पुणे : आठ वषापूर्वीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी बांधकाम ठेकेदारावर गोळीबार | पुढारी

पुणे : आठ वषापूर्वीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी बांधकाम ठेकेदारावर गोळीबार

पुणे : पुढारी वृत्तसेवा

बांधकाम ठेकेदार रवींद्र तागुंदे याच्यावर शनिवारी (दि. ६) सकाळी वारजेतील डुक्कर खिंडीजवळ चार गोळ्या झाडून खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार घडल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली होती. परंतु, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासात गुन्ह्याचा छडा लावत एकाला बेड्या ठोकल्या. आठ वर्षापूर्वी ऑगस्ट २०१३ मध्ये झालेल्या दीपक सोनवणे याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हा खुनी हल्ला केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.  

अभिजित तुकराम येलवांडे (वय २४, रा. कर्वेनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. नकुल श्याम खाडे, चेतन चंद्रकांत पवार आणि उमेश चिकणे यांच्याबरोबर मिळून येलवांडे याने हा हल्ला केल्याचे उघड झाले आहे. वारजे पोलिसांनी याप्रकरणातील आणखी एकाला ताब्यात घेतले आहे.

कर्वेनगरमधील महावीर ओव्हाळ आणि दीपक सोनवणे यांच्यामध्ये वैर होते. त्यातून दीपक सोनवणे व त्याच्या दोन भावांनी ओव्हाळ याच्यावर हल्ला केला होता. या प्रकरणात वारजे पोलिसांनी दीपक सोनवणे व त्याच्या भावांना अटक केली होती. दीपक सोनवणे हा जामीनावर सुटून आल्यावर महावीर ओव्हाळ व इतरांनी केलेल्या हल्ल्यात दीपक सोनवणे (वय २६, रा. सुयोगनगर, वारजे). याचा खुन झाला होता. त्यात ओव्हाळ, रवींद्र तागुंदेसह पोलिसांनी ६ जणांना अटक केली होती. या खटल्यातून रवींद्र तागुंदे याची निर्दोष सुटका झाली होती. त्याचा बदला घेण्यासाठी हा हल्ला झाल्याचे उघड झाले आहे. तागुंदे या हल्ल्यात बचावला.

पोलीस अंमलदार राजेंद्र लांडगे व नितीन रावळ यांना तांगुदे यांच्यावर हल्ला करणारा अभिजीत येलवांडे हा गोसावी वस्ती येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार खंडणी विराधी पथकाकडील सहायक पोलीस निरीक्षक संदीप बुवा, अंमलदार राजेंद्र लांडगे, विवेक जाधव, नितनी रावळ, प्रफुल्ल चव्हाण, विजय कांबळे यांनी सापळा रचून येलवांडे याला पकडले. त्याने चौकशीत दीपक सोनवणे याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हा हल्ला केल्याची कबुली दिली. येलवांडे याच्यावर यापूर्वीचे ४ गुन्हे दाखल आहेत. अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल पाटील यांच्या खंडणी विरोधी पथकाने ही कामगिरी केली.

Back to top button