वीज बिल घोटाळा सोपवा आर्थिक गुन्हे शाखेकडे | पुढारी

वीज बिल घोटाळा सोपवा आर्थिक गुन्हे शाखेकडे

सांगली : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेच्या गेल्या पाच वर्षातील वीज बिलांचे ऑडिट सुरू आहे. घोटाळ्याची रक्कम वाढणार असल्याची चर्चा जोरात आहे. ऑडिट पूर्ण झाल्यानंतर पुन्हा फिर्याद दाखल होईल. त्यावेळी या घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविणे आवश्यक असल्याचे जाणकारांचे मत आहे. 

दरम्यान, महापालिकेच्या धनादेशातून ज्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांची वीज बिले भरली आहेत, त्या यादीत शहर पोलिस ठाण्याचेही नाव आले आहे. महापालिकेने एप्रिल ते सप्टेंबर 2020 या कालावधीत पथदिवे वीज बिलापोटी 123 धनादेश काढले आहेत. या धनादेशांची रक्कम 9 कोटी 88 लाख 66 हजार 184 रुपये आहे. त्यातील 8 कोटी 58 लाख 70 हजार 286 रुपये  महापालिकेच्या पथदिवे वीज बिलापोटी जमा झाले आहेत. उर्वरित 1 कोटी 29 लाख 95 हजार 898 रुपये हे अन्य खासगी ग्राहकांच्या बिलापोटी जमा झाले आहेत. यामध्ये काही घरगुती, काही वाणिज्यिक व काही औद्योगिक  ग्राहकांचा समावेश आहे. या ग्राहक यादीत शहर पोलिस ठाण्याचाही समावेश आहे. या पोलिस ठाण्याच्या वीज बिलाची 11 हजार 686 रुपये इतकी रक्कम महापालिकेच्या धनादेशातून भरल्याचे समोर आले आहे. 

एप्रिल ते सप्टेंबर 2020 या सहा महिने कालावधीतील वीज बिल घोटाळ्याची रक्कम 1.30 कोटी रुपये आहे. त्याचा तपास शहर पोलिस ठाण्याने केला आहे. चार्जशिट दाखल झालेले आहे. दरम्यान, गेल्या पाच वर्षांच्या बिलांच्या तपासणीतून घोटाळ्याच्या रकमेत आणखी वाढ होईल, अशी चर्चा आहे. गेल्या दहा वषार्ंतील वीज बिलांची तपासणी केली तर घोटाळ्याची रक्कम दहा कोटींवर जाईल, असा दावाही काही संघटनांनाकडून केला जात आहे. लवकरच पाच वर्षांच्या वीज बिलांचे ऑडिट पूर्ण होईल आणि ऑडिटरकडून  फिर्याद दाखल होईल. त्यावेळी मात्र या घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून व्हावा, अशी मागणी होत आहे. 

‘त्या’ कर्मचार्‍यास ‘हे’ काम दिलेच नव्हते…!

वीज बिल घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये महावितरणचा एक कंत्राटी कर्मचारी आहे. त्यावर महावितरणने म्हटले आहे की, ‘ही व्यक्ती कंत्राटी बाह्यस्त्रोत कर्मचारी आहे. वाहिनी देखभाल व दुरुस्ती, नवीन विद्युत जोडणी, विद्युत पुरवठ्यासंदर्भातील ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण ही कामे व त्या अनुषंगिक कामे देण्यात आली होती. महापालिकेच्या वीज बिलाची रक्कम अथवा धनादेश घेऊन संबंधित पतसंस्थेकडे जमा करण्यास या व्यक्तीला प्राधिकृत केल्याचे महावितरणने कधीही कळवले नव्हते. महापालिकेची संबंधित यंत्रणा या कंत्राटी कर्मचार्‍यास कशाच्या आधारे धनादेश देत होती हे कळून येत नाही. संबंधित कंत्राटी कर्मचार्‍याने घोटाळा केला असल्यास त्यास महावितरण जबाबदार राहू शकत नाही. 

प्रत्यक्ष व ऑनलाईन वीज बिलात तफावत

काही व्यक्तिगत ग्राहक, काही व्यवसाय व उद्योगांचे वीज बिल महापालिकेच्या धनादेशातून भरले आहे. ही रक्कम नंतर पुढील बिलात ‘इतर आकार’ या रकान्यात दाखवून फसवणूक केली आहे. ऑनलाईन बिलात मात्र ही रक्कम थकबाकी रकान्यात दिसत आहे. महापालिकेला येत असलेले प्रत्यक्ष बिल आणि ऑनलाईन बिल यामध्ये तफावत आहे. 

 

Back to top button