क्राईम : मृताचा चेहरा दगडाने ठेचून केला विद्रूप | पुढारी

क्राईम : मृताचा चेहरा दगडाने ठेचून केला विद्रूप

अमरावती : पुढारी वृत्तसेवा

डोक्यावर वार करून एका तरुणाची हत्या करून ओळख पटू नये म्हणून मृताचा चेहरा दगडाने ठेचून विद्रूप केल्याची घटना  घडली आहे. ही धक्कादायक घटना शिरखेड ठाण्याच्या हद्दीतील निंभी ते मोर्शी या रोडवर घडली. अद्याप मृताची ओळख पटली नाही. या प्रकरणात शिरखेड पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा नोंदविला आहे. 

मिळालेल्या माहितीनूसार, निंभी गावातील महिला पोलिस पाटील यांना गावातील सरपंचांनी निंभी ते मोर्शी रोडवर एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती दिली. या माहितीवरून पोलिस पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. 30 ते 35 वयोगटातील एक अनोळखी व्यक्ती मृतावस्थेत पडून असल्याचे त्यांना आढळून आले. मृताच्या अंगात काळ्या रंगाचा बरमुडा, गळ्यात लाल धागा, उजव्या कानात पांढऱ्या धातुची बाली, कमरेत काळ्या रंगाचा करदोळा होता. मृताच्या डोक्याला मार लागलेला आणि त्याचा चेहरा विद्रुप केलेल्या अवस्थेत असल्याचे आढळून आले.

यावरून कुणीतरी अज्ञाताने तरुणाच्या डोक्यावर मारून खून केला. व त्यानंतर दगडाने चेहरा विद्रुप केल्याचे आढळून आले. पोलिस पाटील यांनी या घटनेची माहिती शिरखेड पोलिसांना दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द हत्येचा व पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा नोंदविला.

या घटनेच्या अनुषंगाने पोलिस उपविभागीय अधिकारी कविता फरतोटे यांनी बुधवारी शिरखेड पोलिस ठाणे गाठले. त्यांनी हत्येच्या घटनेची माहिती घेऊन ठाणेदार केशव ठाकरे यांना चौकशीसंदर्भात योग्य त्या सुचना केल्या. मृत व्यक्ती अनोळखी असल्यामुळे त्याची ओळख पटविण्याचे काम पोलिसांनी सुरु केले आहे.

Back to top button