‘एनआयए’चे सांगली जिल्ह्यात छापे | पुढारी | पुढारी

‘एनआयए’चे सांगली जिल्ह्यात छापे | पुढारी

सांगली : पुढारी वृत्तसेवा

दुबईतून केरळमध्ये तस्करीने आणलेले शंभर किलो सोने सांगली जिल्ह्यात आणल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी शुक्रवारपासून एनआयएचे एक पथक सांगली जिल्ह्यात ठाण मांडून आहे. आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव व खानापूर तालुक्यात छापे टाकण्यात आले आहेत; मात्र कारवाईबाबत अत्यंत गोपनीयता बाळगली जात आहे.

याप्रकरणी एनआयएने तस्करीतील मुख्य सूत्रधार मुहम्मद मन्सूर याला दि. 9 जून रोजी अटक केली. त्याने दिलेल्या माहितीनुसार तस्करीचे सोने केरळमधून सांगली जिल्ह्यात पाठवण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारपासून एनआयएचे एक पथक सांगली जिल्ह्यात ठाण मांडून आहे. 

जुलै 2020 मध्ये  केरळमधून सांगलीत तब्बल शंभर किलो सोने तस्करी केल्याप्रकरणी काही संशयितांना कस्टम विभागाने अटक केली होती. त्यांच्याकडील चौकशीनंतर या प्रकरणाचा मुख्य सूत्रदार मुहम्मद मन्सूर असल्याचे स्पष्ट झाले. 

तस्करीची व्याप्ती मोठी असल्याने, तसेच यामध्ये केरळमधील वरिष्ठ शासकीय अधिकारी तसेच   तत्कालीन काही वरिष्ठ पदाधिकार्‍यांच्या समावेशाचा संशय आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्यात आला. त्यानंतर गतवर्षी जुलै अखेरपर्यंत सोने तस्करीप्रकरणात  15 जणांना एनआयएच्या पथकाने अटक केली आहे.

मुख्य सूत्रधार मन्सूर याला कालिकत आंतरराष्ट्रीय विमानतळावर दि. 9 जून रोजी एनआयएच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर तस्करीचे तब्बल 100 किलो सोने सांगली जिल्ह्यात पाठवल्याची माहिती उघड झाली आहे. ही माहिती मिळाल्यानंतर शुक्रवारपासून एनआयएच्या एका पथकाने सांगलीत ठाण मांडले आहे. मन्सूरने दिलेल्या माहितीनुसारच सांगली जिल्ह्यातील आटपाडी, तासगाव, खानापूर आणि कवठेमहांकाळ तालुक्यात छापे टाकल्याचे समजते. 

सोने तस्करी आणि सांगलीचा वारंवार संबंध

नवी दिल्ली रेल्वेस्थानकावर कोट्यवधी रुपयांच्या सोने तस्करीप्रकरणी डीआरआय आणि केंद्रीय जीएसटीच्या संयुक्त पथकाने खानापूर आणि आटपाडी तालुक्यातील आठ जणांना अटक केली होती. त्याशिवाय कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे दहा किलो सोने जप्त करून जिल्ह्यातील दोघांना अटक करण्यात आली होती. त्याचे थेट कनेक्शन तासगाव आणि मिरज तालुक्यात असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर केरळमधील 100 किलो सोन्याच्या तस्करीप्रकरणी पुन्हा जिल्ह्याचा संबंध स्पष्ट झाल्याने खळबळ उडाली आहे.

 

Back to top button