नगर : प्रेमसंबंधातून बदनामीच्या भितीनेच रेखा जरेंची बाळ बोठेनं दिली हत्येची सुपारी! | पुढारी

नगर : प्रेमसंबंधातून बदनामीच्या भितीनेच रेखा जरेंची बाळ बोठेनं दिली हत्येची सुपारी!

नगर;पुढारी वृत्तसेवा : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. मृत रेखा जरे व या हत्याकांडाचा पोलिसांनी घोषित केलेला ‘मास्टरमाईंड’ बाळ बोठे यांच्यात प्रेमसंबंध होते. त्यात झालेल्या वादानंतर आता आपली बदनामी होईल, या भीतीनेच बोठे याने आरोपींना जरे यांच्या हत्येची सुपारी दिल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात पारनेर येथील न्यायालयात आरोपी बोठे याच्यासह सात आरोपींच्या विरोधात 450 पानांचे पुरवणी दोषारोपपत्र 26 जणांच्या जबाबासह दाखल करण्यात आल्याची माहिती तपासी अधिकारी तथा पोलिस

उपअधीक्षक अजित पाटील यांनी दिली.

जरे यांच्या हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी घटना घडल्यानंतर दोन दिवसांत ज्ञानेेशर ऊर्फ गुड्डू शिवाजी शिंदे (श्रीरामपूर), फिरोज राजू शेख (राहुरी), आदित्य सुधाकर चोळके (कोल्हार बुद्रुक), सागर भिंगारदिवे व ऋषिकेश पवार (रा. नगर) या पाचजणांना अटक केली होती. यासर्वांच्या विरोधात अगोदरच दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे. घटनेनंतर 102 दिवसांनी बाळ बोठे याला अटक करण्यात आली होती. फरार झालेला बोठे हैदराबाद येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी त्याच्या शोधासाठी विविध पथके पाठवली होती. या पथकाने 12 मार्चरोजी बोठे याच्यासह सहा जणांना हैदराबाद येथे अटक केली होती.

जनार्दन अकुला चंद्राप्पा, राजशेखर अंजय चाकाली (वय 25, रा. गुडुर करीमनगर, मुस्ताबाद, आंध्र प्रदेश), शेख इस्माईल शेख अली (वय 30, रा. बालापुर, सरुरनगर, रंगारेड्डी, आंध्रप्रदेश), अब्दुल रहमान अब्दुल अरिफ (वय 52, रा. चारमिनार मशीद, रंगारेड्डी, आंध्रप्रदेश) यांना अटक करण्यात आली आहे. तर पी. अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी (रा. हैदराबाद) ही आरोपी महिला अद्यापही फरार आहे. बोठेला अटक केल्यानंतर नगरमधून त्याच्या संपर्कात असलेल्या महेश तनपुरे यालाही पकडण्यात आले होते.

पारनेर येथील न्यायालयात दाखल असलेल्या 750 पानांच्या दोषारोपपत्रात सुरुवातीला अटक केलेल्या पाच आरोपींचा समावेश होता. बोठे याला अटक केल्यानंतर मंगळवारी पारनेर येथील न्यायालयामध्ये सात जणांविरुद्ध दोषारोपपत्र तपासी अधिकारी अजित पाटील यांनी दाखल केले आहे. या दोषारोपपत्रामध्ये बोठे याच्याकडून तपासामध्ये जी माहिती मिळालेली आहे, त्याचा सर्व उल्लेख करण्यात आलेला आहे. आरोपी बोठे हैदराबादमध्ये तोंड लपवून बसलेला असताना त्याला तेथील काही स्थानिकांनी मदत केली होती. अशा सात जणांचा कलम 212 अन्वये गुन्ह्यात सहभाग असल्याचे पुरवणी दोषारोपपत्रात म्हटले आहे. त्यांचा खुनाच्या कटामध्ये थेट सहभाग नाही, पण आरोपीला मदत करणे व अन्य कलमाअंतर्गत त्यांचा सहभाग असल्याचे दोषारोपपत्रात म्हटले आहे.

Back to top button