून काम रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्यात जोरदार वादावादी तसेच मारामारी झाली.

हा वाद सुरू असतानाच पुतण्या नाना व जावई सुधीर थोरात यांनी धारदार शस्त्राने भगवान व त्यांच्या मुलावर हल्ला केला. पोटावर छातीवर तसेच कमरेवर झालेल्या वर्मी घावामुळे भगवान रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. अतिरक्तस्राव झाल्याने तडफडून मृत्यू झाला. 

Back to top button