आईच्या कुशीत झोपलेल्या बाळाच्या विक्रीचा मनसुबा उधळला | पुढारी

आईच्या कुशीत झोपलेल्या बाळाच्या विक्रीचा मनसुबा उधळला

डोंबिवली : प्रतिनिधी

रस्त्याच्या कडेला फुटपाथवर झोपलेल्या आईच्या कुशीतून ६ महिन्यांच्या बाळाला विकण्यासाठी पळवून नेणाऱ्या ५ अपरणकर्त्यांना कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांनी मोठ्या कौशल्याने बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे एकीकडे अपहरण केलेले बाळ ४८ तासांच्या त्याच्या आईला परत मिळवून देणाऱ्या पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे. तर दुसरीकडे हे बाळ ज्या महिलेला विक्री करायचे होते त्या महिलेचा अद्याप सुगावा लागला नसून या महिलेलाही लवकरच गजाआड करण्यासाठी पोलिस जंग जंग पछाडत आहेत.

विशाल चंद्रकांत त्र्यंबके (वय २०, रा. आटाळी-आंबिवली), कुणाल विष्या कोट (२३ रा. साई राणा चाळ, दिवा-पूर्व), आरती कुणाल कोट (२२, दिवा), हिना फरहान माजीद (२६, रा. कोटर गेट मशिदजवळ, भिवंडी आणि फरहान अब्दुल रझाक माजोद (३८, रा. भिवंडी) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

या संदर्भात मूळची बिहार राज्यातील हाजीपुर, पटना येथे राहणारी सुनिता राजकुमार नाथ (३०) ही मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करते आणि रात्रीच्या सुमारास रस्त्याच्या कडेला फुटपाथवर बाळासह झोपते. या फिरस्त्या महिलेच्या तक्रारीवरून महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३६३, ३७०, ३४, सह अल्पवयीन न्याय कायदा सन २०१५ चे कलम ८०, ८१ अन्वये गुन्हा दाखल केला होता. कल्याण पश्चिमेकडील महंमद अली चौकात असलेल्या शिवमंदिराच्या बाजूकडील एका दुकानाबाहेर सुनिता शनिवारी ५ जून रोजी रात्रीच्या सुमारास झोपली होती. तिच्या शेजारी ६ महिन्यांचा जिवा देखील झोपला होता. मध्यरात्री १ च्या सुमारास जिवा अचानक गायब झाला. 

सुनिताने आपल्या लाडक्या जिवाला सर्वत्र शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो कुठेच आढळून आला नाही. अखेर पोलिस ठाणे गाठून जिवा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. बेपत्ता जिवाला शोधण्याची कामगिरी गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी सपोनि दिपक सरोदे, सपोनि प्रकाश पाटील, फौजदार संजय जगताप, सहाय्यक फौजदार जे. के शिंदे यांच्यावर सोपविण्यात आली. पोलिसांनी तपास चक्रांना वेग देऊन प्रथम जिवा बेपत्ता झालेल्या परिसरातील दुकानांना लावलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले. या फुटेजमध्ये काही लोक जिवाला त्याच्या आईच्या कुशीतून उचलून नेताना आढळून आले. त्यामुळे हा प्रकार अपहरणाचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मात्र पोलिसांनी तांत्रिक तपासाला वेग दिला. सर्वत्र खबऱ्यांचे जाळेही पसरले. अखेर पोलिसांना धागा सापडला. या पथकाने पाचही अपरणकर्त्यांना अवघ्या 48 तासांच्या आत मुसक्या आवळून गजाआड केले. त्यांच्याकडून अपहृत जिवाला ताब्यात घेतले आणि शोकाकूल सुनिताच्या ताब्यात दिले. जिवाला सुखरूप असल्याचे पाहून सुनिताच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता. अपरणकर्त्यांच्या तावडीतून जिवाची सुखरूप सुटका करणाऱ्या पोलिसांचे सुनितासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले.

यातील कुणाल आणि आरती कोट, तसेच हिना व फरहान माजीद हे पती-पत्नी आहेत. कुणाल आणि आरती कोट कोणताही काम-धंदा करत नाही. हे बाळ 1 लाख रुपयांना विकण्याकरिता विशाल त्र्यंबके आणि कुणाल कोट यांनी सुनिताच्या कुशीत झोपलेले बाळ अलगद उचलून पळवले. त्यानंतर या बाळाला आरती कोट हिच्या ताब्यात दिले. आरती कोट हिने हे बाळ हिना व फरहान माजीद यांच्या ताब्यात दिले. मात्र आरती आणि मजिद दाम्पत्य सदर बाळाला रिक्षातून घेऊन जात असताना पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेतले. हे बाळ कुणीतरी महिलेला १ लाख रुपयात विकण्याचा कट रचला होता. ज्या महिलेला विकले जाणार होते त्या महिलेचाही कसोशीने शोध सुरु आहे. अपरणकर्ते विशाल त्र्यंबके, कुणाल कोट, फरहान माजीद, आरती कोट, हिना माजीद या पाचही जणांना कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १४ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Back to top button