नंदुरबार : तुटलेल्या वीजेच्या तारेच्या स्पर्शाने दोन मुलींचा मृत्यू

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा: अक्राणी तालुक्यातील दूर्गम भागात[y उदय नदी किनार्यावरील भोगवाडे गावात तुटून पडलेल्या वीज तारांचा स्पर्श झाल्याने दोन मुलींचा जागीच मृत्यू झाला. हर्षदा टेट्या पावरा (वय १३ ) आणि ( वय १४ ) आरती पावरा अशी त्यांची नावे आहेत. या दुर्घटनेत तीन शेळ्यांचाही मृत्यू झाला असून, भोगवाडे गावावर शोककळा पसरली आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी (धडगाव) तालुक्यातील उदय नदी किनारी भोगवाडे गावापासून ५०० मीटर अंतरावर रविवार[ (दि.६ जून) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हर्षदा आणि आरती या शेळ्या चारण्यासाठी गेल्या होत्या. परंतु उशिरापर्यंत परतल्या नाहीत. त्यांचा शोध घेण्यात आला. नदी किनारी तुटून पडलेल्या वीज तारांचा स्पर्श होऊन विजेच्या धक्क्याने दोन्ही मुलींचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी चारण्यासाठी नेलेल्या तीन शेळ्यांचाही मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांनी या घटनेची पोलिस पाटलांना माहिती दिली. पोलिस निरीक्षक महाजन व तहसीलदार सपकाळे यांना घटना कळविली. ७ जून रोजी पथकाने घटनास्थळी येऊन पंचनामा केला.
वीजतार खेचून वीज वापरणे बेतले मुलींच्या जीवावर
एक शेतकरी नदी किनार्यावरील वीज खांबावरून वीजतार खेचून नेऊन वीज वापरत होता. ती वीज वाहिनी लाकडी दांडक्याला लावलेली होती. तीच वीज वाहिनी वादळ पावसात तुटून पडली होती; परंतू या मुलींना ती दिसली नाही. त्यामुळे हा अपघात घडला, असे प्राथमिक पाहणीत आढळून आले आहे. या प्रकरणी धडगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे.