सेक्सटॉर्शनद्वारे संगीतकाराकडून पैसे उकळल्याचा प्रयत्न | पुढारी

सेक्सटॉर्शनद्वारे संगीतकाराकडून पैसे उकळल्याचा प्रयत्न

मुंबई ः पुढारी वृत्तसेवा

सेक्सटॉर्शनद्वारे एका संगीतकार तरुणाकडून पैसे उकळल्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार अंधेरी परिसरात घडला आहे. याप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. बदनामी करण्याची धमकी देऊन या व्यक्तीने आतापर्यंत संगीतकार तरुणाकडून सुमारे सव्वालाख रुपये घेतल्याचे तपासात उघडकीस आले आहे. 

यातील तक्रारदार अंधेरीतील वर्सोवा परिसरात राहतात. तो उदयोन्मुख संगीतकार म्हणून काम करतो. तो सोशल मीडियावर सक्रिय आहे. काही महिन्यांपूर्वी त्याची एका तरुणीसोबत ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले.एकमेकांचे मोबाईल क्रमांक शेअर केल्यानंतर त्यांच्यात चॅटींग सुरू झाले. मे महिन्यात या तरुणीने त्याला व्हॉट्स अ‍ॅप व्हिडीओ कॉल करून त्याच्याशी अश्लील संभाषण सुरू केले. तसेच त्याला अश्लील कृत्य करण्यास भाग पाडले. त्यानेही तिच्या सांगण्यावरून तिच्याशी अश्लील संभाषण आणि कृत्य केले. त्याचे तिने व्हिडीओ चित्रण केले. त्यानंतर त्याला अज्ञात व्यक्तीकडून सतत धमकी येत होती. त्याने पैसे न दिल्यास त्याचे अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. 

बदनामीच्या भीतीने त्याने अज्ञात व्यक्तीला ऑनलाईन एक लाख पंधरा हजार रुपये पाठवले. मात्र त्यानंतरही तो त्याच्याकडे सतत पैशांची मागणी करायचा. अखेर त्याने वर्सोवा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार नोंदवली. या तक्रारीची शाहनिशा केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खंडणीचा गुन्हा नोंदवला.

 

Back to top button